प्रेषित 14
14
इकुन्यामध्ये
1इकुन्या येथे पौल व बर्णबा नेहमीप्रमाणे यहूदी सभागृहामध्ये गेले. तिथे ते इतक्या प्रभावीपणाने बोलले की, यहूदी व गैरयहूदी लोकांनी मोठ्या संख्येने विश्वास ठेवला. 2परंतु ज्या यहूद्यांनी विश्वास ठेवण्याचे नाकारले त्यांनी इतर गैरयहूद्यांना चिथावणी देऊन बंधुवर्गाविरुद्ध त्यांची मने विषाने भरली. 3तरी देखील पौल व बर्णबाने तिथे बराच काळ घालविला, ते धैर्याने प्रभूसाठी बोलत राहिले, त्यांनी कृपेचा संदेश चिन्हे व अद्भुते यांच्याद्वारे सिद्ध केला. 4मग त्या शहरातील लोकांमध्ये दोन गट झाले; काही यहूदीयांच्या तर काही प्रेषितांच्या बाजूने झाले. 5त्यांना अन्यायाने धोंडमार करण्यासाठी गैरयहूदी, यहूदी, व त्यांचे पुढारी मिळून कट करीत होते. 6हे त्यांना समजल्यावर ते लुकाओनियानच्या प्रांतातील लुस्त्र, दर्बे व सभोवतालच्या देशामध्ये पळून गेले, 7आणि तिथे शुभवार्तेचा प्रचार करीत राहिले.
लुस्त्र व दर्बे येथे
8त्यांना लुस्त्र मध्ये पांगळा मनुष्य बसलेला आढळला. तो जन्मापासूनच पांगळा असून कधीही चालू शकला नव्हता. 9पौल बोलत असताना तो ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे सरळ निरखून पाहिले आणि बरा होण्यासाठी लागणारा विश्वास त्याच्याकडे आहे असे त्याला दिसले. 10तेव्हा त्याने मोठ्याने म्हटले, “तुझ्या पायांवर उठून उभा राहा!” त्याच क्षणाला त्या मनुष्याने उडी मारली आणि तो चालू लागला.
11पौलाने केलेले कृत्य पाहून जमाव लुकवनी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “परमेश्वर आमच्यामध्ये मनुष्य रूपाने उतरून आले आहेत!” 12बर्णबाला त्याने झूस या नावाने व पौल हा मुख्य वक्ता असल्यामुळे त्याला हेर्मेस असे म्हटले. 13शहराच्या बाहेर असलेल्या झूस मंदिरातील पुजार्याने, बैल आणि फुलांच्या माळा घेतल्या व शहराच्या वेशीजवळ आले, कारण त्याला आणि जनसमुदायाला, त्यांना यज्ञार्पणे करावयाची होती.
14परंतु ज्यावेळी प्रेषित बर्णबा व पौल यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी स्वतःची वस्त्रे फाडली व धावत लोकांमध्ये शिरून ते ओरडून म्हणाले: 15“मित्रांनो, तुम्ही हे कशासाठी करीत आहात? आम्हीसुद्धा तुमच्यासारखीच माणसे आहोत. आम्ही तुमच्यासाठी जी शुभवार्ता आणली आहे ती तुम्हाला सांगतो, यासाठी की तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून देऊन, ज्याने आकाश, पृथ्वी, सागर व त्यातील सर्वकाही निर्माण केले त्या जिवंत परमेश्वराकडे वळावे. 16मागील काळात, त्यांनी सर्व राष्ट्रांना त्यांच्या मर्जीप्रमाणे वागू दिले; 17तरी त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाची साक्ष दिली: त्यांच्याच दयेने तुमच्यासाठी आकाशातून पाऊस पाडतात, ऋतूमध्ये पीक देतात; ते तुम्हाला भरपूर अन्न पुरवितात आणि तुमचे हृदय आनंदाने भरून टाकतात.” 18परंतु इतके बोलल्यानंतरही, लोकांना यज्ञ करण्यापासून आवरणे त्यांना अत्यंत कठीण गेले.
19तेव्हा काही यहूदी अंत्युखिया आणि इकुन्या येथून आले आणि त्यांनी समुदायाला त्यांच्या बाजूने करवून घेतले. त्यांनी पौलाला धोंडमार केला आणि तो मरण पावला आहे असे समजून त्याला शहराबाहेर फरफटत ओढून नेले. 20परंतु शिष्य त्याच्या अवतीभोवती उभे राहिले, तेव्हा तो उठला आणि पुन्हा त्या शहरात गेला. दुसर्या दिवशी तो आणि बर्णबा दर्बेकडे निघून गेले.
सीरियातील अंत्युखियास परतणे
21त्यांनी त्या शहरात शुभवार्तेचा प्रचार करून मोठ्या संख्येने शिष्य बनविले. नंतर ते लुस्त्र, इकुन्या व अंत्युखिया या शहरात परत आले. 22त्यांनी शिष्यांना बळकटी येण्यासाठी आणि विश्वासात एकनिष्ठतेने टिकून राहण्यासाठी उत्तेजन दिले, कारण “परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला अनेक संकटातून गेले पाहिजे,” असे ते म्हणाले. 23पौल आणि बर्णबाने प्रत्येक मंडळीमध्ये वडिलांची नेमणूक केली आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता, त्या प्रभूला त्यांचे समर्पण केले. 24नंतर पिसिदियामधून जात असताना ते पंफुल्यात आले, 25आणि पेर्गा येथे वचनाचा प्रचार केल्यानंतर ते खाली अत्तलिया येथे गेले.
26अत्तलियाहून ते तारवात बसून अंत्युखियास आले, आता जे कार्य त्यांनी पूर्ण केले होते त्यासाठी याच ठिकाणी त्यांना परमेश्वराच्या कृपेवर सोपविण्यात आले होते. 27तिथे पोहोचल्यावर त्यांनी मंडळीला एकत्र बोलाविले आणि परमेश्वराने जे सर्वकाही त्यांच्याद्वारे केले व गैरयहूदीयांसाठी देखील विश्वासाचे दार कसे उघडले, याचा अहवाल सादर केला. 28आणि तिथे ते शिष्यांबरोबर पुष्कळ दिवस राहिले.
सध्या निवडलेले:
प्रेषित 14: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.