YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 9

9
मूर्तिपूजकांचा न्याय
1नंतर मी त्याला उंच आवाजात बोलताना ऐकले, “शहरावर न्यायनिवाडा आणण्यासाठी ज्यांना नेमले आहे त्यांना बोलवा, प्रत्येकाच्या हाती शस्त्र असावे.” 2आणि वरील दरवाजा, ज्याचे मुख उत्तरेकडे होते त्या दिशेकडून सहा पुरुष येत असलेले मी पाहिले, प्रत्येकाच्या हाती घातक शस्त्रे होती. त्यांच्याबरोबर एक पुरुष होता ज्याने तागाची वस्त्रे घातली होती व त्याच्याकडे लेखन सामुग्री होती. ते येऊन कास्य वेदीजवळ उभे राहिले.
3आता करुबांवर असलेले इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव तिथून वर जाऊन, मंदिराच्या उंबरठ्यावर आले. तेव्हा ज्या पुरुषाने तागाची वस्त्रे घातली होती व ज्याच्याकडे लेखन सामुग्री होती, त्याला याहवेहने बोलाविले 4आणि याहवेहने त्याला म्हटले, “संपूर्ण यरुशलेम शहरातून जा आणि त्यात अमंगळ कृत्ये केल्याबद्दल जे दुःख व विलाप करतात त्यांच्या कपाळावर एक चिन्ह कर.”
5मी हे ऐकत असताना, याहवेहने बाकीच्यांना म्हटले, “त्याच्यामागे शहरात जा आणि दया किंवा सहानुभूती न दाखविता त्यांना मारून टाका. 6वयस्कर पुरुष, तरुण पुरुष व स्त्रिया, आई व लेकरे सर्वांची कत्तल करा, परंतु ज्यांच्या कपाळावर चिन्ह केलेले आहे त्यांना स्पर्श करू नका. माझ्या पवित्रस्थानापासून सुरुवात करा.” तेव्हा त्यांनी त्या वयस्क पुरुषांपासून सुरुवात केली जे मंदिराच्या समोर होते.
7मग तो म्हणाला, “मंदिर भ्रष्ट करा आणि वधलेल्यांनी अंगणे भरून टाका. जा!” तेव्हा ते बाहेर गेले आणि शहरात सर्वत्र लोकांना मारू लागले. 8ते लोकांना मारीत असताना मी एकटाच होतो, मी उपडा पडून मोठ्याने रडलो, “हाय हाय, सार्वभौम याहवेह! यरुशलेमवर आपण आपला कोप ओतून उरलेल्या सर्वच इस्राएली लोकांचा नाश करणार आहात काय?”
9याहवेहने मला म्हटले, “इस्राएल व यहूदीयाच्या लोकांचे अपराध फारच घोर आहेत; देश रक्तपाताने व शहर अन्यायाने भरले आहे. ते म्हणतात, ‘याहवेहने देशाला सोडून टाकले आहे; आणि याहवेह पाहत नाही.’ 10म्हणून मी त्यांना दयेने पाहणार नाही किंवा त्यांची गय करणार नाही, आणि त्यांनी जे काही केले आहे ते मी त्यांच्याच डोक्यावर आणणार आहे.”
11तेव्हा लेखन सामुग्री जवळ असलेला, तागाची वस्त्रे घातलेल्या पुरुषाने येऊन सांगितले, “आपण आज्ञापिल्याप्रमाणे मी केले आहे.”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 9: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन