निर्गम 29
29
याजकांचे पवित्रीकरण
1“त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी असेच करावे: एक निर्दोष गोर्हा व दोन मेंढे घ्यावेत. 2आणि उत्तम गव्हाच्या पिठाच्या दोन बेखमीर गोल भाकरी कराव्या, त्या बेखमीर भाकरी आणि जैतुनाचे तेल मिसळून केलेल्या असाव्यात आणि बेखमीर पिठाच्या व जैतुनाचे तेल लावलेल्या पातळ भाकरी कराव्या. 3त्यांना एका टोपलीत घालून, गोर्हा आणि दोन मेंढ्यांबरोबर सादर कराव्या. 4मग अहरोन व त्याच्या पुत्रांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी आणून त्यांना पाण्याने धुवावे; 5वस्त्रे घ्या आणि अहरोनास अंगरखा व त्याबरोबर एफोदाचा झगा, एफोद, ऊरपट हे परिधान करावे. त्यावर कुशलतेने विणलेल्या कमरपट्ट्याने एफोद बांधावा; 6त्याच्या डोक्यावर फेटा घालावा व त्यास पवित्र मुद्रा जोडून घ्यावी. 7मग अभिषेकाचे तेल घे व त्याच्या डोक्यावर ओतून त्याला अभिषेक करावा. 8त्याच्या पुत्रांनाही झगे घालावे. 9त्यांना फेटे बांधावे. मग अहरोनास व त्याच्या पुत्रांना कमरपट्टे बांधावे. याप्रमाणे याजकत्व कायमचे त्यांचेच असणार.
“मग तू अहरोन व त्याच्या मुलांना अभिषेक करावा.
10“मग सभामंडपाच्या समोर गोर्हा आणावा व त्याच्या डोक्यावर अहरोन व त्याच्या पुत्रांनी आपले हात ठेवावेत. 11सभामंडपाच्या प्रवेशद्वारात, याहवेहच्या समक्षतेत तो गोर्हा वधावा. 12गोर्ह्याचे थोडे रक्त घेऊन ते तू आपल्या बोटांनी वेदीच्या शिंगांवर लावावे व शिल्लक राहिलेले रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे. 13मग त्याच्या आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील लांब पाळ आणि त्यांच्या चरबीसह दोन्ही गुरदे घेऊन ती वेदीवर जाळावी. 14परंतु गोर्ह्याचे मांस व त्याची विष्ठा व त्याची आतडी छावणीबाहेर नेऊन जाळून टाकाव्या. ते पापार्पण#29:14 किंवा शुद्धीकरणाचे अर्पण आहे.
15“मग त्यातील एक मेंढा घ्यावा व अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे. 16मेंढ्याचा वध करावा व त्याचे रक्त वेदीभोवती शिंपडावे. 17मेंढा कापून तुकडे करावेत आणि त्याचे आतील अवयव व पाय धुऊन त्याचे तुकडे व डोके इतर भागांबरोबर ठेवावे. 18मग संपूर्ण मेंढ्याचे वेदीवर होम कर. तो याहवेहसाठी होमार्पण आहे, ते सुवासिक असे, याहवेहसाठी सादर केलेले अन्नार्पण आहे.
19“मग दुसरा मेंढा घ्यावा व अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत. 20मेंढ्याचा वध करून, त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोन व त्याच्या पुत्रांच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्यांना, व उजव्या पायाच्या अंगठ्यांना लावावे, मग रक्त वेदीच्या सभोवती शिंपडावे. 21आणि वेदीवरील काही रक्त व अभिषेकाचे तेल घे व ते अहरोन व त्याच्या वस्त्रांवर व त्याचे पुत्र व त्यांच्या वस्त्रांवर शिंपडावे. मग तो व त्याचे पुत्र आणि त्यांची वस्त्रे पवित्र होतील.
22“मग त्या मेंढ्याची चरबी, त्याचे जाड शेपूट, त्याच्या आतड्यांवरील चरबी, काळजाची लांब पाळ, दोन्ही गुरदे व त्यावरील चरबी व उजवी मांडी घ्यावी; हा समर्पणाचा मेंढा आहे. 23बेखमीर भाकरीची टोपली, जी याहवेहसमोर आहे, त्यातून एक गोल भाकर घे, जैतुनाच्या तेलात मळलेली एक जाड भाकर आणि एक पातळ भाकर घे. 24हे सर्व अहरोन व त्याच्या पुत्रांच्या हातांवर ठेवावे आणि त्यांनी ते याहवेहसमोर हेलावणीचे अर्पण घेऊन त्याची ओवाळणी करावी. 25मग ते त्यांच्या हातातून घेऊन होमार्पणाबरोबर वेदीवर जाळावे, याहवेहला सुवास म्हणून अर्पिलेले अन्नार्पण असे सादर करावे. 26मग अहरोनाच्या समर्पणाकरिता मेंढ्याच्या उराचा भाग घेऊन त्याला ओवाळणीचे अर्पण घेऊन याहवेहसमोर त्याची ओवाळणी कर आणि तो तुझा वाटा राहील.
27“समर्पणाच्या मेंढ्याचे ते भाग म्हणजेच, त्याचे ऊर ज्याची ओवाळणी केली होते व मांडीचा भाग जो सादर केला होता तो अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या मालकीचे आहे, ते भाग पवित्र कर. 28हा नेहमीच इस्राएली लोकांकडून अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी शाश्वत हिस्सा असावा. हे इस्राएली लोकांकडून शांत्यर्पणातून याहवेहस दिलेली वर्गणी असावी.
29“अहरोनाची पवित्र वस्त्रे त्याच्यानंतर त्याच्या वंशजांची व्हावीत अशासाठी की त्यामध्ये त्यांचा अभिषेक व समर्पण व्हावे. 30त्याचा पुत्र जो याजक म्हणून त्याचा वारस होईल आणि सभामंडपात सेवा करण्यासाठी पवित्रस्थानात येईल त्याने ती वस्त्रे सात दिवस अंगात घालावी.
31“समर्पणासाठी असलेला मेंढा घेऊन पवित्र जागी त्याचे मांस शिजवावे. 32मग अहरोन व त्याच्या पुत्रांनी सभामंडपाच्या प्रवेशद्वारात ते मेंढ्याचे मांस टोपलीतील समर्पित भाकरीसह खावी. 33त्यांचे समर्पण आणि पवित्रीकरण करण्यासाठी प्रायश्चित्त केलेले अर्पण त्यांनी खावे. परंतु कोणी परक्याने ते खाऊ नये, कारण ते पवित्र आहे. 34आणि समर्पणाच्या मेंढ्याचे मांस व भाकरीतील काही सकाळपर्यंत उरले तर ते जाळून टाकावे. ते खाऊ नये, कारण ते पवित्र आहे.
35“मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी तू करावे, त्यांच्या समर्पणास सात दिवस घ्यावे. 36पापार्पण म्हणून दररोज तू एक गोर्हा प्रायश्चित्तासाठी अर्पण करावा. वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती शुद्ध करावी व ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक करावा. 37सात दिवस वेदीसाठी प्रायश्चित करून ती पवित्र करावी. मग वेदी परमपवित्र होईल व ज्या कशाचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल.
38“दररोज तू वेदीवर जे अर्पण करावयाचे आहे ते हे: एक वर्षाची दोन कोकरे. 39एक कोकरू सकाळी व दुसरे संध्याकाळी अर्पण करावे. 40पहिल्या कोकराबरोबर कुटून काढलेल्या जैतुनाच्या एक पाव हीन तेलात मळलेल्या पिठाचा एक एफाचा#29:40 एफा अंदाजे 1.6 कि.ग्रॅ. दहावा भाग आणि पेयार्पण म्हणून एक पाव हीन#29:40 हीन अंदाजे 1लीटर द्राक्षारस अर्पण करावे. 41संध्याकाळी दुसरे कोकरू सकाळच्या अर्पणाप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण यासहित अर्पण करावे. हे अन्नार्पण याहवेहसाठी सुवासिक अर्पण आहे.
42“हे होमार्पण येणार्या पिढ्यान् पिढ्या पर्यंत, याहवेहसाठी सभामंडपाच्या प्रवेशद्वारात नित्य करावे. तिथे मी तुला भेटेन व तुझ्याशी बोलेन. 43तिथे मी इस्राएली लोकांना देखील भेटेन आणि ते ठिकाण माझ्या तेजाने पवित्र होईल.
44“तर मी सभामंडप व वेदी पवित्र करेन आणि अहरोन व त्याचे पुत्र यांना याजक म्हणून माझी सेवा करावी यासाठी पवित्र करेन. 45मग मी इस्राएली लोकात राहीन आणि त्यांचा परमेश्वर होईन. 46त्यांना समजेल की, ज्याने त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले तो मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे, यासाठी की, मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी. मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे.”
सध्या निवडलेले:
निर्गम 29: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.