उत्पत्ती 42
42
योसेफाचे भाऊ इजिप्त देशात जातात
1इजिप्त देशामध्ये धान्य मिळते, हे जेव्हा याकोबाच्या कानी गेले, तेव्हा तो आपल्या पुत्रांना म्हणाला, “एकमेकांच्या तोंडाकडे नुसते पाहत का उभे राहिलात?” 2मग त्याने पुढे म्हटले, “इजिप्तमध्ये धान्य मिळत आहे, असे मी ऐकले आहे. तुम्ही तिथे जा आणि आपल्यासाठी थोडे धान्य विकत घेऊन या, म्हणजे आपण जगू, मरणार नाही.”
3मग योसेफाचे दहा भाऊ, धान्य विकत घेण्यासाठी इजिप्तमध्ये गेले. 4परंतु याकोबाने योसेफाचा भाऊ बिन्यामीन याला, त्यांच्याबरोबर पाठविले नाही, कारण त्याला काही अपाय होईल अशी त्याला भीती वाटत होती. 5अशा रीतीने इस्राएलचे पुत्र इतर लोकांबरोबर इजिप्तमध्ये धान्य खरेदीसाठी आले, कारण दुष्काळ कनान देशातही पडला होता.
6योसेफ हा इजिप्त देशाचा अधिकारी असल्यामुळे तो सर्व लोकांना धान्यविक्री करीत असे. जेव्हा त्याचे भाऊ तिथे आले, त्यांनी त्याच्यापुढे जमिनीपर्यंत लवून त्याला मुजरा केला. 7योसेफाने त्यांना बघताच ओळखले तरी अपरिचितासारखे वागून दरडावून विचारले, “तुम्ही कुठून आला आहात?”
त्यांनी त्याला उत्तर दिले, “कनान देशाहून आम्ही धान्य विकत घेण्यासाठी आलो आहोत.”
8योसेफाने तर त्याच्या भावांना ओळखले, पण त्या भावांनी त्याला ओळखले नाही. 9यावेळी योसेफाला आपल्याला पूर्वी पडलेल्या स्वप्नांची आठवण झाली, आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात! आणि आमचा देश कुठे असुरक्षित आहे हे पाहण्यासाठी आला आहात.”
10ते म्हणाले, “नाही, नाही महाराज, आपले सेवक फक्त धान्य खरेदीसाठी आले आहेत. 11आम्ही भाऊ एकाच पित्याचे पुत्र आहोत, तुमचे सेवक प्रामाणिक पुरुष आहेत, आम्ही हेर नाही.”
12“नाही,” तो त्यांना म्हणाला, “आमचा देश कुठे असुरक्षित आहे हे पाहण्यासाठीच तुम्ही आला आहात.”
13परंतु ते म्हणाले, “महाराज, आपले हे सेवक बारा भाऊ आहेत; एकाच पित्याचे पुत्र आहोत, जे कनान देशात आहेत; आमचा धाकटा भाऊ आमच्या पित्यासोबत आहे आणि आमचा एक भाऊ आता जीवित नाही.”
14योसेफ म्हणाला, “म्हणूनच मी म्हणतो: तुम्ही हेर आहात! 15आणि अशा प्रकारे तुम्हाला पडताळून पाहू: फारोहच्या जिवाची शपथ, तुमचा धाकटा भाऊ इकडे येईपर्यंत तुम्हाला येथून जाता येणार नाही. 16तुमच्यापैकी एकाला भावास आणण्यास पाठवा; तोपर्यंत बाकीच्यांना तुरुंगात ठेवण्यात येईल, म्हणजे तुम्ही सत्य बोललात ते कळून येईल. जर नाही तर फारोहची शपथ तुम्ही हेर आहात!” 17आणि त्याने त्या सर्वांना तीन दिवस तुरुंगात ठेवले.
18तिसर्या दिवशी योसेफ त्यांना म्हणाला, “जर जीवित राहवयाचे असेल तर तुम्ही हे करा, कारण मी परमेश्वराचे भय धरणारा आहे. 19तुम्ही प्रामाणिक लोक आहात तर तुमच्या एका भावाला तुरुंगात राहू द्या, बाकीच्यांना कुटुंबीयांची उपासमार निवारण्यासाठी धान्य घेऊन जाऊ द्या. 20परंतु तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या. अशा रीतीने तुमचे शब्द खरे होतील आणि तुमचा मृत्यू टळेल.” मग त्यांनी तेच केले.
21ते एकमेकांना म्हणाले, “आम्ही आमच्या भावाविषयी दोषी आहोत. जेव्हा त्याने आपल्या जिवाची विनवणी केली तेव्हा तो किती व्यथित होता हे आम्ही पाहिले, पण आम्ही ऐकले नाही; त्यामुळेच हे संकट आमच्यावर आले आहे.”
22रऊबेन म्हणाला, “त्या मुलाविरुद्ध असे पाप करू नका, हे मी तुम्हाला सांगत नव्हतो का? पण तुम्ही माझे ऐकले नाही! आम्हाला त्याच्या रक्तपाताचा हिशोब द्यावा लागेल.” 23योसेफाला आपले बोलणे समजत असेल असे त्यांना वाटले नाही, कारण तो दुभाषी वापरत होता.
24तो तिथून बाहेर पडला व रडू लागला, थोड्या वेळाने तो परत आला आणि त्याने शिमओनाची निवड करून त्याला त्यांच्या डोळ्यांसमक्ष बांधून घेतले.
25नंतर योसेफाने आपल्या नोकरांना त्यांची पोती धान्याने भरण्यास सांगितले; पण त्याचवेळी त्याने प्रत्येक भावाने दिलेले पैसे ज्याच्या त्याच्या पोत्यात ठेवून द्यावे अशी सूचना दिली. त्याने आपल्या भावांना प्रवासासाठी अन्नसामुग्री देण्याचा आदेश दिला. 26शेवटी त्यांनी धान्याची पोती गाढवांवर लादली आणि ते घरी जाण्यास निघाले.
27परंतु ते रात्रीच्या मुक्कामासाठी थांबले असताना त्यांच्यापैकी एकाने गाढवांना देण्यासाठी थोडे धान्य काढले. धान्य काढीत असताना आपले पैसे पोत्याच्या तोंडाशी असलेले त्याला दिसले. 28तो आपल्या भावांना म्हणाला, “अरे हे काय? माझे पैसे माझ्या पोत्यातच आहेत!”
ते सर्वजण भयभीत झाले. भयाने थरथर कापत ते एकमेकास म्हणाले, “परमेश्वराने आपल्याशी हे काय केले?”
29कनान देशात ते आपले पिता याकोबाकडे आले आणि इजिप्तमध्ये जे काही घडले त्याची सर्व हकिकत त्यांनी त्याला सांगितली. 30ते म्हणाले, “त्या देशाचा अधिकारी आमच्याशी अत्यंत कठोरतेने बोलला, त्याने आम्हाला हेर असल्यासारखे वागविले.” 31आम्ही त्याला म्हटले, “आम्ही हेर नाहीत; आम्ही प्रामाणिक माणसे आहोत. 32आम्ही बारा भाऊ असून एकाच पित्याचे पुत्र आहोत. आमचा एक भाऊ मरण पावला आहे, आणि धाकटा भाऊ कनान देशामध्ये आमच्याच पित्याजवळ राहिला आहे.”
33तेव्हा त्या देशाचा अधिपती आम्हाला म्हणाला, “तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही प्रामाणिक माणसे आहात की नाही, याची खात्री करून घेण्यासाठी मी असे ठरविले आहे: तुमच्यापैकी एका भावाला येथे तुरुंगात ठेवावे; बाकीच्यांनी तुमच्या कुटुंबीयांसाठी धान्य घेऊन घरी जावे. 34पण तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या; मगच तुम्ही हेर नाहीत, तर प्रामाणिक माणसे आहात हे मला समजेल. तर मी तुमचा भाऊ तुम्हाला परत देईन व तुम्ही या देशात व्यापार#42:34 किंवा मोकळेपणाने फिरू शकाल करू शकाल.”
35त्यांनी त्यांची धान्याची पोती रिकामी केली तो, प्रत्येकाच्या पोत्याच्या तोंडाशी त्यांनी दिलेले पैसे होते असे त्यांना दिसून आले! भयाने त्यांचा व त्यांच्या वडिलांचाही थरकाप उडाला. 36मग याकोब त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्या मुलांना हिरावून घेतले आहे. योसेफ राहिला नाही, शिमओन गेला; आता तुम्ही बिन्यामीनालाही नेणार; सर्वकाही माझ्या विरुद्धच घडत आहे.”
37तेव्हा रऊबेन आपल्या वडिलांस म्हणाला, “मी बिन्यामीनाला तुमच्याकडे परत आणले नाही तर तुम्ही माझ्या दोन मुलांना मारून टाका; बिन्यामीनाला माझ्या हवाली करा, मी त्याला परत तुमच्याकडे आणेन.”
38पण याकोबाने उत्तर दिले, “माझा मुलगा तुमच्याबरोबर तिथे जाणार नाही; त्याचा भाऊ योसेफ मरण पावला आणि आता तो एकटाच राहिला आहे; त्याला काही कमीजास्त झाले तर या म्हातारपणात दुःखाने माझा प्राण जाईल#42:38 म्हातारपणात दुःखाने माझा प्राण जाईल मूळ भाषेत पिकलेले केस दुःखाने पाताळात जाईल!”
सध्या निवडलेले:
उत्पत्ती 42: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.