YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 45

45
योसेफ आपल्या भावांना ओळख देतो
1आता मात्र आपल्या सेवकांसमोर योसेफाचा भावनावेग अनावर झाला आणि तो मोठ्याने ओरडला, “सगळ्यांनी माझ्या समक्षतेतून बाहेर जावे!” योसेफाने तिथे कोणी नसताना स्वतःला आपल्या भावांसमोर प्रगट केले. 2मग तो इतक्या मोठमोठ्याने रडू लागला की, ते इजिप्तच्या लोकांनी ऐकले आणि फारोहच्या घराण्यातील लोकांनीही ते ऐकले.
3तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे! माझे वडील अद्याप जिवंत आहेत काय?” परंतु त्याचे भाऊ इतके घाबरले होते की त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडेना.
4तेव्हा योसेफाने आपल्या भावांना म्हटले, “माझ्याजवळ या!” ते जवळ आल्यावर तो त्यांना म्हणाला, “ज्या भावाला विकून तुम्ही इजिप्त देशात पाठवून दिले होते, तो मी तुमचा भाऊ योसेफ आहे! 5तुम्ही मला अशा रीतीने वागविले म्हणून वाईट वाटून घेऊ नका व त्रागा करून घेऊ नका, कारण तुमचे जीव वाचविण्याकरिता परमेश्वरानेच मला तुमच्यापुढे इकडे पाठविले. 6दुष्काळ पडून आता दोनच वर्षे झाली आणि अद्यापही पाच वर्षे आहेत. त्या काळात नांगरणी व कापणी अजिबात होणार नाही. 7परंतु पृथ्वीवर जे उरले आहेत, त्या तुम्हाला वाचवण्यासाठी आणि मोठ्या मुक्तिद्वारे तुमचे जीवन सुरक्षित करण्यासाठी परमेश्वराने मला तुमच्या आधी इथे पाठवले आहे.
8“म्हणजे आता तुम्ही नव्हे तर खुद्द परमेश्वरानेच मला इकडे पाठविले. त्यांनीच मला फारोहचा सल्लागार, त्याच्या घराण्याचा व्यवस्थापक आणि संपूर्ण इजिप्त देशाचा अधिपती केले आहे. 9आता त्वरा करा आणि माझ्या वडिलांकडे जाऊन त्यांना सांगा की, तुमचा पुत्र योसेफ असे म्हणतो: ‘परमेश्वराने मला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले आहे, म्हणून आता क्षणाचाही विलंब न लावता माझ्याकडे येथे या. 10म्हणजे तुम्ही, तुमची मुले व तुमची नातवंडे, गुरे, शेरडेमेंढरे आणि जे सर्वकाही तुमचे आहे, त्यासह तुम्हाला येथे गोशेन प्रांतात राहता येईल. 11मी तुमची या ठिकाणी काळजी घेईन, कारण आपल्यापुढे दुष्काळाची अजून पाच वर्षे आहेत आणि तुम्ही इकडे आला नाही तर, तुम्ही तुमच्या सर्व कुटुंबासह निराधार व्हाल.’
12“तुम्ही हे स्वतः बघत आहात व माझा भाऊ बिन्यामीनही बघत आहे, की खरोखर मीच तुमच्याशी बोलत आहे. 13आपल्या वडिलांना इजिप्तमध्ये मला देण्यात आलेला आदर आणि जे सर्वकाही तुम्ही पाहिले ते सांगा आणि त्यांना माझ्याकडे तत्परतेने घेऊन या.”
14मग आनंदाने रडू येत असतानाच, त्याने बिन्यामीनाला मिठी मारली आणि बिन्यामीनही रडू लागला. 15मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांच्यासह रडला आणि नंतर त्याचे भाऊ त्याच्याशी बोलू लागले.
16योसेफाचे भाऊ आले आहेत ही बातमी फारोहपर्यंत पोहोचली, तेव्हा ती ऐकून फारोहला आणि त्याच्या अधिकार्‍यांना अतिशय आनंद झाला. 17फारोह योसेफाला म्हणाला, “तुझ्या भावांना सांग, ‘आपली जनावरे लादा आणि झटपट कनान देशातील आपल्या घरी जा, 18आणि तुमचे वडील व सर्व कुटुंबीय मंडळी यांना इजिप्तमध्येच राहण्यासाठी घेऊन या. त्यांना सांगा, फारोह तुम्हाला इजिप्त देशातील सर्वात सुपीक प्रदेश बहाल करेल म्हणजे या देशातील उत्तम पदार्थ तुम्हाला खावयास मिळतील.’
19“आणि तुझ्या भावांना असेही सांग, ‘तुमच्या स्त्रिया, मुले आणि तुमचे वडील यांना घेऊन येण्यासाठी इजिप्तमधून गाड्या घेऊन जा. 20तुमच्या मालमत्तेची काळजी करू नका, कारण इजिप्त देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच होईल.’ ”
21इस्राएलच्या पुत्रांनी तसेच केले. फारोहच्या आज्ञेप्रमाणे योसेफाने त्यांना सामान आणण्यासाठी गाड्या दिल्या; तसेच प्रवासासाठी अन्नधान्यही दिले. 22त्याने त्या प्रत्येकाला नवीन पोशाख दिला, परंतु बिन्यामीनाला त्याने पाच नवीन पोशाख आणि तीनशे शेकेल चांदी#45:22 अंदाजे 3.5 कि.ग्रॅ. दिली. 23त्याने आपल्या वडिलांसाठी इजिप्तमधील सर्वोत्तम वस्तूंनी लादलेली दहा गाढवे पाठवली. प्रवासासाठी धान्य व खाद्यपदार्थ यांनी लादलेल्या दहा गाढवीही रवाना केल्या. 24अशा रीतीने त्याने त्याच्या भावांची रवानगी केली. त्यांना प्रत्यक्ष निरोप देताना तो त्यांना म्हणाला, “रस्त्याने जाताना भांडू नका!”
25निरोप घेऊन ते इजिप्तमधून निघाले व कनान देशात आपले वडील याकोब याच्याकडे आले. 26ते त्यांना म्हणाले, “योसेफ अजून जिवंत आहे! तो इजिप्त देशाचा अधिपती झाला आहे.” हे ऐकून याकोब अवाक झाला; त्याचा त्याच्या पुत्रांच्या बातमीवर विश्वास बसेना. 27परंतु जेव्हा त्यांनी त्याला योसेफाचा निरोप सांगितला आणि योसेफाने पाठविलेल्या धान्याच्या गाड्या त्याने पाहिल्या, तेव्हा त्यांचा पिता याकोब याच्या आत्म्याला नवचैतन्य प्राप्त झाले. 28आणि इस्राएलने म्हटले, “माझी खात्री झाली आहे! माझा पुत्र योसेफ जिवंत आहे, आता मृत्यूपूर्वी मी स्वतः त्याला जाऊन भेटेन.”

सध्या निवडलेले:

उत्पत्ती 45: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन