यहेज्केल 4
4
यरुशलेमच्या वेढ्याचे प्रतीक
1“आता हे मानवपुत्रा, ओल्या मातीची एक वीट घे आणि ती तुझ्यापुढे ठेव व तिच्यावर यरुशलेम शहराचे चित्र काढ. 2नंतर त्याला वेढा टाक: ज्याच्यासमोर वेढ्याचे काम चालू आहे, त्याच्यावर एक उतार रच, त्याच्यासमोर डेरे मांड व त्याच्या सभोवती युद्धाची यंत्रे बनविली आहेत, असे चित्र त्या विटेवर काढ. 3नंतर एक लोखंडी कढई घे; ती तुझ्यामध्ये व शहरामध्ये लोखंडी भिंतीप्रमाणे ठेव आणि आपले तोंड त्याकडे कर. ती वेढ्यात आहे आणि तू तिला वेढा देशील. हे इस्राएली लोकांस एक चिन्ह म्हणून असेल.
4“त्यानंतर तू आपल्या डाव्या कूशीवर पड आणि इस्राएली लोकांचे पाप आपल्या स्वतःवर ठेव. जितके दिवस तू एका कूशीवर पडशील तितके दिवस त्यांच्या पापाचा भार तू वाहशील. 5त्यांच्या पापाच्या वर्षांइतके दिवस मी तुला ठरवून देत आहे. म्हणून तीनशे नव्वद दिवस तू इस्राएली लोकांच्या पापाचा भार वाहशील.
6“हे संपवल्यानंतर, परंतु यावेळी आपल्या उजव्या कूशीवर तू पुन्हा पड आणि यहूदीयाच्या लोकांच्या पापाचा भार वाहा. त्यासाठी प्रत्येक वर्षासाठी एक दिवस असे चाळीस दिवस मी तुला नेमून दिले आहेत. 7मग तू यरुशलेमच्या वेढ्याकडे तोंड वळव आणि उघड्या हातांनी तिच्याविरुद्ध भविष्य सांग. 8मी तुला दोर्यांनी बांधीन म्हणजे तुझे वेढा घालण्याचे दिवस संपेपर्यंत तू एका कूशीवरून दुसर्या कूशीवर वळू शकणार नाहीस.
9“तू गहू, जव, शेंगा, डाळ, बाजरी आणि खपल्या गहू घे; आणि ते एका पात्रात साठव व त्याची भाकर बनवण्यासाठी त्याचा वापर कर. तुझ्या कूशीवर निजलेले असताना तीनशे नव्वद दिवस तुला ती खावयाची आहे. 10प्रत्येक दिवसासाठी वीस शेकेल#4:10 अंदाजे 230 ग्रॅ. अन्न वजन करून खा आणि ते ठरविलेल्या वेळेतच खा. 11त्याचप्रमाणे हिनाचा सहावा भाग#4:11 अंदाजे 0.6 लीटर पाणी घेऊन तेही नेमलेल्या वेळेतच पी. 12जवाच्या भाकरीप्रमाणे ती तू खा; ती भाजण्यासाठी इंधन म्हणून तू ती मानवी विष्ठेवर लोकांसमोर भाज.” 13याहवेह म्हणतात, “याप्रकारे ज्या राष्ट्रांमध्ये मी त्यांना घालवून देईन तिथे इस्राएली लोक अमंगळ अन्न खातील.”
14तेव्हा मी म्हणालो, “हे सार्वभौम याहवेह, असे नको! मी स्वतःला कधी विटाळले नाही. माझ्या लहानपणापासून आजपर्यंत मेलेले किंवा जंगली जनावरांनी फाडलेले असे मी काहीही खाल्ले नाही. कोणतेही अशुद्ध मांस माझ्या मुखात कधीही गेले नाही.”
15तेव्हा याहवेहने म्हटले, “तर मग ठीक आहे, मानवी विष्ठेऐवजी गाईच्या शेणावर आपली भाकरी भाजण्यास मी तुला परवानगी देतो.”
16नंतर याहवेहने मला म्हटले: “हे मानवपुत्रा, यरुशलेममध्ये मी भाकरीचा पुरवठा खंडित करणार आहे. लोक कष्टी होऊन तोलून अन्न खातील आणि निराशेने पाणी मापून पितील. 17कारण अन्नाची व पाण्याची तूट पडेल. ते एकमेकांना पाहून घाबरतील आणि आपल्या पापामुळे#4:17 किंवा त्यांच्या पापातच नाश पावतील.
सध्या निवडलेले:
यहेज्केल 4: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.