निर्गम 28
28
याजकीय वस्त्रे
1“तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र, नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार यांनी याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्यांना इस्राएली लोकांमधून तुझ्याकडे आणावे. 2अहरोन तुझा भाऊ याला सन्मान आणि गौरव मिळावा म्हणून त्याच्यासाठी पवित्र वस्त्रे तयार करावी. 3ज्यांना अशा बाबतीत मी ज्ञान दिले आहे, त्या सर्व कुशल कारागिरांना सांग की अहरोनाच्या पवित्रीकरणासाठी त्यांनी वस्त्रे बनवावी, यासाठी की त्याने याजक म्हणून माझी सेवा करावी. 4त्यांनी जी वस्त्रे बनवावी ती ही: ऊरपट, एफोद, एक झगा, भरतकाम केलेला अंगरखा, फेटा व कमरबंद. त्यांनी ही पवित्र वस्त्रे तुझा भाऊ अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी बनवावी, यासाठी की याजक म्हणून त्यांनी माझी सेवा करावी. 5त्यांनी सोन्याचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या सुताचा व रेशमी तागाचा वापर करावा.
एफोद
6“एफोद सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि बारीक कातलेल्या रेशमी तागाचा, कुशल कारागिराच्या हातांनी बनवा. 7त्याच्या दोन कोपर्यांना दोन खांदेपट्ट्या जोडलेल्या असाव्या, म्हणजे ते बांधता येईल. 8कुशलतेने विणलेला कमरबंद त्याच्यासारखाच असावा; एफोदाशी अखंड असा तो सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या रेशमी तागाचा असावा.
9“दोन गोमेद रत्ने घेऊन त्यावर इस्राएलाच्या पुत्रांची नावे कोरून घ्यावीत. 10एका रत्नावर सहा व दुसर्यावर सहा अशी त्यांच्या जन्माच्या क्रमानुसार ती असावी. 11मोलवान रत्ने कोरणारे मुद्रेची कोरणी करतात त्याप्रमाणे तू त्या दोन रत्नांवर इस्राएलांच्या पुत्रांची नावे कोरून घ्यावी व ती दोन्ही रत्ने सोन्याच्या जाळीदार साच्यात बसवावी. 12आणि ते एफोदाच्या दोन खांदेपट्ट्यांवर इस्राएलच्या पुत्रांचे स्मारक म्हणून रत्ने लावावी. याहवेहसमोर स्मारक म्हणून अहरोनाने ही नावे आपल्या खांद्यांवर वागवावी. 13सोन्याचे खाचे बनव 14आणि पीळ घातलेल्या दोरीसारख्या शुद्ध सोन्याच्या दोन साखळ्या तयार करून खांदेपट्ट्यांवरील आकड्यात अडकवाव्या.”
ऊरपट
15“मग निर्णय घेण्यासाठी कुशल कारागिरांकडून ऊरपट तयार करून घ्यावा. एफोदाप्रमाणे सोन्याची जर असलेला, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांचे सूत व कातलेल्या रेशमी तागाचा असावा. 16तो चौकोनी असून दुहेरी दुमडलेला असावा व त्याची लांबी एक वीत व रुंदी एक वीत#28:16 अंदाजे 23 सें.मी. असावा. 17मग त्यात चार रांगेत मोलवान रत्ने लावावी. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक ही रत्ने असावी; 18दुसर्या रांगेत पाचू, नीलमणी व हिरे असावे; 19तिसर्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग ही असावीत; 20चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे असावीत. ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात बसवावीत. 21इस्राएलाच्या पुत्रातील प्रत्येकाच्या नावाने एक अशी बारा रत्ने असावीत, प्रत्येक रत्नावर इस्राएलाच्या बारापैकी एका गोत्राचे नाव मुद्रेप्रमाणे कोरले जावे.
22“ऊरपटासाठी पीळ घातलेल्या दोरीप्रमाणे शुद्ध सोन्याच्या साखळ्या कराव्या. 23ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावण्यासाठी सोन्याच्या दोन कड्या बनवाव्या. 24त्या सोन्याच्या दोन साखळ्या ऊरपटाच्या टोकाला असलेल्या कड्यांमध्ये घालाव्या, 25आणि साखळीची दुसरी दोन टोके साच्यात घालून एफोदाच्या समोरील बाजूने त्याच्या खांदेपट्टीला जोडून घ्याव्या. 26सोन्याच्या दोन कड्या तयार कर व त्या ऊरपटाच्या दुसर्या दोन कोपर्यांना म्हणजे एफोदा जवळील आतील बाजूच्या काठाला जोडाव्या. 27सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या त्या एफोदाच्या खांदेपट्टीच्या खालच्या बाजूने समोरून, एफोदाच्या कमरबंदाच्या अगदी वर असलेल्या काठाला जोडाव्या. 28ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या दोरीने, कमरबंदाला जोडतील अशा बांधाव्या, म्हणजे ऊरपट एफोदावरून सरकणार नाही.
29“अहरोन जेव्हा पवित्रस्थानात जाईल, तेव्हा इस्राएलच्या पुत्रांची नावे असलेला निर्णयाचा ऊरपट एक नित्य स्मरण म्हणून आपल्या हृदयावर याहवेहसमोर घेऊन जाईल. 30जेव्हा तो याहवेहच्या उपस्थितीत जाईल, तेव्हा अहरोनाने उरीम व थुम्मीम सुद्धा ऊरपटात, आपल्या हृदयावर ठेवून जावे. अशाप्रकारे अहरोनाने नित्यनेमाने इस्राएली लोकांसाठी निर्णय घेणार्या वस्तू आपल्या हृदयावर वाहत याहवेहसमोर यावे.”
इतर याजकीय वस्त्रे
31“एफोदाचा झगा संपूर्ण निळ्या कापडाने बनवावा. 32डोके जाईल असे त्याला मधोमध उघडे ठेवावे. तो फाटू नये म्हणून त्याच्या तोंडाला गळपट्टीप्रमाणे विणलेला गोट असावा. 33त्या झग्याच्या खालच्या घेर्यावर निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची डाळिंबे व त्यामध्ये सोन्याच्या घंट्या बनवाव्या. 34सोन्याच्या घंट्या व डाळिंबे एक सोडून एक असे आळीपाळीने झग्याच्या घेराला लावावे. 35अहरोनाने तो झगा सेवा करीत असताना घालावा. जेव्हा तो याहवेहसमोर पवित्रस्थानात जातो व बाहेर येतो त्यावेळी घंट्यांचा आवाज ऐकू येईल, म्हणजे तो मरणार नाही.
36“शुद्ध सोन्याची एक पाटी तयार करावी आणि तिच्यावर मुद्रा कोरावी तशी ही अक्षरे कोरावीत:
याहवेहसाठी पवित्र.
37आणि ती जोडता यावी म्हणून ती फेट्याला निळ्या दोरीने बांध. 38ती पाटी अहरोनाच्या फेट्यासमोर कपाळावर राहील आणि तो इस्राएलांच्या पवित्र भेटीसंबंधीचे दोष वाहील, त्यांच्या कोणत्याही भेटी असो. ती पाटी नित्य अहरोनाच्या कपाळावर असावी, अशासाठी की लोकांच्या भेटी याहवेहला मान्य होतील.”
39“तलम तागाचा झगा विणून घ्यावा आणि रेशमी तागाचा फेटा तयार करावा. कमरबंद भरतकाम केलेला असावा. 40अहरोनाच्या पुत्रांचा मान व आदर राखला जावा, म्हणून त्यांच्यासाठी झगे, कमरबंद व टोप्या बनवाव्या. 41तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र यांच्या अंगावर ही वस्त्रे घातल्यावर, त्यांचा अभिषेक आणि समर्पण कर. त्यांनी याजक म्हणून माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र कर.
42“शरीराला झाकावे म्हणून तागाच्या कापडाचे, कंबरेपासून मांडीपर्यंत पोहोचेल अशी अंतर्वस्त्रे तयार करावी. 43अहरोन व त्याचे पुत्र ज्यावेळी सभामंडपात येतील किंवा सेवेसाठी वेदीकडे पवित्रस्थानात जातील, त्यावेळी त्यांनी ती वस्त्रे घालावी, म्हणजे ते दोषी ठरून मरणार नाहीत.
“अहरोन व त्याच्या वंशजांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा.”
सध्या निवडलेले:
निर्गम 28: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.