प्रेषित 15
15
यरुशलेम येथील सभा
1यहूदीया येथून काही माणसे अंत्युखियास आली व विश्वासणार्यांना शिकवू लागली: “मोशेने शिकविलेल्या नियमशास्त्राप्रमाणे जोपर्यंत तुमची सुंता होत नाही, तोपर्यंत तुमचे तारण होणे शक्य नाही.” 2पौल आणि बर्णबाचा त्यांच्याबरोबर प्रखर मतभेद व वादविवाद झाला. शेवटी पौल आणि बर्णबाबरोबर इतर काही विश्वासणार्यांची नेमणूक करण्यात आली व या प्रश्नांसंबंधी यरुशलेम येथे प्रेषित व वडीलजनांना भेटावे म्हणून त्यांना पाठविण्यात आले. 3नंतर मंडळीने त्यांना निरोप देऊन पाठविले आणि जसे ते फेनिके आणि शोमरोनामधून प्रवास करीत गेले, गैरयहूदीयांचे कसे परिवर्तन झाले हे त्यांनी तेथील लोकांना सांगितले. या बातमीने सर्व विश्वासणार्यांना अतिशय आनंदित केले. 4जेव्हा ते यरुशलेममध्ये आले, तेथील मंडळी, प्रेषित व वडीलजनांनी त्यांचे स्वागत केले आणि परमेश्वराने जे सर्वकाही त्यांच्या सेवेद्वारे केले होते, याची सविस्तर माहिती पौल व बर्णबाने त्यांना दिली.
5परूशी लोकांच्या पंथातील काही विश्वासू सभासद उठून उभे राहिले व म्हणाले, “गैरयहूदी लोकांची सुंता झालीच पाहिजे व मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करणे त्यांना आवश्यक आहे.”
6प्रेषित आणि पुढारी या प्रश्नावर विचारविनिमय करण्यासाठी एकत्रित भेटले. 7बरीच चर्चा झाल्यानंतर, पेत्र उभा राहिला व त्यांना उद्देशून म्हणाला: “बंधूंनो, हे आपणा सर्वांस माहीत आहे की गैरयहूदीयांनी विश्वास ठेवावा व माझ्याद्वारे शुभवार्तेचा संदेश त्यांना कळावा यासाठी फार काळापूर्वी परमेश्वराने माझी निवड केली होती. 8परमेश्वर अंतःकरणे ओळखतो, त्यांनी आपल्याप्रमाणेच गैरयहूदी लोकांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांचाही स्वीकार केला आहे, असे स्पष्ट दाखविले आहे. 9त्याने त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कसलाही भेदभाव केलेला नाही, कारण त्याने त्यांची मने विश्वासाद्वारे शुद्ध केली आहेत. 10तेव्हा आता, जे जू आपल्याला व आपल्या पूर्वजांना वाहवयास अशक्य होते, ते गैरयहूद्यांना वाहवयास लावून तुम्ही जणू परमेश्वराची परीक्षा पाहता काय? 11नाही! आमचा विश्वास आहे की प्रभू येशूंच्या कृपेद्वारे आपल्याप्रमाणे त्यांनाही तारण मिळाले आहे.”
12तेव्हा बर्णबा व पौल यांच्याद्वारे गैरयहूदी लोकांमध्ये परमेश्वराने जी चिन्हे व अद्भुते केली यांचे वर्णन ऐकत असताना सर्व सभा स्तब्ध राहिली. 13मग त्यांचे बोलणे आटोपल्यावर याकोब म्हणाला, “बंधूंनो, माझे ऐका. 14परमेश्वराने प्रथम मध्यस्थी करून गैरयहूदी लोकांमधून आपल्या नावासाठी लोक निवडून घेतले हे शिमोनाने वर्णन करून आपल्याला सांगितले आहे. 15संदेष्ट्यांचे शब्द याच्याशी सहमत आहे, असे लिहिले आहे:
16“ ‘यानंतर मी पुन्हा येईन
आणि दावीदाचे पतन झालेले मंडप
पुनर्स्थापित करेन, तिच्या अवशेषांची पुनर्बांधणी करेन,
आणि तिची पुनर्स्थापना करेन.
17म्हणजे उरलेली मानवजात प्रभूचा शोध करेल,
माझे नाव धारण करणारे सर्व गैरयहूदी देखील,
ही कार्ये करतात ते प्रभू असे म्हणतात,’#15:17 आमो 9:11, 12
18प्रारंभीच्या काळापासून या गोष्टी प्रकट करणारे परमेश्वर असे म्हणतात.#15:18 काही मूळ प्रतींमध्ये गोष्टी पुष्कळ काळापासून परमेश्वराचे कार्य त्यांना माहीत आहे
19“माझा न्याय असा आहे की, जे गैरयहूदी परमेश्वराकडे वळत आहेत, त्यांच्यासाठी कठीण होईल असे आपण करू नये. 20फक्त त्यांना एवढेच लिहून कळवावे की, त्यांनी मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून आणि गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि रक्ताचे सेवन करण्यापासून स्वतःला दूर ठेवावे. 21कारण प्राचीन काळापासून मोशेच्या नियमशास्त्राचा प्रत्येक शहरामध्ये प्रचार केला जाऊ लागला आणि प्रत्येक शब्बाथ दिवशी सभागृहामध्ये त्याचे वाचन होऊ लागले.”
गैरयहूदी विश्वासणार्यांना सभेकडून पत्र
22मग प्रेषित आणि वडीलजन व सर्व मंडळीने ठरविले की त्यांची काही निवडलेली माणसे अंत्युखियास पौल व बर्णबा यांच्याबरोबर पाठवावीत. त्यांनी यहूदाह ज्याला बारसब्बास असेही म्हणत असत व सीला यांना निवडले. हे दोघे विश्वासणार्यामधील पुढारी होते. 23त्यांनी आपल्याबरोबर नेलेल्या पत्राचा मजकूर असा होता:
प्रेषित, वडीलजन आणि बंधुवर्ग यांच्याकडून,
अंत्युखिया, सिरिया व किलिकिया येथील गैरयहूदी विश्वासणार्यांना:
सलाम.
24आमच्यामधून काहीजण आमच्या परवानगीशिवाय तिथे येऊन तुम्हाला गोंधळात पाडत आहेत आणि त्यांच्या बोलण्याने तुमची मने विचलित करीत आहेत असे आमच्या ऐकण्यात आले आहे. 25तेव्हा आम्ही सर्वांनी ठरविले की आमचे प्रिय बंधू बर्णबा व पौल यांच्याबरोबर काही जणांना निवडून तुमच्याकडे पाठवावे. 26या लोकांनी आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासाठी आपले जीव धोक्यात घातले होते. 27यास्तव यहूदाह व सीला यांना पाठविले असून ते स्वतः आम्ही लिहिलेल्या या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगतील. 28पवित्र आत्म्याला आणि आम्हाला हेच योग्य वाटले की, ज्या आवश्यक गोष्टींशिवाय तुमच्यावर ओझे टाकले जाऊ नये त्या अशा आहेत: 29मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून, रक्ताचे सेवन करण्यापासून, गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवावे. या गोष्टी टाळण्याकडे तुम्ही लक्ष द्याल तर ते तुमच्या हिताचे होईल.
निरोप द्यावा.
30ती माणसे तिथून खाली अंत्युखियात आली आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी सर्व मंडळीला एकत्र जमवून ते पत्र त्यांच्याकडे सोपविले. 31लोकांनी ते वाचले आणि त्यातील उत्तेजनपर संदेशाने ते आनंदित झाले. 32मग यहूदाह आणि सीला, जे स्वतः संदेष्टे होते, त्यांनी विश्वासणार्यांना पुष्कळ गोष्टी बोलण्याद्वारे उत्तेजित करून स्थिरावले. 33तिथे काही काळ राहिल्यानंतर, तेथील विश्वासणार्यांनी त्यांना शांतीचा आशीर्वाद देऊन, ज्यांनी त्यांना पाठविले होते त्यांच्याकडे परत पाठविले. 34परंतु सीला#15:34 काही मूळ प्रतींमध्ये हे समाविष्ट केले आहे, पण सीलास ने तिथेच राहण्याचे ठरविले. तिथेच राहिला. 35पौल व बर्णबा अंत्युखियामध्ये राहिले, तिथे ते व त्यांच्याबरोबर अनेकांनी शिक्षण दिले आणि प्रभूच्या वचनाची घोषणा केली.
पौल व बर्णबा यांच्यात मतभेद
36काही काळानंतर पौलाने बर्णबाला म्हटले, “आपण परत जावे व ज्या ज्या सर्व शहरांत जिथे आपण प्रभूच्या वचनाचा प्रचार केला होता, तेथील विश्वासणार्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करावी.” 37बर्णबाला हवे होते की योहान, ज्याला मार्क असेही म्हणत, त्यालाही आपल्याबरोबर न्यावे. 38परंतु पौलाला त्याला बरोबर नेणे सुज्ञपणाचे वाटले नाही, कारण मार्क त्यांना पंफुल्यामध्ये सोडून गेला होता आणि या कार्यात पुढे जाण्यासाठी त्याने साथ दिली नव्हती. 39याबाबत त्यांचा मतभेद एवढा तीव्र झाला की त्यांनी एकमेकांची सोबत सोडली. बर्णबाने आपल्याबरोबर मार्कला घेतले आणि जहाजात बसून ते सायप्रसला गेले, 40परंतु पौलाने सीलाची निवड केली व त्यासह तो निघाला. विश्वासणार्यांनी त्यांना शाबासकी देऊन प्रभूच्या कृपेवर सोपविले. 41तो सिरिया व किलिकियामधून मंडळ्यांना बळकट करीत गेला.
सध्या निवडलेले:
प्रेषित 15: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.