निर्गम 12
12
वल्हांडण व बेखमीर भाकरीचा सण
1मग इजिप्तमध्ये याहवेह मोशे व अहरोन यांच्याशी बोलले, 2“हा महिना तुमच्यासाठी पहिला महिना, वर्षाचा पहिला महिना असेल. 3तू इस्राएलाच्या सर्व समुदायाला जाहीर कर की, या महिन्याच्या दहाव्या दिवशी, प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी एक कोकरू घ्यावे, प्रत्येक घराण्यासाठी एक कोकरू. 4जर एखादे कुटुंब एका कोकराच्या मानाने लहान असले तर शेजारच्या कुटुंबाबरोबर, त्यांच्यातील लोकांची संख्या लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्ती किती खाईल यानुसार अंदाज घेऊन, किती कोकरे लागतील हे ठरवावे. 5एक वर्षाचे निर्दोष नर कोकरू असावे, आणि तुम्ही ते मेंढरांतून अथवा शेळ्यांतून घ्यावे. 6या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत त्यांची काळजी घ्यावी आणि इस्राएली लोकातील सर्वांनी सायंकाळी ते कापावेत. 7ज्या घरांमध्ये ते खातील त्या घराच्या दोन्ही दारपट्ट्यांना व कपाळपट्टीला त्या कोकराचे रक्त घेऊन ते लावावे. 8त्या रात्री प्रत्येकाने त्या कोकर्याचे विस्तवावर भाजलेले मांस, बेखमीर भाकर व कडू भाजी यांच्याबरोबर खावे. 9मांस कच्चे किंवा पाण्यात उकळून खाऊ नये, तर विस्तवावर भाजून, त्याचे डोके, पाय व आतड्यांसह खावे. 10त्यातील काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये; जर काही सकाळपर्यंत उरले तर ते जाळून टाकावे. 11तुम्ही ते असे खावे: तुमच्या कंबरा बांधलेल्या, तुमची पायतणे पायात घातलेली व हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा याहवेहचा वल्हांडण#12:11 मूळ भाषेत पेसाह-ओलांडणे आहे.
12“कारण त्याच रात्री मी संपूर्ण इजिप्त देशामधून संचार करेन व सर्व मनुष्यांचे व जनावरांचे प्रथमवत्स मारून टाकेन आणि त्यांच्या सर्व दैवतांवर न्याय आणेन; मी याहवेह आहे. 13तुम्ही राहत असलेल्या घरांच्या दारांवर असलेले रक्त हे तुमच्याकरिता चिन्ह असेल, जेव्हा मी ते रक्त पाहीन, तेव्हा मी तुम्हाला ओलांडून पुढे जाईन. जेव्हा मी इजिप्तला तडाखा देईन, तेव्हा कोणतीही विनाशी पीडा तुम्हाला स्पर्श करणार नाही.
14“हा दिवस तुम्ही याहवेहचा सण म्हणून पिढ्यान् पिढ्यांपर्यंत सर्वकाळच्या नियमाने पाळावा. 15सात दिवस तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी. पहिल्या दिवशी आपल्या घरातून खमीर काढून टाकावे, कारण जे कोणी या सात दिवसात खमीर घातलेल्या वस्तू खाईल, त्याला इस्राएलातून बेदखल करण्यात यावे. 16पहिल्या दिवशी एक पवित्र सभा भरवावी आणि सातव्या दिवशी दुसरी सभा. या दिवसात प्रत्येकाने खाण्यासाठी अन्न तयार करण्याशिवाय इतर कोणतेही काम करू नये.
17“बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण याच दिवशी मी तुमच्या सैन्यांना इजिप्तमधून बाहेर आणले. पिढ्यान् पिढ्यांपर्यंत सर्वकाळच्या नियमाने तो पाळावा. 18पहिल्या महिन्यात चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी. 19या सात दिवसात तुमच्या घरात खमीर सापडू नये. आणि कोणीही, तो परदेशी असो वा देशात जन्मलेला असो, जो खमीर घातलेले पदार्थ खाईल तर त्याला इस्राएलाच्या समाजातून वाळीत टाकले जावे. 20खमीर घातलेले काहीही खाऊ नये. तुम्ही कुठेही राहत असला तरी तुम्ही बेखमीर भाकरीच खावी.”
21मग मोशेने इस्राएलातील वडीलजनांना बोलाविले व म्हटले, “तुम्ही लगेच जा व आपआपल्या कुटुंबाप्रमाणे कोकरू निवडून घ्या व वल्हांडणाच्या कोकराचा वध करा. 22एजोबाची जुडी घेऊन ती पात्रात घेतलेल्या रक्तात बुडवा व त्याने ते रक्त घराच्या दरवाजाच्या बाजूंवर व कपाळपट्टीवर लावा. तुम्हापैकी कोणीही सकाळ होईपर्यंत आपल्या घराबाहेर पडू नये. 23कारण याहवेह या देशात संचार करतील व इजिप्तवासियांचा संहार करतील. पण ज्या दरवाजाच्या बाजूंवर व कपाळपट्टीवर रक्त दिसेल, याहवेह त्या घराला ओलांडून पुढे जातील व विनाशकाला तुम्हाला मारण्यास तुमच्या घरात येऊ देणार नाहीत.
24“तुमच्यासाठी व तुमच्या वंशजांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा. 25वचन दिल्याप्रमाणे जो देश याहवेह तुम्हाला देणार आहेत, त्या देशात तुम्ही जाल, तिथेही हा विधी पाळावा. 26जेव्हा तुमची लेकरे तुम्हाला विचारतील, ‘या विधीचा अर्थ काय आहे?’ 27तेव्हा त्यांना सांगा, ‘हा याहवेहसाठी वल्हांडणाचा यज्ञ आहे, ज्यांनी इजिप्तच्या लोकांचा संहार करून त्यांचा नाश केला, आणि इस्राएली लोकांची घरे ओलांडून गेले आणि आम्हाला वाचविले.’ ” तेव्हा लोकांनी आपली मस्तके नमवून त्यांना नमन केले व त्यांची आराधना केली. 28मग याहवेहने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले.
29मध्यरात्रीत याहवेहने इजिप्त देशातील प्रथम जन्मलेले सर्व मारून टाकले. सिंहासनावर बसणार्या फारोहच्या प्रथम पुत्रापासून तुरुंगात असलेल्या कैद्याच्या प्रथम जन्मलेल्या पुत्रापर्यंत, जनावरांचे प्रथम जन्मलेले वत्स देखील मारून टाकले. 30तेव्हा फारोह, त्याचे अधिकारी व सर्व इजिप्तचे लोक रात्री जागे झाले आणि इजिप्तमध्ये मोठा आकांत झाला, कारण ज्या घरात मृत्यू झाला नाही, असे एकही घर नव्हते.
निर्गम
31तेव्हा फारोहने मोशे व अहरोन यांना रात्री बोलावून म्हटले, “उठा! तुम्ही व इस्राएली लोक माझ्या लोकांना सोडून जा! जा, आणि तुम्ही मागितल्याप्रमाणे याहवेहची उपासना करा. 32तुमची शेरडेमेंढरे आणि गुरे घ्या आणि निघून जा आणि मलाही आशीर्वाद द्या.”
33इस्राएली लोक देशाबाहेर त्वरेने जावे म्हणून इजिप्तच्या लोकांनी त्यांना विनंती केली. कारण ते म्हणाले, “नाहीतर आम्ही सर्व मरून जाऊ!” 34मग इस्राएली लोकांनी खमीर घालण्यापूर्वी कणीक परातीसह कापडात बांधून खांद्यावर टाकली. 35मोशेने सांगितल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी इजिप्तच्या लोकांकडून चांदीचे व सोन्याचे दागिने व कपडे मागून घेतले. 36इजिप्तचे लोक इस्राएली लोकांवर कृपादृष्टी करतील असे याहवेहने केले आणि जे काही त्यांनी मागितले ते सर्व त्यांनी त्यांना दिले; अशाप्रकारे त्यांनी इजिप्तच्या लोकांना लुटले.
37इस्राएल लोकांनी रामसेस पासून ते सुक्कोथ पर्यंत प्रवास केला. स्त्रिया व लेकरे या खेरीज सुमारे सहा लाख पुरुष पायी चालणारे होते. 38इतर पुष्कळ लोकसुद्धा त्यांच्याबरोबर निघाले होते, त्याचप्रमाणे शेरडेमेंढरांचे कळप व जनावरेही होती. 39जी कणीक इस्राएल लोकांनी इजिप्तमधून बरोबर आणली होती, त्याच्या त्यांनी भाकरी भाजल्या. ते कणीक बेखमीर होते, कारण जेव्हा त्यांना इजिप्तमधून घालवून दिले, स्वतःसाठी अन्न तयार करावयाला वेळ नव्हता.
40इस्राएली लोक इजिप्तमध्ये राहिले तो कालावधी चारशेतीस वर्षांचा होता. 41चारशेतिसाव्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी याहवेहच्या सैन्यांनी इजिप्त देश सोडला. 42ही रात्र याहवेहने इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणण्यासाठी वेगळी करून ठेवली, ही रात्र इस्राएल लोकांनी पिढ्यान् पिढ्या याहवेहला सन्मान म्हणून पाळावी.
वल्हांडणाचे नियम
43नंतर याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, “वल्हांडणाच्या भोजनाचे हे नियम आहेत:
“कोणत्याही विदेशी व्यक्तीने ते खाऊ नये. 44पण तू मोल देऊन विकत घेतलेला गुलाम व ज्याची सुंता तू करून घेतली आहे त्याने ते खावे. 45पण तात्पुरता रहिवासी किंवा मोलकरी यांनी ते खाऊ नये.
46“ते घरातच खावयाचे आहे; त्यातील मांस घराबाहेर घेऊन जाऊ नये. त्यातील एकही हाड मोडू नये. 47इस्राएलाच्या सर्व समुदायाने हा सण पाळावा.
48“तुमच्याबरोबर राहणार्या विदेशी व्यक्तीला याहवेहचा हा वल्हांडणाचा सण पाळावयाचा असेल, तर त्यांच्यातील सर्व पुरुषांनी सुंता करवून घ्यावी; मगच ते या देशात जन्मलेल्याप्रमाणे हा सण पाळू शकतील. कोणत्याही बेसुंती पुरुषाने ते खाऊ नये. 49तुमच्यामध्ये असलेले स्वदेशी असो वा तुमच्यामध्ये असलेले विदेशी असो, दोघांनाही एकच नियम असावा.”
50तेव्हा याहवेहने मोशे व अहरोन यांना सूचना दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले. 51याच दिवशी याहवेहने वंशानुसार इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले.
सध्या निवडलेले:
निर्गम 12: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.