आमोस 2
2
1याहवेह असे म्हणतात,
“मोआबच्या तीन नव्हे
तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही.
कारण त्याने एदोम राजाची हाडे जाळून
त्याची राख केली आहे.
2मी मोआबावर अग्नी पाठवेन
तो करीयोथच्या किल्ल्याला#2:2 किंवा तिच्या शहरांना भस्म करेन.
युद्धाच्या आक्रोशात आणि रणशिंगाच्या आवाजात मोआब
प्रचंड नाशाने खाली जाईल.
3मी तिच्या शासकाचा नाश करेन
आणि त्याच्यासोबत तिच्या सर्व अधिकार्यांना मारून टाकेन.”
असे याहवेह म्हणतात.
4याहवेह असे म्हणतात:
“यहूदीयाच्या तीन नव्हे
तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मागे फिरणार नाही.
कारण त्यांनी याहवेहचे नियमशास्त्र धिक्कारले आहे
व त्यांचे विधी पाळले नाही.
ज्या दैवतांचे अनुसरण त्यांच्या पूर्वजांनी केले होते
त्या त्यांच्या खोट्या दैवतांनी#2:4 किंवा खोटेपणाने त्यांची दिशाभूल केली होती,
5म्हणून मी यहूदीयावर अग्नी पाठवेन
आणि यरुशलेमचे किल्ले भस्म करेन.”
इस्राएलचा न्याय
6याहवेह असे म्हणतात,
“इस्राएलला तीन नव्हे
तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही.
चांदीसाठी ते एका न्यायी व्यक्तीला,
आणि पायातील एका जोड्यासाठी गरजवंत व्यक्तीला विकतात.
7ते गरिबांच्या डोक्याला
भूमिवरील धुळीत पायदळी तुडवितात
आणि दीनदुबळ्यांचा न्याय करीत नाही.
मुलगा व पिता एकाच तरुणीकडे जाऊन
माझ्या पवित्र नामाला काळिमा लावतात.
8प्रत्येक वेदीजवळ
गहाण ठेवलेल्या वस्त्रांवर पडून राहतात
आणि आपल्या दैवतांच्या घरात
दंड म्हणून घेतलेला द्राक्षारस पितात.
9“जरी ते गंधसरूंसारखे उंच
व एलावृक्षांसारखे मजबूत होते,
तरी मी त्यांच्यासमोर अमोरी लोकांचा संहार केला.
मी वरून त्यांचे फळ
व खालून त्यांचे मूळ नासविले.
10अमोर्यांचा देश तुम्हाला द्यावा म्हणून
मी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले
व चाळीस वर्षे तुम्हाला रानात चालविले.
11“तुमच्या मुलांपैकी काहींना संदेष्टे म्हणून
आणि तरुणांतील काहींना नाजीर होण्याकरिता वाढवले आहे.
अहो इस्राएलच्या लोकांनो, हे खरे नाही काय?”
असे याहवेह जाहीर करतात.
12“पण तुम्ही नाजीरांना द्राक्षारस पिण्यास
आणि संदेष्ट्यांना भविष्य न सांगण्याची आज्ञा दिली.
13“म्हणून धान्याच्या पेंढ्यांखाली गच्च भरलेली गाडी जशी दबते,
तसे मी तुम्हाला दाबेन आणि तुम्ही कण्हाल.
14चपळ निसटून जाणार नाहीत,
शक्तिमानाला आपले सामर्थ्य लावता येणार नाही,
आणि वीराला आपला जीव वाचविता येणार नाही.
15धनुर्धार्याला आपल्या भूमीवर उभे राहता येणार नाही,
अत्यंत वेगाने धावणारा सैनिक सुटणार नाही,
आणि घोडेस्वाराला आपला जीव वाचवता येणार नाही.
16वीरांपैकी महाधैर्यवानही
त्या दिवशी वस्त्रे टाकून पळतील.”
याहवेह असे जाहीर करतात.
सध्या निवडलेले:
आमोस 2: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fmr.png&w=128&q=75)
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.