YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 41

41
फारोहचे स्वप्न
1दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर, एके रात्री फारोहला स्वप्न पडले. तो नाईल नदीच्या काठावर उभा होता. 2तेवढ्यात एकाएकी नाईल नदीतून चांगल्या धष्टपुष्ट दिसणार्‍या सात गाई वर आल्या आणि लव्हाळ्यात चरू लागल्या. 3नंतर नाईलमधून दुसर्‍या सात गाई आल्या; त्या अगदी कुरूप व दुबळ्या होत्या आणि नदीकाठी असलेल्या गाईंच्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या. 4मग त्या सात दुबळ्या गाईंनी त्या धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. यावर फारोहची झोपमोड झाली.
5यानंतर तो पुन्हा झोपी गेला आणि त्याला पुन्हा दुसरे स्वप्न पडले: एकाच ताटाला टपोर्‍या दाण्यांची भरदार सात कणसे त्याने पाहिली. 6मग आणखी सात कणसे उगवली, पण ही वाळून गेलेली आणि पूर्वेच्या वार्‍याने कोमेजून गेलेली होती. 7या सात अशक्त कणसांनी टपोर्‍या दाण्यांची ती भरदार कणसे गिळून टाकली. नंतर फारोह जागा झाला आणि हे सर्व स्वप्न होते हे त्याला समजले.
8दुसर्‍या दिवशी सकाळी, स्वप्नांचा विचार करता फारोह चिंताक्रांत झाला. मग त्याने इजिप्तमधील सर्व ज्योतिष्यांना व ज्ञानी पुरुषांना बोलाविले आणि त्यांना आपले स्वप्न सांगितले. परंतु त्यापैकी एकालाही त्या स्वप्नाचा अर्थ काय असेल हे सांगता येईना.
9मुख्य प्यालेबरदार फारोहला म्हणाला, “आज मला माझ्या चुकीची आठवण होत आहे. 10काही काळापूर्वी फारोह माझ्यावर आणि प्रमुख रोटी भाजणार्‍यावर रागावून त्यांनी आम्हाला सुरक्षादलाच्या अधिकार्‍याच्या घरातील बंदिवासात ठेवले होते. 11त्यावेळी प्रमुख रोटी भाजणार्‍याला आणि मला एकाच रात्री स्वप्ने पडली, दोन्ही स्वप्नांचा अर्थ वेगळा होता. 12त्या ठिकाणी एक इब्री तरुण होता; तो सुरक्षादलाच्या अधिकार्‍याचा गुलाम होता. त्याला आम्ही आमची स्वप्ने सांगितली आणि त्याने आम्हाला आमच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला, त्याने प्रत्येकाच्या स्वप्नानुसार त्याच्या अर्थ सांगितला. 13आणि त्याने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडली: प्यालेबरदाराच्या जागी माझी पुन्हा नेमणूक झाली आणि प्रमुख रोटी भाजणार्‍याला फाशी देण्यात आली.”
14तेव्हा फारोहने योसेफाला बोलाविणे पाठविले. योसेफाला लगेच तुरुंगाच्या कोठडीतून बाहेर आणण्यात आले आणि योसेफ मुंडण करून व कपडे बदलून फारोहपुढे दाखल झाला.
15फारोह योसेफास म्हणाला, “मला एक स्वप्न पडले, पण येथे असलेल्या कोणाही मनुष्याला त्याचा अर्थ काय असेल हे सांगता येत नाही. पण मी असे ऐकले आहे की तू स्वप्न ऐकताच, तुला स्वप्नांचा अर्थ सांगता येतो.”
16योसेफाने उत्तर दिले, “मला स्वतःच्या बुद्धीने स्वप्नांचा अर्थ सांगता येत नाही, परंतु परमेश्वर फारोहला हितकारक उत्तर देतील.”
17तेव्हा फारोहने योसेफाला सांगितले, “मी स्वप्नात नाईल नदीच्या काठावर उभा होतो; 18तेवढ्यात एकाएकी नाईल नदीतून चांगल्या धष्टपुष्ट दिसणार्‍या सात गाई वर आल्या आणि लव्हाळ्यात चरू लागल्या. 19नंतर दुसर्‍या सात गाई वर आल्या; त्या अगदी कुरूप व दुबळ्या होत्या. सर्व इजिप्त देशात अशा अशक्त गाई मी कधीही पाहिल्या नाहीत. 20या कुरूप व दुबळ्या गाईंनी त्या पहिल्या सात धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. 21असे असूनही त्यांनी त्या सात धष्टपुष्ट गाई कशा खाल्ल्या हे समजू शकले नाही; पण धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकल्यानंतरही त्या अशक्त गाई अशक्तच राहिल्या आणि मग मी जागा झालो.
22“मग मला परत स्वप्नात, एकाच ताटाला टपोर्‍या दाण्यांची भरदार सात कणसे दिसली. 23मग त्याच ताटातून सात वाळलेली आणि पूर्वेच्या वार्‍याने कोमेजून गेलेली कणसे निघाली. 24या अशक्त कणसांनी ती भरदार कणसे गिळून टाकली. मी हे सर्व माझ्या ज्योतिष्यांना सांगितले, परंतु त्यातील एकालाही स्वप्नांचा अर्थ सांगता आला नाही.”
25स्वप्ने ऐकून योसेफ फारोहला म्हणाला, “फारोहला पडलेल्या या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. परमेश्वर काय करणार आहेत, हे त्यांनी तुम्हाला प्रगट केले आहे. 26या दोन्हीचा अर्थ एकच आहे, सात लठ्ठ गाई म्हणजे सात वर्षांचा काळ आणि सात भरदार कणसे यांचाही अर्थ पुढील सात वर्षांचा काळ; जो अतिशय समृद्धीचा असेल. 27त्या सात अशक्त गाई म्हणजे या सात वर्षानंतर येणारी सात वर्षे आणि पूर्वेच्या वार्‍याने कोमेजून गेलेली सात सुकलेली कणसे दुष्काळाची सात वर्षे दर्शवितात.
28“मी फारोहला जे सांगितले आहे ते असे असेल: परमेश्वर लवकरच काय करणार आहेत, हे त्यांनी तुम्हाला प्रकट केले आहे. 29पुढील सात वर्षांचा काळ संपूर्ण इजिप्त देशासाठी अतिशय समृद्धीचा काळ असेल. 30पण त्यानंतरच्या सात वर्षांच्या काळात इजिप्त देशामध्ये इतका मोठा दुष्काळ पडेल की, आधीच्या सात वर्षांतील सर्व समृद्धी आणि भरभराट विसरली जाईल. दुष्काळ देशाचा विध्वंस करेल. 31तो इतका भयानक असेल की, आधीच्या समृद्धीची वर्षे आठवणार देखील नाहीत. 32आता हे स्वप्न फारोहला दोन स्वरुपात पडले, याचा अर्थ असा की परमेश्वराने दुष्काळाची बाब निश्चित केली आहे आणि परमेश्वर त्याप्रमाणे लवकरच घडवून आणतील.
33“म्हणून आता फारोहने एक सुज्ञ आणि शहाणा मनुष्य शोधला पाहिजे आणि त्याला इजिप्त देशावर अधिकारी केले पाहिजे. 34फारोह राजाने इजिप्त देशावर अधिकार्‍यांची नेमणूक करून सात वर्षांच्या समृद्धीच्या काळात सर्व वरकड धान्याचा पाचवा भाग गोळा करावा. 35समृद्धीच्या वर्षात अन्नसामुग्री एकत्र करून सर्व शहरात फारोहच्या अधिकारातील धान्य कोठारात साठविण्याचे व्यवस्थापन करावे. 36ही सर्व अन्नसामुग्री राखीव म्हणून संपूर्ण देशाकरिता साठवून ठेवल्यास नंतर दुष्काळाची सात वर्षे इजिप्त देशावर आली म्हणजे खाण्यासाठी पुरेसे अन्नधान्य राहील, म्हणजे दुष्काळाने देशाचा नाश होणार नाही.”
37तेव्हा फारोह व त्याच्या अधिकार्‍यांना ही योजना योग्य वाटली. 38फारोहने त्यांना विचारले, “परमेश्वराच्या आत्म्याने भरलेला या माणसासारखा दुसरा कोणी सापडेल का?”
39मग फारोह योसेफाला म्हणाला, “ज्याअर्थी परमेश्वराने तुला या स्वप्नांचा अर्थ प्रगट केला आहे, त्याअर्थी देशामध्ये तुझ्यासारखा चतुर आणि सुज्ञ मनुष्य कोणीच नाही. 40म्हणून तू माझ्या महालाचा अधिकारी होशील आणि माझे सर्व लोक तुझ्या अधीन होतील. केवळ सिंहासनासाठीच मी तुझ्यापेक्षा मोठा असेन.”
योसेफ इजिप्तचा अधिकारी
41मग फारोह योसेफाला म्हणाला, “पाहा, मी तुला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले आहे.” 42फारोहने आपली स्वतःची राजमुद्रा योसेफाच्या बोटात घातली. त्याला रेशमी तागाची वस्त्रे घातली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घातली. 43फारोहने योसेफाला आपल्या खालोखालच्या पदाचा रथही दिला आणि योसेफ जिकडे जाई तिकडे ललकारी उठे, “गुडघे टेका.” अशाप्रकारे फारोहने योसेफाला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले.
44फारोहने योसेफास म्हटले, “मी इजिप्त देशाचा राजा फारोह आहे, पण संपूर्ण इजिप्त देशभर तुझ्या परवानगीशिवाय कोणीही त्याचा हात किंवा पाय उचलणार नाही.” 45फारोहने त्याला सापनाथ-पानेह#41:45 सापनाथ-पानेह अर्थात् परमेश्वर बोलतात आणि जगतात हे नाव दिले, आणि त्याला ओन#41:45 ओन दुसरे नाव हेलिओपोलिस येथील पोटीफेरा याजकाची कन्या आसनथ ही पत्नी करून दिली. योसेफ संपूर्ण इजिप्त देशभर फिरला.
46योसेफाने फारोह राजाच्या सेवेत प्रवेश केला, तेव्हा तो तीस वर्षाचा होता. नंतर राजधानी सोडून तो इजिप्त देशभर प्रवास करू लागला. 47पुढील समृद्धीच्या सात वर्षात देशात चहूकडे भरघोस पीक आले. 48या समृद्धीच्या सात वर्षांच्या काळात योसेफाने इजिप्तमध्ये प्रत्येक शहराच्या भोवताली असलेल्या शेतात जे अन्नधान्य पिकले ते सर्व त्याने त्या भागाच्या जवळ असलेल्या शहरात साठवून ठेवले. 49योसेफाने समुद्राच्या वाळूप्रमाणे धान्याचा मोठा साठा केला; ते इतके होते की त्याने नोंदी ठेवणे बंद केले, कारण ते मोजण्यापलीकडे होते.
50याकाळात, दुष्काळाची वर्षे येण्यापूर्वी योसेफाला ओन येथील याजक पोटीफेराची कन्या आसनथ हिच्या पोटी दोन पुत्र झाले. 51योसेफाने त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव मनश्शेह#41:51 मनश्शेह अर्थात् विस्मरण असे ठेवले आणि तो म्हणाला, परमेश्वराने माझ्या सर्व यातना आणि आपल्या वडिलांच्या घराला मुकण्याचे दुःख, यांचा विसर पाडला आहे. 52त्याच्या दुसर्‍या पुत्राचे नाव एफ्राईम#41:52 एफ्राईम अर्थात् फलद्रूप असे ठेवले आले. कारण योसेफ म्हणाला, “परमेश्वराने माझ्या यातनेच्या या देशामध्ये मला फलद्रूप केले आहे.”
53इजिप्त देशातील समृद्धीची सात वर्षे संपत आली. 54मग योसेफाने भाकीत केल्याप्रमाणे दुष्काळाची सात वर्षे सुरू झाली. इजिप्त देशाच्या सभोवती असलेल्या सर्व देशांमध्ये सुद्धा दुष्काळ पडला; परंतु इजिप्तमध्ये अन्न होते. 55इजिप्ती लोकांची उपासमार होऊ लागली, तेव्हा लोक फारोहजवळ अन्न मागू लागले आणि फारोहने त्यांना योसेफाकडे पाठविले व त्यांना सांगितले, “योसेफ सांगेल त्याप्रमाणे करा.”
56तेव्हा आता सर्व देशभर दुष्काळ पसरला असताना योसेफाने धान्याची कोठारे उघडली आणि तो इजिप्त देशाच्या लोकांना धान्य विकू लागला, कारण इजिप्तचा दुष्काळ अत्यंत भयानक होता. 57जगभर दुष्काळ पडल्यामुळे संपूर्ण जगातील लोक इजिप्तमध्ये येऊन योसेफाकडून धान्य विकत घेऊ लागले.

सध्या निवडलेले:

उत्पत्ती 41: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन