यहेज्केल 20
20
बंडखोर इस्राएल लोकांचे प्रायश्चित
1सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, इस्राएलातील काही वडील लोक याहवेहकडून विचारण्यास आले आणि ते माझ्यापुढे बसले.
2तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 3“मानवपुत्रा, इस्राएलाच्या वडिलांशी बोल आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्याकडून विचारपूस करण्यास तुम्ही आला आहात काय? माझ्या जिवाची शपथ, मी तुम्हाला माझ्याकडे विचारपूस करू देणार नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’
4“तू त्यांचा न्याय करशील काय? हे मानवपुत्रा, तू त्यांचा न्याय करशील काय? तर त्यांच्या पूर्वजांच्या अमंगळ कृत्यांविषयी त्यांचा निषेध कर 5आणि त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएलची मी निवड केली, त्या दिवशी, मी शपथ घेतली व याकोबाच्या वंशजांकडे आपला हात उंच केला व मी स्वतः इजिप्तमध्ये त्यांना प्रकट झालो. उंचावलेल्या हाताने मी त्यांना म्हटले, “मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.” 6त्या दिवशी मी त्यांच्याशी शपथ वाहिली की मी त्यांना इजिप्तमधून जो देश मी त्यांच्यासाठी शोधला आहे, जिथे दूध व मध वाहते अशा देशात मी त्यांना आणेन, जो सर्व देशांपेक्षा अति सुंदर आहे. 7आणि मी त्यांना म्हटले, “तुम्ही प्रत्येकाने ज्या घृणास्पद मूर्तींवर आपली नजर लावली आहे, त्या टाकून द्या, आणि इजिप्तच्या मूर्तींनी स्वतःस विटाळू नका. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”
8“ ‘परंतु त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केले आणि माझा शब्द मानला नाही; ज्या घृणास्पद मूर्तींवर त्यांनी आपली नजर लावली होती, त्यांना त्यांनी टाकून दिले नाही, ना त्यांनी इजिप्तच्या मूर्तींचा त्याग केला. त्यामुळे मी म्हणालो मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन आणि इजिप्तमध्ये मी त्यांच्यावर माझा कोप दाखवेन. 9परंतु माझ्या नावासाठी मी त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले. ज्या लोकांमध्ये ते राहिले आणि ज्यांच्यासमोर मी इस्राएली लोकांना प्रकट झालो, त्यांच्या दृष्टीत माझ्या नावाचा अनादर होऊ नये म्हणून मी असे केले 10म्हणून त्यांना मी इजिप्तमधून काढले आणि त्यांना रानात आणले. 11त्यांना मी माझे विधी दिले आणि त्यांना माझे नियम कळविले, ज्यामुळे जे लोक त्याचे पालन करतील ते जगतील. 12त्याचप्रमाणे आमच्यामधील चिन्ह म्हणून मी त्यांना माझा शब्बाथ दिला, यासाठी की त्यांनी जाणावे की मी याहवेहने त्यांना पवित्र केले आहे.
13“ ‘तरीही इस्राएली लोकांनी रानात माझ्याविरुद्ध बंड केले. त्यांनी माझे विधी पाळले नाही तर माझ्या नियमांचा धिक्कार केला; ज्यामुळे ज्यांनी नियमाचे पालन केले असते ते जगले असते; आणि त्यांनी माझ्या शब्बाथाला पूर्णपणे अपवित्र केले. म्हणून मी म्हणालो मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतेन आणि रानात त्यांचा नाश करेन. 14परंतु ज्या राष्ट्रांदेखत मी त्यांना बाहेर आणले त्यांच्या दृष्टीत माझ्या नावाचा अनादर होऊ नये म्हणून मी माझ्या नावासाठी असे केले. 15आणि रानात माझा हात उंच करून मी त्यांच्याशी शपथ वाहिली की दूध व मध वाहणारा देश; जो सर्वात सुंदर देश मी त्यांना देऊ केला होतात, त्यात मी त्यांना नेणार नाही; 16कारण त्यांनी माझ्या नियमांचा धिक्कार केला आणि माझ्या विधींचे पालन केले नाही आणि माझे शब्बाथ विटाळले. कारण त्यांचे हृदय त्यांच्या मूर्तींकडे लागलेले होते. 17तरीही मी त्यांच्याकडे दयेने पाहिले आणि रानात मी त्यांचा नाश करून त्यांचा शेवट केला नाही. 18त्यांच्या लेकरांना मी रानात म्हटले, “तुमच्या आईवडिलांच्या कायद्याचे अनुसरण करू नका किंवा त्यांचे नियम पाळू नका व त्यांच्या मूर्तींमुळे तुम्हास विटाळू नका. 19मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; माझ्या विधींचे अनुसरण करा आणि काळजीपूर्वक माझे नियम पाळा. 20माझे शब्बाथ पवित्र माना, यासाठी की ते आपल्यातील चिन्ह असावे. मग तुम्ही जाणाल की मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”
21“ ‘परंतु त्यांच्या लेकरांनी माझ्याविरुद्ध बंड केले: त्यांनी माझ्या विधींचे अनुसरण केले नाही, माझे नियम त्यांनी काळजीपूर्वक पाळले नाही, ज्याविषयी मी म्हटले होते, “की जे त्याचे पालन करतील ते त्यानुसार जगतील,” आणि त्या लोकांनी माझे शब्बाथ विटाळले. म्हणून मी म्हणालो मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतेन आणि रानात माझा कोप त्यांच्याविरुद्ध दाखवेन. 22तरीही मी माझा हात आवरला आणि ज्या राष्ट्रांदेखत मी त्यांना बाहेर आणले त्यांच्या दृष्टीत माझ्या नावाचा अनादर होऊ नये म्हणून मी माझ्या नावासाठी असे केले. 23आणि उंचावलेल्या हाताने मी त्यांच्याशी रानात शपथ वाहिली, की राष्ट्रांमध्ये मी त्यांची पांगापांग करेन आणि देशांमध्ये मी त्यांना विखरेन, 24कारण त्यांनी माझे नियम पाळले नाहीत, तर माझ्या विधींचा धिक्कार केला व माझे शब्बाथ विटाळले आणि त्यांच्या डोळ्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या मूर्तींची वासना बाळगली. 25म्हणून मी त्यांना इतर जे चांगले नाहीत असे कायदे दिले आणि असे नियम ज्यामुळे ते जगणार नाहीत; 26त्यांच्याच भेटींनी मी त्यांना अशुद्ध केले; म्हणजेच प्रत्येक प्रथम जन्मलेल्याचा यज्ञ अशासाठी की मी त्यांना भयाने भरावे, म्हणजे ते जाणतील की मीच याहवेह आहे.’
27“म्हणून हे मानवपुत्रा, इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: याबाबतीत तुमच्या पूर्वजांनी सुद्धा माझ्याशी अविश्वासू राहून दुर्भाषण केले होते: 28जो देश मी त्यांना शपथ वाहून देऊ केला होता, त्यात जेव्हा मी त्यांना आणले आणि त्यांनी एखादे उंच डोंगर किंवा दाट पानांनी भरलेले झाड पाहिले, तिथे त्यांनी यज्ञ केले, माझा राग पेटेल अशी अर्पणे त्यांनी केली, त्यांचे सुवासिक धूप सादर करीत त्यांची पेयार्पणे ओतली. 29तेव्हा मी त्यांना म्हणालो: हे उच्च पूजास्थान जिथे तुम्ही जाता ते काय आहे?’ ” (आजवर त्या ठिकाणास बामाह#20:29 बामाह म्हणजे उच्च स्थान. म्हणतात.)
बंडखोर इस्राएलचे नवीनीकरण
30“म्हणून इस्राएली लोकांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुमच्या पूर्वजांप्रमाणे तुम्हीदेखील स्वतःला अशुद्ध करून आणि त्यांच्या घृणास्पद मूर्तींची वासना बाळगणार काय? 31जेव्हा तुम्ही तुमच्या भेटी सादर करता, म्हणजेच तुमच्या लेकरांचा अग्नीत यज्ञ करता; तुम्ही तुमच्या मूर्तींमुळे असेच स्वतःला अशुद्ध करीत राहता. अहो इस्राएल लोकहो, तुम्ही माझ्याकडे विचारपूस करावी असे मी होऊ द्यावे काय? सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, मी तुम्हाला माझ्याकडे विचारपूस करू देणार नाही.
32“ ‘तुम्ही म्हणता, “राष्ट्रांप्रमाणे, जगाच्या लोकांप्रमाणे आम्हाला व्हायचे आहे, जे लाकूड व दगडाची सेवा करतात.” परंतु तुमच्या मनात जे आहे, ते कधीही घडणार नाही. 33सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, बलवान हाताने, उगारलेल्या बाहूने व क्रोधाची वृष्टी करीत मी तुमच्यावर राज्य करेन. 34मी तुम्हाला राष्ट्रांमधून आणेन आणि ज्या ठिकाणी तुम्ही पांगला आहात त्या देशांमधून; बलवान हाताने, उगारलेल्या बाहूने व क्रोधवृष्टी करीत मी तुम्हाला एकत्र करेन. 35राष्ट्रांच्या रानात मी तुम्हाला आणेन आणि तिथे समोरासमोर मी तुमचा न्याय करेन. 36इजिप्त देशाच्या रानात जसा मी तुमच्या पूर्वजांचा न्याय केला, तसाच मी तुमचा न्याय करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. 37माझ्या काठीखालून तुम्ही जात असता मी बारकाईने तुम्हाला पाहीन आणि तुम्हाला कराराच्या बंधनात आणेन. 38जे माझ्याविरुद्ध उठतात आणि बंड करतात त्यांच्यापासून मी तुम्हाला वेगळे करेन. जरी ज्या देशात ते राहतात तिथून मी त्यांना बाहेर आणेन, तरीही इस्राएल देशात ते प्रवेश करणार नाहीत. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
39“ ‘अहो इस्राएली लोकहो, तुमच्याविषयी म्हटले तर, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जा तुम्ही प्रत्येकजण तुमच्या मूर्तींची सेवा करा! परंतु त्यानंतर तुम्ही खचितच माझे ऐकाल आणि तुमच्या भेटींनी व मूर्तींनी माझे नाव आणखी अपवित्र करणार नाही. 40कारण सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या पवित्र पर्वतावर, इस्राएलातील उंच पर्वतावर त्या भूमीवर इस्राएलचे सर्व लोक माझी सेवा करतील आणि तिथे मी त्यांचा स्वीकार करेन. तिथे तुमच्या सर्व पवित्र यज्ञांबरोबर तुमची अर्पणे व तुमच्या उत्तम भेटी#20:40 किंवा तुमच्या प्रथमफळांच्या भेटी मी मागेन. 41जेव्हा मी तुम्हाला राष्ट्रांतून बाहेर आणेन आणि ज्या देशांमध्ये तुमची पांगापांग झाली तिथून मी तुम्हाला एकत्र करेन, तेव्हा सुवासिक धुपाप्रमाणे मी तुम्हाला स्वीकारेन आणि मी तुमच्याद्वारे राष्ट्रांदेखत पवित्र मानला जाईन. 42जेव्हा इस्राएल देश, जो देश मी माझा हात उंच करून तुम्हाला शपथ वाहून दिला होता त्यात मी तुम्हाला आणेन, तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. 43तिथे तुम्ही तुमचे वर्तन व तुमची कृत्ये, ज्यामुळे तुम्ही स्वतःस भ्रष्ट केले त्यांची आठवण कराल आणि ज्या सर्व वाईट गोष्टी तुम्ही केल्या त्यामुळे तुम्ही स्वतःचा वीट कराल. 44इस्राएलाच्या घराण्या तुमचे वाईट मार्ग आणि दुष्कर्मांनुसार नाही तर माझ्या नामाकरिता मी तुमच्याशी वागेन, तेव्हा तुम्ही जाणाल मीच याहवेह आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
दक्षिणेविरुद्ध भविष्यवाणी
45याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 46“मानवपुत्रा, दक्षिणेकडे आपले तोंड कर; दक्षिणेविरुद्ध संदेश दे आणि दक्षिण भूमीच्या वनाविरुद्ध भविष्यवाणी कर. 47दक्षिणेच्या वनाला सांग: ‘याहवेहचा शब्द ऐका. सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी तुझ्यावर अग्नी पाठविणार आहे आणि तो तुझ्या सर्व झाडांना भस्म करेल, ते हिरवे असो वा वाळलेले. ती धगधगती आग विझणार नाही आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत प्रत्येक चेहरा त्यामुळे भाजेल. 48प्रत्येकजण पाहील की मी याहवेहने अग्नी पेटविला आहे; तो विझणार नाही.’ ”
49मग मी म्हणालो, “हे सार्वभौम याहवेह, माझ्याविषयी हे लोक म्हणतात, ‘हा केवळ दाखलेच सांगत नाही ना?’ ”
सध्या निवडलेले:
यहेज्केल 20: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.