YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 50

50
1योसेफ आपल्या पित्याल्या आलिंगन देऊन खूप रडला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. 2नंतर योसेफाने वैद्यास त्याचा पिता इस्राएल याच्या मृतदेहात मसाला भरण्याची आज्ञा दिली. मग वैद्यांनी मृतदेहात सुगंधी द्रव्याचा मसाला भरला. 3मसाला भरण्याच्या क्रियेला चाळीस दिवस लागले, मृतदेहात मसाला भरण्यास इतके दिवस लागत असत. इजिप्तच्या लोकांनी त्याच्यासाठी सत्तर दिवस शोक केला.
4शोक करण्याचे दिवस संपल्यानंतर योसेफ फारोहच्या राजदरबारी गेला आणि म्हणाला, “जर माझ्यावर तुमची कृपादृष्टी असेल तर तुम्ही माझ्यावतीने फारोहशी बोलावे” अशी त्याने त्यांना विनंती केली. 5“माझ्या वडिलांनी मला शपथ घ्यायला लावली आणि म्हणाले, मी मरणार आहे; कनान देशात मी स्वतःसाठी खोदलेल्या थडग्यात मला मूठमाती दे. आता मला वर जाऊन माझ्या वडिलांना मूठमाती देऊ दे. मग मी परत येईन.”
6फारोहने म्हटले, “तू वर जा आणि शपथ दिल्याप्रमाणे आपल्या वडिलांना मूठमाती दे.”
7मग योसेफ आपल्या पित्याला पुरण्यास निघाला. फारोहचे सर्व अधिकारी त्याच्याबरोबर होते—त्याचे मान्यवर आणि इजिप्तचे सर्व प्रतिष्ठित— 8तसेच योसेफाचे पूर्ण कुटुंब म्हणजे त्याचे भाऊ आणि त्यांचे कुटुंब, या सर्वांसह गेला. परंतु त्यांनी त्यांची मुलेबाळे, गुरे, शेरडेमेंढरे गोशेन प्रांतातच मागे ठेवली. 9अशाप्रकारे योसेफाबरोबर रथ, घोडेस्वार गेले. तो मोठा समुदाय होता.
10जेव्हा ते यार्देन नदीच्या पश्चिम तीरावर यरीहोजवळ अटाद या ठिकाणी आले; तेव्हा त्यांनी तिथे फार आकांत करून मोठा विलाप केला; योसेफाच्या वडिलांसाठी त्यांनी सात दिवस तिथे शोक केला. 11जेव्हा तिथे राहणाऱ्या कनानी लोकांनी अटादच्या खळ्यावर शोक करताना पाहिले, यार्देनजवळच्या त्या जागेला आबेल-मिस्राईम असे नाव ठेवले. कारण ते म्हणाले, “इजिप्तच्या लोकांची ही मोठा शोक करण्याची जागा आहे.”
12इस्राएलने आज्ञा केल्याप्रमाणे त्याच्या पुत्रांनी सर्वकाही केले: 13त्याचा मृतदेह कनान देशामध्ये आणला आणि अब्राहामाने एफ्रोन हिथी याच्यापासून मम्रेजवळील मकपेला नावाच्या शेतातील गुहेत त्यांनी त्याला मूठमाती दिली. 14आपल्या वडिलांना मूठमाती दिल्यानंतर, योसेफ आपले भाऊ आणि आपल्या वडिलांच्या मूठमातीसाठी त्याच्याबरोबर गेलेले लोक यासह इजिप्त देशास परत आला.
योसेफाचे आपल्या भावांना आश्वासन
15जेव्हा योसेफाच्या भावांनी पाहिले की त्यांचे वडील मरण पावले, ते म्हणाले, “आपण योसेफाला जी वाईट वागणूक दिली होती, त्याची जर त्याने वाईटाने आपल्याला परतफेड केली तर?” 16म्हणून त्यांनी योसेफाला निरोप पाठविला, “मरण्यापूर्वी तुझ्या वडिलांनी अशी सूचना दिली होती: 17‘तुम्हाला हे योसेफाला बोलायचे आहे: आम्ही तुझ्याशी जे अतिदुष्टाईचे वर्तन केले त्याबद्दल आम्ही तुझी क्षमा मागावी.’ त्याप्रमाणे आम्ही तुझ्या पित्याच्या परमेश्वराचे सेवक तुझी क्षमा मागत आहोत.” जेव्हा हा संदेश योसेफाकडे आला, तेव्हा योसेफ रडला.
18नंतर त्याचे भाऊ त्याच्याकडे आले आणि त्याच्यापुढे पालथे पडून त्याला म्हणाले, “आम्ही तुझे गुलाम आहोत.”
19पण योसेफ त्यांना म्हणाला, “भीती बाळगू नका. मी काय परमेश्वराच्या ठिकाणी आहे? 20तुम्ही जे वाईट योजिले होते, त्यातून परमेश्वराने चांगलेच निर्माण केले; कारण आज मला त्याने या पदावर यासाठी आणले की, मला पुष्कळ लोकांचे प्राण वाचविता यावेत. 21म्हणून तुम्ही घाबरू नका; मी स्वतः तुमचा आणि तुमच्या मुलाबाळांचा पुरवठा करेन.” अशाप्रकारे त्यांच्याशी अतिशय ममतेने बोलून त्याने त्यांचे समाधान केले.
योसेफाचा मृत्यू
22योसेफ, इजिप्त देशात आपल्या पित्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत राहिला. तो एकशे दहा वर्ष जगला 23आणि योसेफाने त्याचा पुत्र एफ्राईमच्या मुलांची तिसरी पिढी पाहिली. तसेच मनश्शेहचा पुत्र माखीरला जन्मतः त्याच्या मांडीवर ठेवण्यात आले.
24नंतर योसेफ आपल्या भावांस म्हणाला, “लवकरच माझा अंत होईल, पण खात्रीने परमेश्वर तुमची भेट घेतील आणि तुम्हाला इजिप्त देशाबाहेर अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना वचन दिलेल्या देशात घेऊन जातील,” 25नंतर योसेफाने इस्राएली लोकांना शपथ देऊन म्हटले, “परमेश्वर तुमच्या मदतीला येतील आणि मग तुम्ही निश्चितच माझ्या अस्थी या जागेवरून घेऊन जाल.”
26अशा रीतीने योसेफ एकशे दहा वर्षांचा होऊन मृत्यू पावला. मग त्याच्या प्रेतात मसाला भरण्यात आला आणि ते एका शवपेटीत घालून इजिप्तमध्ये ठेवण्यात आले.

सध्या निवडलेले:

उत्पत्ती 50: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन