आमोस 3
3
इस्राएलविरुद्ध साक्षीदार बोलाविण्यात येतात
1इस्राएलच्या लोकांनो, हे वचन ऐका, जे याहवेह तुमच्याविरुद्ध बोलले आहेत—त्या संपूर्ण घराण्याविरुद्ध आहे ज्यांना मी इजिप्तमधून बाहेर आणले आहे:
2“पृथ्वीवरील सर्व राष्ट्रातील लोकांमधून
मी फक्त तुझीच निवड केली आहे;
म्हणून तुझ्या सर्व पापांबद्दल
मी तुला शिक्षा करेन.”
3दोन व्यक्ती एकमताचे झाल्यावाचून
ते सोबत चालू शकतील काय?
4शिकार नसली तर
सिंह गर्जना करेन काय?
काही धरल्याशिवाय
तो त्याच्या गुहेत गुरगुरणार काय?
5अमिष नसताना पक्षी
भूमीवरील सापळ्यात अडकतो काय?
जर सापळ्यात काही अडकले नसेल
तर ते भूमीवरून उडेल काय?
6नगरात जेव्हा रणशिंगाचा आवाज येतो,
तेव्हा लोक घाबरत नाही काय?
शहरात विपत्ती आली तर,
ती याहवेहने घडवून आणली नाही काय?
7सार्वभौम याहवेह
आपल्या सेवक संदेष्ट्यांना त्याच्या योजना प्रकट केल्याशिवाय
निश्चितच काहीही करणार नाही.
8सिंहाने गर्जना केली आहे—
कोण भिणार नाही?
सार्वभौम याहवेहने बोलले आहेत;
तर मग संदेश दिल्यावाचून कोणी राहील काय?
9अश्दोदच्या गडांना
आणि इजिप्तच्या गडांना ही घोषणा करा:
“शोमरोनच्या पर्वतावर एकत्र व्हा;
तिच्यामधील गोंधळ
आणि तिच्या लोकांवरील अत्याचाराकडे पाहा.”
10“जे योग्य ते कसे करावे हे त्यांना माहीत नाही,” याहवेह जाहीर करतात,
“त्यांनी लुटलेला व चोरी केलेला माल
त्यांच्या महालात कोणी साठवून ठेवला आहे.”
11यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात,
“एक शत्रू जो तुमचा देश व्यापून टाकेल,
तो तुमचे किल्ले कोसळून टाकेल
आणि तुमचे गड लुटेल.”
12याहवेह असे म्हणतात:
“जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून
केवळ दोन तंगड्या आणि कानाचा एक तुकडा सोडवितो,
तसे शोमरोनातील इस्राएल लोक
जे पलंगाच्या शीरपट्टीने
आणि बिछान्यावरील#3:12 किंवा जे इस्राएली लोक शमरोनात बसून आहेत रेशमी कापडाच्या तुकड्याने सोडविले जातील.”
13“हे ऐका आणि याकोबाच्या घराण्याविरुद्ध साक्ष द्या,” असे याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर म्हणतात:
14“ज्या दिवशी मी इस्राएलला तिच्या पातकाबद्दल शिक्षा करेन,
त्याच दिवशी मी बेथेलमधल्या वेद्यांचा नाश करेन;
वेद्यांची शिंगे कापून टाकण्यात येतील
आणि ती जमिनीवर पडतील.
15मी ग्रीष्मकालीनघर
आणि उष्मकालीनघर पाडून टाकेन;
हस्तिदंताने सजविलेल्या घरांचा विध्वंस होईल
भवने जमीनदोस्त होतील,”
असे याहवेह जाहीर करतात.
सध्या निवडलेले:
आमोस 3: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.