YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 3

3
1आणि तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आहे ते खा, ही गुंडाळी खा; नंतर इस्राएली लोकांशी बोल.” 2तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला खाण्यासाठी गुंडाळी दिली.
3तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही जी गुंडाळी मी तुला देत आहे ती पोटभरून खा.” म्हणून ती मी खाल्ली आणि ती माझ्या तोंडात मधासारखी गोड लागली.
4नंतर तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, आता इस्राएली लोकांकडे जा आणि त्यांना माझी वचने सांग. 5अस्पष्ट बोलीच्या किंवा अनोळखी भाषेच्या लोकांकडे नाही, तर इस्राएली लोकांकडे तुला पाठवले जात आहे; 6दुर्बोध किंवा अनोळखी भाषेचे पुष्कळ लोक, ज्यांची भाषा तुला समजत नाही, त्यांच्याकडे नाही. खचितच जर त्यांच्याकडे मी तुला पाठवले तर त्यांनी तुझे ऐकले असते. 7परंतु इस्राएल लोक तुझे ऐकत नाही कारण ते माझे वचन ऐकू इच्छित नाही, कारण सर्व इस्राएली लोक कठोर व हट्टी आहेत. 8पण मी तुला त्यांच्यासारखाच निग्रही व कठोर बनवीन. 9मी तुझे कपाळ हिऱ्यापेक्षा अधिक कठोर, गारगोटीपेक्षा कठीण करेन, जरी ते बंडखोर लोक आहेत तरी त्यांना भयभीत होऊ नको; किंवा घाबरू नको.”
10आणि तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, मी तुझ्याशी जी वचने बोलतो ती काळजीपूर्वक ऐक आणि आपल्या हृदयात जपून ठेव. 11तर आता निर्वासित असलेल्या तुझ्या लोकांकडे जा आणि त्यांच्याशी बोल. त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात,’ मग ते तुझे ऐको किंवा न ऐकोत.”
12मग आत्म्याने मला वर उचलले आणि माझ्या पाठीमागून मोठ्या गर्जनेचा मी आवाज ऐकला, जेव्हा धन्य याहवेहचे वैभव आपल्या स्थानातून उठले.#3:12 काही मूळ प्रतींनुसार या स्थानातून याहवेहच्या वैभवाची स्तुती होवो 13हा त्या जिवंत प्राण्यांच्या पंखांचा आवाज होता, जे एकमेकांच्या पंखांना घासत होते आणि त्याच्या बाजूंना असलेल्या चाकांचा मोठ्या गर्जनेचा आवाज होता. 14तेव्हा आत्म्याने मला वर उचलले आणि मी माझ्या आत्म्यात कटूत्व व रागाने भरून दूर गेलो आणि याहवेहचा मजबूत हात माझ्यावर होता. 15खेबर नदीजवळ तेल-अवीवकडे राहत असलेल्या निर्वासित लोकांकडे मी आलो आणि ते जिथे राहत होते, तिथे त्यांच्याबरोबर; मी अतिदुःखाने सात दिवस बसलो.
यहेज्केलची पहारेकरी म्हणून कामगिरी
16सात दिवसांच्या शेवटी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 17“मानवपुत्रा, मी तुला इस्राएली लोकांचा पहारेकरी केले आहे; तर जे वचन मी सांगतो ते ऐक आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर. 18जेव्हा मी दुष्टाला म्हणतो, ‘तू खचितच मरशील,’ आणि त्या व्यक्तीने आपल्या मार्गांपासून वळावे म्हणून तू त्यांना चेतावणी दिली नाहीस किंवा त्यांनी त्यांचे दुष्टमार्ग सोडून त्यांचा जीव वाचवावा म्हणून तू त्यांना सांगितले नाहीस, तर ते दुष्ट व्यक्ती त्यांच्या पापामुळे मरतील आणि त्यांच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन. 19परंतु त्या दुष्ट व्यक्तीने त्याच्या दुष्टाईपासून व त्यांच्या कुमार्गापासून वळावे म्हणून तू त्याला सावध केलेस आणि ते तसे करीत नाहीत, तर ते त्यांच्या पापामुळे मरतील; परंतु तू स्वतः वाचशील.
20“त्याच प्रकारे, जेव्हा एखादा न्यायी आपल्या न्यायत्वापासून मागे फिरतो आणि जे वाईट ते करतो आणि मी त्यांच्यापुढे एक अडखळण ठेवेन आणि तो मरण पावेल. कारण तू त्याला चेतावणी दिली नाही, तो त्याच्या पापामुळे मरेल. जी न्यायीपणाची कृत्ये त्या व्यक्तीने केली ती आठवली जाणार नाहीत, आणि त्याच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन. 21परंतु पाप करू नये म्हणून तू त्या न्यायी व्यक्तीला चेतावणी दिली आणि त्याने पाप केले नाही आणि त्याने ती चेतावणी स्वीकारली म्हणून तो खचितच जगेल आणि तू स्वतःला वाचवशील.”
22त्या ठिकाणी याहवेहचा हात माझ्यावर होता, आणि ते मला म्हणाले, “ऊठ आणि मैदानाकडे जा, तिथे मी तुझ्याशी बोलेन.” 23तेव्हा मी उठलो व मैदानाकडे गेलो. आणि मी खेबर नदीकाठी पाहिलेल्या वैभवासारखे याहवेहचे वैभव तिथे उभे होते आणि मी उपडा पडलो.
24नंतर आत्मा माझ्यामध्ये आला आणि मला माझ्या पायावर उभे केले. याहवेह माझ्याशी बोलले आणि म्हणाले: “जा, स्वतःला आपल्या घरात बंद करून घे. 25आणि तू हे मानवपुत्रा, ते तुला दोर्‍यांनी बांधतील; तू लोकांमध्ये बाहेर जाऊ नये म्हणून तुला बांधले जाईल. 26तू शांत असावे आणि त्यांचा निषेध करू नये म्हणून तुझी जीभ तुझ्या टाळूला चिकटेल असे मी करेन, कारण ते बंडखोर लोक आहेत. 27परंतु मी तुझ्याशी बोलेन, तेव्हा मी तुझे मुख उघडेन आणि तू त्यांना सांगशील, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’ ज्याला ऐकावयाचे आहे ते ऐकतील आणि ज्याला ऐकावयाचे नसेल त्याने ऐकू नये; कारण ते बंडखोर लोक आहेत.

सध्या निवडलेले:

यहेज्केल 3: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन