यहेज्केल 19
19
इस्राएलच्या राजपुत्रांसाठी विलाप
1“इस्राएलच्या राजपुत्रांसाठी विलाप कर 2आणि म्हण:
“ ‘तुझी आई सिंहांमध्ये
सिंहीण होती!
ती त्यांच्यामध्ये वसत होती
आणि तिने तिच्या पिल्लांचे संगोपन केले.
3तिच्या पिल्लांपैकी एकाला तिने वाढवले,
आणि तो एक बलवान सिंह झाला.
तो शिकार फाडण्यास शिकला
आणि तो नर-भक्षक झाला.
4तेव्हा राष्ट्रांनी त्याच्याविषयी ऐकले,
आणि तो त्यांच्या खड्ड्यात अडकला गेला.
त्यांनी त्याला फासात अडकवून
इजिप्त देशात नेले.
5“ ‘जेव्हा त्या सिंहिणीने आपल्या भग्न होत असलेल्या आशा पहिल्या,
तिच्या अपेक्षा गेल्या,
तिने तिच्या पिल्लांमधून अजून एक पिल्लू घेतले
आणि त्याला बलवान सिंह बनविले.
6तो इतर सिंहांमध्ये फिरू लागला,
कारण तो आता बलवान सिंह होता.
तो शिकार फाडण्यास शिकला
आणि तो नर-भक्षक झाला.
7त्याने त्यांचे किल्ले मोडले#19:7 काही मूळ प्रतींनुसार त्याने पाहिले
आणि त्यांची नगरे उद्ध्वस्त केली.
तो देश व त्यातील राहणारे सर्वजण
त्याच्या गर्जनेने भयभीत झाले.
8तेव्हा इतर राष्ट्र
व सभोवतालचे प्रांत त्याच्याविरुद्ध आले,
त्यांनी त्याच्यासाठी जाळे पसरले,
आणि तो त्यांच्या खड्ड्यात अडकला.
9त्यांनी त्याला आकड्याने ओढून पिंजर्यात टाकले
आणि त्याला बाबेलच्या राजाकडे आणले.
त्याने त्याला तुरुंगात ठेवले,
म्हणून इस्राएलच्या पर्वतांवर
त्याची गर्जना पुन्हा ऐकू आली नाही.
10“ ‘तुमची आई तुमच्या द्राक्षमळ्यात#19:10 किंवा तुमच्या रक्तात
पाण्याजवळ लावलेल्या द्राक्षवेलीप्रमाणे होती;
विपुल पाण्यामुळे
ती फलदायी व फांद्यांनी भरलेली होती.
11तिच्या फांद्या मजबूत असून,
अधिकार्याच्या राजदंडासाठी योग्य होत्या.
झाडाच्या दाट पानांच्या वर
त्या उंच वाढल्या,
तिची उंची व तिच्या पुष्कळ फांद्यांमुळे
ती उल्लेखनीय दिसत होती.
12परंतु क्रोधामुळे ती समूळ उपटली जाऊन
जमिनीवर फेकण्यात आली.
पूर्वेकडील वार्याने ती वाळून गेली,
तिची फळे गळून पडली;
तिच्या मजबूत फांद्या वाळून गेल्या
आणि अग्नीने त्या भस्म केल्या.
13आता ती वेल वाळवंटात,
कोरड्या व तहानेल्या भूमीवर लावली आहे.
14तिच्या एका मुख्य फांदीमधून#19:14 किंवा च्या खालून अग्नी पसरला
आणि तिचे फळ भस्म केले.
अधिकार्याच्या राजदंडासाठी योग्य अशी
एकही मजबूत फांदी तिच्यावर राहिली नाही.’
हे विलापगीत आहे आणि विलापगीत म्हणूनच त्याचा उपयोग व्हावा.”
सध्या निवडलेले:
यहेज्केल 19: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.