निर्गम 32
32
सोन्याचे वासरू
1मोशेला पर्वतावरून खाली येण्यास उशीर होत आहे असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते अहरोना सभोवती गोळा झाले व म्हणाले, “ये, आमच्यापुढे जातील अशी दैवते आमच्यासाठी बनव. हा मनुष्य ज्याने आम्हाला इजिप्तच्या बाहेर आणले, त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही.”
2अहरोनाने त्यांना उत्तर दिले, “तुमच्या स्त्रिया, तुमचे पुत्र व तुमच्या कन्यांनी घातलेले कानातील सोन्याचे डूल काढून, ते माझ्याकडे आणा.” 3म्हणून सर्व लोकांनी ते कानातील सोन्याचे डूल काढून ते अहरोनाकडे आणले. 4लोकांनी जे अहरोनाच्या हातात दिले, ते घेऊन त्याने हत्याराने कोरून, वासराची ओतीव मूर्ती बनविली. मग ते म्हणाले, “हे इस्राएला, ही तुमचे दैवते आहेत, ज्यांनी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले.”
5अहरोनाने जेव्हा हे पाहिले, तेव्हा त्याने त्या वासरासमोर एक वेदी बांधली व जाहीर केले, “उद्या याहवेहसाठी एक उत्सव करावयाचा आहे.” 6म्हणून दुसर्या दिवशी लोक लवकर उठले आणि होमार्पणाचा यज्ञ केला व शांत्यर्पणे आणले. त्यानंतर त्यांनी बसून खाणेपिणे केले व उठून चैनबाजीची मजा घेऊ लागले.
7मग याहवेह मोशेला म्हणाले, “खाली जा, कारण तुझे लोक, ज्यांना तू इजिप्तमधून बाहेर आणलेस, ते भ्रष्ट झाले आहेत. 8मी त्यांना दिलेल्या आज्ञांपासून ते फार लवकरच फिरले आहेत आणि आपल्यासाठी वासराची ओतीव मूर्ती तयार केली आहे. त्यांनी त्याच्यासमोर नमन केले आहे आणि यज्ञ करून म्हटले आहे, ‘हे इस्राएला, ही तुमची दैवते आहेत, ज्यांनी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर काढले आहे!’ ”
9याहवेह मोशेला पुन्हा म्हणाले, “मी या लोकांना पाहिले आहे, ते ताठ मानेचे लोक आहेत. 10तर आता माझ्या आड येऊ नकोस. माझा राग मी त्यांच्याविरुद्ध भडकवीन आणि मी त्यांचा नाश करेन. मग मी तुला एक मोठे राष्ट्र बनवीन.”
11पण याहवेह त्याचे परमेश्वर यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून विनंती करत मोशे म्हणाला, “याहवेह, तुमचे लोक ज्यांना तुम्ही महान सामर्थ्याने आणि बलवान हाताने इजिप्तमधून बाहेर आणले, त्यांच्याविरुद्ध तुमचा राग का पेटावा? 12इजिप्तच्या लोकांनी असे का म्हणावे की, याहवेहने त्यांना डोंगरात मारून टाकावे व या पृथ्वीतून नाहीसे करावे अशा दुष्ट हेतूने बाहेर काढले? आपल्या तीव्र कोपापासून माघार घ्या; सौम्य व्हा आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणू नका. 13आपले सेवक अब्राहाम, इसहाक व इस्राएल यांची आठवण करा, ज्यांच्याशी आपण स्वतःच्या नावाने शपथ घेतलीः ‘मी तुझे वंशज आकाशातील तार्यांइतके करेन, आणि त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे हा सर्व देश मी त्यांच्या वंशजांना देईन, आणि तो सदासर्वकाळासाठी त्यांचे वतन राहील.’ ” 14तेव्हा याहवेहने त्याविषयी अनुताप केला व जी विपत्ती आपल्या लोकांवर आणण्याचे म्हटले होते ती आणली नाही.
15मग मोशे आपल्या हातात कराराच्या नियमाच्या दोन पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला. त्या पाट्यांवर दोन्ही बाजूंनी, मागे व पुढे लेख कोरलेले होते. 16त्या पाट्या परमेश्वराची कृती होती; तो लेख परमेश्वराची लेखणी होती, जी पाट्यांवर कोरलेली होती.
17जेव्हा यहोशुआने लोकांचा ओरडण्याचा आवाज ऐकला, तो मोशेला म्हणाला, “छावणीत युद्धाचा आवाज आहे.”
18मोशेने उत्तर दिले:
“हा आवाज विजयाचा नाही,
तो आवाज पराजयाचाही नाही;
मला गाण्याचा आवाज ऐकू येत आहे.”
19जेव्हा मोशे छावणीजवळ आला आणि वासरू व नृत्य पाहिले, तेव्हा त्याचा राग पेटला आणि आपल्या हातातील पाट्या फेकून, डोंगराच्या पायथ्याशी फोडून त्यांचा चुराडा केला. 20आणि त्याने ते वासरू घेतले जे लोकांनी घडविले होते व ते अग्नीत जाळून टाकले; मग त्याने त्याची कुटून बारीक पूड केली, ती पाण्यात विरघळून इस्राएलच्या लोकांना प्यायला दिली.
21मग मोशे अहरोनाला म्हणाला, “या लोकांनी तुला काय केले, म्हणून तू त्यांना एवढ्या मोठ्या पापात आणले?”
22अहरोन म्हणाला, “माझ्या स्वामी, क्रोधित होऊ नको, तुला माहीत आहे की हे लोक कसे दुष्टतेकडे प्रवृत्त होतात. 23ते मला म्हणाले, ‘आमच्यापुढे जातील अशी दैवते आमच्यासाठी बनव. हा मनुष्य ज्याने आम्हाला इजिप्तच्या बाहेर आणले, त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही.’ 24म्हणून मी त्यांना म्हणालो, ‘ज्यांच्याकडे सोन्याचे दागिने आहेत ते त्यांनी काढावे.’ मग त्यांनी ते सोने मला दिले, आणि मी ते अग्नीत टाकले, आणि त्यातून हे वासरू बाहेर आले.”
25मोशेने पाहिले की, लोक मोकाट सुटले आहेत आणि त्यांच्या शत्रूंसमोर एक चेष्टेचे कारण बनावे असे अहरोनाने त्यांना मोकळे सोडले आहे. 26म्हणून मोशे छावणीच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहिला व म्हणाला, “जे कोणी याहवेहच्या पक्षाचे आहे, त्यांनी माझ्याकडे यावे.” तेव्हा लेवीचे सर्व लोक त्याच्याकडे आले.
27मग मोशे त्यांना म्हणाला, “याहवेह इस्राएलांचे परमेश्वर असे म्हणतात: ‘प्रत्येकाने आपली तलवार कंबरेस बांधावी. छावणीतून एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत फिरत, प्रत्येकाने आपला भाऊ आणि मित्र व शेजारी यांना जिवे मारून टाकावे.’ ” 28मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे लेवीच्या लोकांनी केले आणि त्या दिवशी अंदाजे तीन हजार लोक मरण पावले. 29तेव्हा मोशे म्हणाला, “आज तुम्ही याहवेहसाठी वेगळे केले गेले आहात आणि याहवेहने आज तुम्हाला आशीर्वाद दिला आहे, कारण तुम्ही आपले पुत्र, भाऊ यांच्याविरुद्ध गेलात.”
30मग दुसर्या दिवशी मोशे लोकांना म्हणाला, “तुम्ही मोठे पाप केले आहे, पण आता मी वर याहवेहकडे जाईन; कदाचित मी तुमच्या पापासाठी प्रायश्चित करू शकेन.”
31मग मोशे याहवेहकडे परत गेला आणि म्हणाला, “अरेरे, या लोकांनी केवढे मोठे पाप केले आहे! त्यांनी आपल्या स्वतःसाठी सोन्याचे दैवत केले आहेत. 32परंतु आता कृपा करून त्यांच्या पापांची क्षमा करा—नाहीतर जे पुस्तक तुम्ही लिहिले आहे, त्यातून माझे नाव मिटवून टाका.”
33तेव्हा याहवेहने मोशेला उत्तर दिले, “ज्यांनी माझ्याविरुद्ध पाप केले आहे, त्यांचीच नावे मी माझ्या पुस्तकातून मिटवून टाकीन. 34आता जा आणि ज्या ठिकाणाविषयी मी बोललो त्याकडे लोकांना चालव आणि माझा दूत तुमच्यापुढे जाईल. तथापि, जेव्हा शिक्षा करण्याची वेळ येईल, तेव्हा मी त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा देईन.”
35अहरोनाने केलेल्या वासराशी लोकांनी जे केले होते त्यासाठी याहवेहने त्यांच्यावर पीडा आणून त्यांना शासन केले.
सध्या निवडलेले:
निर्गम 32: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.