उत्पत्ती 49
49
याकोब आपल्या मुलांना आशीर्वाद देतो
1नंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना बोलावून म्हटले: “असे माझ्याभोवती गोळा व्हा, म्हणजे पुढे भविष्यकाळात तुमचे काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगेन.
2“एकत्र व्हा आणि माझे ऐका, अहो याकोबाच्या पुत्रांनो;
तुमचा पिता इस्राएल याचे ऐका.
3“रऊबेना, तू माझा प्रथमपुत्र आहेस, माझे बळ,
पौरुषाचे प्रथमफळ असा आहेस.
प्रतिष्ठा आणि शक्तीत उत्कृष्ट असा तू आहेस.
4तू अशांत पाण्यासारखा उग्र आहे,
तू अजून उत्कृष्ट होणार नाही, कारण तू तुझ्या वडिलांच्या खाटेवर,
माझ्या खाटेवर चढला आणि ते अशुद्ध केले.
5“शिमओन व लेवी हे दोघे भाऊ आहेत,
त्यांची तलवार ही अत्याचाराचे साधन आहे.
6मी त्यांच्या सभेमध्ये जाऊ नये,
त्यांच्या मंडळीमध्ये मी सामील होऊ नये,
कारण रागाच्या भरात त्यांनी माणसांचा वध केला,
आणि वाटेल तसे बैलांची धोंडशीर तोडली.
7त्यांचा क्रोध शापित असो,
आणि त्यांचा संताप, किती क्रूर आहे!
मी त्यांची याकोबामध्ये पांगापांग करेन,
आणि त्यांना इस्राएलभर पांगवून टाकेन.
8“हे यहूदाह,#49:8 अर्थात् स्तुती तुझे भाऊ तुझी प्रशंसा करतील;
तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील;
तुझ्या पित्याचे पुत्र तुला नमन करतील.
9यहूदाह, तू सिंहाचा छावा आहेस.
माझ्या मुला, तू तुझ्या शिकारीहून परत येतो.
सिंहासारखा दबा धरून बसतो व विसावा घेतो,
सिंहिणीप्रमाणे आहेस—त्याला कोण छेडणार?
10यहूदाहपासून राजदंड कधीही वेगळा होणार नाही,
किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही,
ज्याचे जे आहे#49:10 किंवा त्याच्यापासून त्याचे संतान तो येईपर्यंत,
राष्ट्रे त्याची आज्ञा पाळतील.
11तो आपले गाढव द्राक्षवेलीला,
गाढवीचे शिंगरू उत्कृष्ट द्राक्षवेलीला बांधून ठेवणार आहे;
आपला झगा द्राक्षारसात,
आपली वस्त्रे द्राक्षाच्या रक्तात धुणार आहे.
12त्याचे नेत्र द्राक्षारसापेक्षा गर्द होतील,
त्याचे दात दुधापेक्षाही पांढरे होतील.
13“जबुलून समुद्रकिनारी राहील
आणि तो जहाजांचे बंदर होईल.
त्याची सीमा सीदोनपर्यंत पसरेल.
14“इस्साखार बळकट गाढव आहे.
तो मेंढवाड्यांमध्ये दबून बसला आहे.
15त्याची विश्रांतीची जागा किती रम्य आहे
आणि तिकडचा प्रदेश किती आल्हाददायक आहे,
हे पाहून तो आपल्या खांद्याला भार वाहण्यासाठी वाकवेल
आणि मजुरीचा दास होऊन जाईल.
16“दान आपल्या लोकांना न्यायदान करेल,
इस्राएलाच्या एका गोत्राप्रमाणे तो हे करेल.
17दान हा रस्त्याच्या कडावरील सर्प बनेल,
तो वाटेवरील विषारी सर्प बनेल,
जो घोड्याच्या टापांचा चावा घेईल
व घोडेस्वार खाली कोसळेल.
18“हे याहवेह, मी तुमच्या तारणाची वाट पाहत आहे.
19“एक लुटारूची टोळी गादवर हल्ला करेल,
पण गाद त्यांच्या टाचेवर तडाखा देईल.
20“आशेरला पौष्टिक अन्न मिळेल;
आणि तो राजास योग्य अशी मिष्टान्ने पुरवेल.
21“नफताली स्वैर हरिणीप्रमाणे आहे,
त्याला सुंदर पाडसे होतील.
22“योसेफ हा फलवंत वेल आहे,
पाण्याच्या झर्याजवळ लावलेली फलवंत वेल आहे,
तिच्या फांद्या भिंतीवर पसरल्या आहेत.
23कटुतेने तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला;
त्यांनी त्याच्यावर वैराने बाण सोडले.
24परंतु त्याचे धनुष्य स्थिर राहिले,
त्याचे बाहू मजबूत राहिले,
याचे कारण याकोबाचे सर्वसमर्थ परमेश्वर,
ते मेंढपाळ आणि इस्राएलचे खडक आहेत.
25कारण तुझ्या पित्याचे परमेश्वर, तुझे सहायक आहेत,
कारण सर्वसमर्थ, जे तुला आशीर्वादित करतात,
वरून स्वर्गातील आशीर्वाद,
खोलातील डोहातून निघणार्या झर्यातील आशीर्वाद,
स्तने आणि गर्भांच्या आशीर्वादांचा वर्षाव करो.
26तुझ्या पित्याचे आशीर्वाद
पूर्वजांच्या पर्वतापेक्षा श्रेष्ठ आशीर्वाद आहेत,
ते सर्वकालीन पर्वतांच्या संपन्नतेपेक्षा श्रेष्ठ आहेत.
हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी,
जो आपल्या भावामधील राजपुत्र आहे, त्याच्या मस्तकी येवोत.
27“बिन्यामीन, हा भुकेला लांडगा आहे;
तो सकाळच्या प्रहरी शिकार करतो,
आणि संध्याकाळी लूट वाटतो.”
28हे सर्व इस्राएलचे बारा गोत्र आहेत आणि मुलांना आशीर्वाद देण्याकरिता त्यांचा पिता असा बोलला, प्रत्येकाला त्याने यथायोग्य आशीर्वाद दिला.
याकोबाचा मृत्यू
29नंतर त्याने आपल्या पुत्रांस या सूचना दिल्या: “आता लवकरच माझा अंत होईल, तेव्हा एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेल्या गुहेमध्ये माझ्या वाडवडिलांच्या सोबत मला मूठमाती द्या. 30कनान देशात अब्राहामाने एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेली स्मशानभूमी मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहेमध्ये आहे. 31तिथेच त्यांनी अब्राहाम आणि त्याची पत्नी साराहला मूठमाती दिली; तिथेच त्यांनी इसहाक आणि त्याची पत्नी रिबेकाहला मूठमाती दिली आणि तिथेच मी लेआला मूठमाती दिली. 32ते शेत आणि ती गुहा हेथीच्या लोकांपासून विकत घेतली होती.”
33आपल्या पुत्रांसंबंधीची भविष्यवाणी संपविल्यावर याकोबाने आपले पाय बिछान्यावर उचलून घेतले व त्याने अखेरचा श्वास घेऊन प्राण सोडला आणि तो त्याच्या पूर्वजास जाऊन मिळाला.
सध्या निवडलेले:
उत्पत्ती 49: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.