YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 58

58
खरा उपवास
1“उंच स्वरात गर्जना करा, रोखून ठेऊ नका.
रणशिंगाच्या निनादाप्रमाणे तुमचा आवाज उंच करा.
माझ्या लोकांची बंडखोरी
आणि याकोबाच्या वंशजांना त्यांची पापे जाहीर करा.
2दिवसेन् दिवस ते माझा शोध घेतात;
माझे मार्ग जाणून घेण्याचा कसून प्रयत्न करीत असल्याचा दिखावा करतात,
जणू काही ते राष्ट्र सर्वकाही यथायोग्य करते
आणि त्यांच्या परमेश्वराच्या आज्ञा त्यांनी फेटाळल्या नाहीत.
ते मला रास्त निर्णय मागतात
आणि परमेश्वराने त्यांच्या निकट यावे म्हणून आतुर आहेत असे दर्शवितात.
3ते म्हणतात, ‘आम्ही उपास केला,
पण तुम्ही बघितलेही नाही?
आम्ही नम्र झालो,
आणि तुम्ही त्याकडे लक्षही दिले नाही?’
“तरी तुमच्या उपासाच्या दिवशी, तुम्ही मनाला वाटेल तसे करता
आणि तुमच्या कामगारांची पिळवणूक करता.
4तुमचे उपास कलह व भांडणाने
आणि एकमेकांशी दुष्टपणे मारामारी करण्याने संपतात.
तुम्ही जसा उपास करता, तसा आता करून
तुमचा आवाज उच्चस्थानी ऐकला जाईल अशी अपेक्षा करता.
5असा उपास मी निवडला आहे काय,
लोकांनी नम्र होण्याचा एक दिवस?
केवळ वार्‍याने लवणार्‍या लव्हाळ्याप्रमाणे वाकण्याकरिता,
आणि गोणपाट नेसून राख फासण्याकरिता?
यालाच तुम्ही उपास म्हणता का,
याहवेहला असा दिवस मान्य असेल काय?
6“मी निवडलेला उपास याप्रकारचा नाही का:
अन्यायाची बंधने तुटली जावी
आणि जोखडाचे बंद सोडावे,
पीडितांना मुक्त करावे
आणि प्रत्येक जोखड तोडून टाकला जावा?
7भुकेल्यांना तुमच्या अन्नात तुम्ही वाटेकरी करू नये काय
व निराश्रितांना आश्रय द्यावा—
जेव्हा तुम्ही निर्वस्त्राला बघाल, त्याला पांघरूण घाला,
आणि आपल्या रक्त व मांसाच्या बाधवांना दूर लोटावे का?
8मग तुमचा प्रकाश सूर्योदयाप्रमाणे उजाडेल,
आणि तुमचे आरोग्य लगेच तुम्हाला प्राप्त होईल;
तुमची धार्मिकता तुमच्यापुढे चालेल,
आणि याहवेहचे गौरव तुमची पाठराखण करेल.
9मग तुम्ही हाक माराल आणि याहवेह त्यास उत्तर देतील;
तुम्ही मदतीसाठी धावा कराल व ते म्हणतील: हा मी येथे आहे.
“जर तुम्ही पीडितांना जोखडातून मुक्त कराल,
एखाद्याकडे बोट रोखून आरोप लादण्याचे आणि द्वेषयुक्त बोलणे थांबवाल,
10भुकेल्यांना खाऊ घालण्यासाठी स्वतःचे जीवन खर्ची घालाल,
पीडितांच्या गरजांचा पुरवठा कराल,
तर तुमचा प्रकाश अंधारातून झळकेल
आणि तुमची रात्र मध्यान्हासारखी उजळेल.
11याहवेह तुम्हाला सतत मार्गदर्शन करतील;
सूर्याच्या उष्णतेने शुष्क भूमीत राहूनही ते तुमच्या गरजा भागवतील
व तुमच्या हाडांना बळकट करतील.
मग तुम्ही भरपूर पाणी पाजलेल्या बागेप्रमाणे,
कधीही पाणी न आटणाऱ्या झर्‍याप्रमाणे व्हाल.
12तुमचे लोक पुरातन भग्नावशेषांची पुनर्बांधणी करतील
आणि प्राचीन पाये पुन्हा उभारतील;
भग्न झालेली तटबंदी दुरुस्त करणारे,
बांधकाम व रस्ते पूर्वस्थितीत आणणारे असे तुम्ही म्हणविले जाल.
13“जर तुम्ही शब्बाथदिन अशुद्ध करण्यापासून तुमची पावले दूर ठेवाल
आणि माझ्या पवित्र दिवशी आपलीच मनमानी करणे सोडून द्याल,
जर तुम्ही शब्बाथदिनास आनंदाचा दिवस मानाल
आणि तो याहवेहचा पवित्र दिवस आहे म्हणून त्याचा सन्मान कराल,
आणि त्या दिवसाचा आदर करून स्वतःच्या इच्छा बाजूला साराल
आणि मनमानेल असे न वागता व निरर्थक गोष्टींची चर्चा करणार नाही,
14तर याहवेहमध्ये तुम्हाला आनंद प्राप्त होईल,
आणि मी तुम्हाला या भूतलाच्या उच्चस्थानी विजयाने चालवेन
आणि तुमचा पिता याकोबाच्या वतनातील उपजावर मेजवानी देईन.”
ही याहवेहच्या मुखातील वचने आहेत.

सध्या निवडलेले:

यशायाह 58: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन