निर्गम 11
11
प्रथम जन्मलेल्यांवर पीडा
1मग याहवेह मोशेला म्हणाले, “मी फारोह व इजिप्तवर आणखी एक पीडा आणेन. त्यानंतर तो तुम्हाला या ठिकाणाहून जाऊ देईल आणि जेव्हा तो हे करेल तेव्हा तो तुम्हाला अक्षरशः देशातून घालवून देईल. 2सर्व इस्राएली लोकांना सांग, की स्त्री व पुरुषांनी आपआपल्या शेजार्यांकडून चांदीचे व सोन्याचे दागिने मागून घ्यावेत.” 3(आता याहवेहने इजिप्तमधील लोकांची मने इस्राएलांना अनुकूल होतील असे केले, मोशे स्वतः इजिप्तमध्ये फारोहच्या सेवकांच्या व इजिप्तच्या लोकांच्या दृष्टीत फार थोर झाला होता.)
4मग मोशे म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘मध्यरात्रीच्या सुमारास मी इजिप्तमधून फिरेन. 5इजिप्त देशातील प्रत्येक प्रथम जन्मलेला पुत्र मरण पावेल, फारोह जो राजासनावर बसतो त्याच्या प्रथम पुत्रापासून त्याच्या जात्यावर दळत बसणार्या गुलाम स्त्रीच्या प्रथम पुत्रापर्यंत आणि जनावरातील प्रथम जन्मलेले प्रत्येक वत्स मरेल. 6संपूर्ण इजिप्त देशभर पूर्वी कधी झाला नाही व पुढे कधी होणार नाही असा आकांत होईल. 7परंतु इस्राएली व्यक्तीवर किंवा पशूंवर कुत्रेदेखील भुंकणार नाही.’ यावरून मी याहवेह इजिप्त व इस्राएल यांच्यामध्ये कसा भेद करतो, हे तुम्हाला समजेल. 8तुझे हे सर्व सेवक माझ्याकडे येतील व माझ्या पाया पडून मला म्हणतील, ‘तू व तुझे अनुसरण करणारे सर्व लोक निघून जा!’ त्यानंतर मी निघून जाईन.” मग मोशे रागाने संतापून फारोहसमोरून निघून गेला.
9याहवेहने मोशेला आधीच सांगितले होते, “इजिप्त देशात मी पुष्कळ चमत्कार करावे म्हणून फारोह तुमचे ऐकण्यास नाकारेल.” 10मोशे व अहरोन यांनी फारोहसमक्ष हे सर्व चमत्कार केले, पण याहवेहने फारोहचे हृदय कठीण केले व त्याने इस्राएली लोकांना देशाबाहेर जाण्यास परवानगी दिली नाही.
सध्या निवडलेले:
निर्गम 11: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.