यहेज्केल 10
10
परमेश्वराचे तेज मंदिरातून नाहीसे होते
1मग मी पाहिले आणि करुबांच्या डोक्यावर असलेल्या घुमटावर नीलमण्यासारखे दिसणारे सिंहासन मला दिसले. 2तेव्हा तागाची वस्त्रे घातलेल्या पुरुषाला याहवेहने म्हटले, “करुबाखालच्या चाकांमधून जा आणि करुबांच्या मधील जळत्या निखार्यांनी आपली ओंजळ भर आणि ते शहरात पसरून टाक.” मी पाहत असता, तो आत गेला.
3तो मनुष्य आत गेला, तेव्हा करूब मंदिराच्या दक्षिणेकडे उभे होते आणि आतील अंगण ढगांनी भरून गेले. 4मग याहवेहचे वैभव करुबांवरून उठले आणि मंदिराच्या उंबरठ्याकडे गेले. मंदिर ढगांनी भरले आणि याहवेहच्या तेजाच्या प्रकाशाने अंगण भरले. 5करुबांच्या पंखांचा आवाज बाहेरील अंगणात ऐकू येत होता, तो तर सर्वसमर्थ परमेश्वर#10:5 इब्रीमध्ये एल-शद्दाय बोलतात असा त्यांच्या वाणीसारखा होता.
6जेव्हा याहवेहने तागाची वस्त्रे परिधान केलेल्या पुरुषाला आज्ञा दिली, “चाकांच्या मधून, करुबांच्या मधून अग्नी घे,” तो पुरुष जाऊन एका चाकाच्या बाजूला उभा राहिला. 7तेव्हा करुबातील एकाने त्यांच्यामध्ये जो अग्नी होता त्याकडे आपला हात लांब केला. त्याने त्यातील काही इंगळ घेतले व तागाची वस्त्रे घातलेल्या पुरुषाच्या हातात ठेवले, त्याने ते घेतले आणि बाहेर गेला. 8(करुबांच्या पंखाखाली मनुष्याच्या हातासारखे दिसणारे काहीतरी होते.)
9मी पाहिले, करुबांच्या बाजूला चार चाके, प्रत्येक करुबाच्या बाजूला एक चाक; आणि ती चाके पुष्कराजसारखी चकाकत होती. 10ती चारही चाके सारखीच दिसत होती; प्रत्येक चाक जसे दुसर्या चाकातून छेदून जात होती. 11जेव्हा करूब पुढे जात असे, तेव्हा त्यांची तोंडे ज्या दिशेने होती त्या चार दिशांपैकी एका दिशेने चाके जात; करूब जात असताना चाके इकडे तिकडे वळत नसत#10:11 किंवा बाजूला. आणि ते ज्या दिशेने त्यांचे तोंड आहे त्याच दिशेने, कुठेही न वळता जात असत. 12त्यांची पाठ, त्यांचे हात आणि त्यांचे पंख यांच्यासह त्यांच्या संपूर्ण शरीरावर डोळे होते, त्यांच्या चाकांवर सुद्धा डोळे होते. 13“गरगर फिरणारी चाके” असे त्या चाकांना म्हटले गेलेले मी ऐकले. 14प्रत्येक करुबाला चार तोंडे होती: एक करुबाचे होते, दुसरे मनुष्याच्या तोंडासारखे, तिसरे सिंहासारखे व चौथे गरुडासारखे होते.
15नंतर करूब वर उठले. हे तर तेच जिवंत प्राणी होते जे मी खेबर नदीकाठी पाहिले होते. 16जेव्हा करूब पुढे निघाले, त्यांच्या बाजूला असलेली चाकेसुद्धा पुढे जात; आणि जमिनीवरून उठण्यासाठी जेव्हा करूब आपले पंख पसरवित असे, चाके आपली बाजू सोडत नसत. 17करूब जेव्हा स्थिर उभे राहात, ते सुद्धा स्थिर उभे राहात असत; आणि जेव्हा करूब उठत असे, ते त्यांच्याबरोबर उठत, कारण जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांमध्ये होता.
18मग याहवेहचे वैभव मंदिराच्या उंबरठ्यावरून निघाले आणि करुबांवर जाऊन थांबले. 19मी पाहत असता, करुबांनी आपली पंखे पसरली आणि जमिनीवरून उठले, ते पुढे जात असता, चाकेही त्यांच्याबरोबर गेली. ते याहवेहच्या भवनाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडे थांबले, आणि इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव त्यांच्यावर होते.
20हे तेच जिवंत प्राणी होते ज्यांना मी इस्राएलच्या परमेश्वराच्या आसनाखाली खेबर नदीकाठी पाहिले होते, आणि मला समजले की हे तेच करूब आहेत. 21प्रत्येकाला चार तोंडे व चार पंख होते आणि त्यांच्या पंखाखाली मानवी हातांसारखे काहीतरी होते. 22त्यांच्या मुखाचे स्वरूप तर मी खेबर नदीकाठी पाहिले होते तसेच होते. प्रत्येकजण पुढे सरळ चालत असे.
सध्या निवडलेले:
यहेज्केल 10: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.