YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 59

59
पाप, पश्चात्ताप आणि उद्धार
1निश्चितच, याहवेहची भुजा तारण करू शकणार नाही इतकी आखूड नाही,
वा ऐकू येणार नाही असे त्यांचे कान बहिरे नाहीत.
2परंतु तुमच्या पातकांनी तुम्हाला
तुमच्या परमेश्वरापासून दूर केले आहे;
तुमच्या पापांनी त्यांचे मुख तुमच्यापासून लपविले आहे,
जेणेकरून त्यांना ऐकू येणार नाही.
3कारण तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत,
तुमची बोटे दोषीपणाने बरबटलेली आहेत.
तुमच्या ओठांनी असत्य बोललेले आहे,
आणि तुमची जीभ दुष्टतेच्या गोष्टी पुटपुटते.
4कोणी न्यायाने वागत नाही;
कोणीही सत्याने खटला लढत नाही.
ते निरर्थक वाद घालतात आणि खोटे शब्द उच्चारतात;
ते क्षुब्धतेची गर्भधारण करतात आणि दुष्टतेस जन्म देतात.
5ते विषारी फुरसे सर्पांची अंडी उबवितात
आणि मकडीचे जाळे विणतात.
जो कोणी त्यांची अंडी खाईल तो मरेल
आणि जेव्हा एखादे अंडे फुटते, त्यामधून साप निघतो.
6त्यांनी विणलेले जाळे वस्त्र बनविण्याच्या उपयोगाचे नसते;
त्यांनी जे बनविले त्याने ते स्वतःला पांघरू शकत नाहीत.
त्यांच्या कृती दुष्टतेच्या कृती आहेत,
हिंसात्मक कृती करणे हेच त्यांच्या हातात आहे.
7पाप करावयाला त्यांचे पाय धाव घेतात;
निर्दोषाचा रक्तपात करण्यास ते चपळ असतात.
ते दुष्ट योजनेचा पाठपुरावा करतात;
हिंसात्मक कृत्यांनी त्यांचे मार्ग ओळखले जातात,
8आणि शांतीचा मार्ग त्यांना माहीत नाही;
त्यांच्या वाटेवर न्याय नसतो.
त्यांनी ते मार्ग वाकडे करून टाकले आहेत;
त्यांच्यासोबत चालणाऱ्या कोणासही शांतीचा अनुभव येत नाही.
9याकारणास्तव न्याय आमच्यापासून लांब असतो,
आणि धार्मिकतेचा आम्हाला बोध मिळत नाही.
आम्ही प्रकाशाची अपेक्षा करतो, पण सर्वत्र अंधकारच असतो;
तेजस्वीपणाची अपेक्षा करतो, पण गडद सावलीत चालतो.
10आंधळ्याप्रमाणे आम्ही भिंती लगत चाचपडत चालतो,
दृष्टिहीनांप्रमाणे स्पर्शाद्वारे मार्ग चाचपडतो.
मध्यान्हात आम्ही संधिप्रकाशात असल्याप्रमाणे अडखळतो;
बलवानांमध्ये आम्ही मेलेल्यांसारखे असतो.
11आम्ही अस्वलांसारखे गुरगुरतो;
कबुतरांप्रमाणे शोकाने हुंकारतो.
आम्ही न्यायाचा शोध घेतो, पण तो सापडत नाही;
सुटकेसाठी धडपडतो, पण ती फार दूर गेलेली असते.
12कारण तुमच्या नजरेत आमचे अनेक अपराध आहेत,
आणि आमची पापेच आमच्याविरुद्ध साक्ष देतात.
आमचे अपराध सतत आमच्यासह असतात
आमचे हे घोर अन्याय आम्ही कबूल करतो:
13याहवेहच्या विरुद्ध केलेली बंडखोरी व लबाडी,
परमेश्वराकडे फिरविलेली पाठ,
बंडखोरी व छळवणूकीस प्रक्षुब्ध करणे,
आमच्या अंतःकरणातून प्रसवलेले निखालस असत्य.
14म्हणून न्याय मागे सरला आहे,
आणि नीतिमत्ता दूर उभी आहे;
सत्य रस्त्यावर अडखळले आहे,
प्रमाणिकपणा प्रवेश करू शकत नाही.
15सत्य कुठेही शोधून सापडत नाही,
आणि जो कोणी दुष्टपणा टाळतो, तोच सावज बनतो.
याहवेहने हे पाहिले व ते असंतुष्ट झाले
कारण न्याय्य कुठेही नाही.
16त्यांनी बघितले की कोणीही नाही,
कोणीच मध्यस्थी करणारा नाही, हे पाहून ते अस्वस्थ झाले;
म्हणून स्वतःच्या भुजेने त्यांनी त्यांच्याप्रीत्यर्थ तारण निर्माण केले,
आणि स्वतःच्या नीतिमत्वाने त्यांना आधार दिला.
17त्यांनी नीतिमत्वास त्यांचे चिलखत म्हणून चढविले
आणि त्यांच्या मस्तकावर तारणाचे शिरस्त्राण घातले;
सूडरूपी वस्त्र परिधान केला
आवेश हा अंगरखा म्हणून स्वतःला पांघरले.
18त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांच्या प्रमाणात
ते परतफेड करतील.
त्यांच्या शत्रूंचा क्रोध
आणि शत्रूंच्या अपराधाबद्दल योग्य शिक्षा देतील;
द्वीपांची त्यांच्या कृत्यानुसार ते परतफेड करतील.
19पश्चिमेकडील लोक याहवेहच्या नावाचे भय धरतील,
आणि सूर्योदयाकडील लोक त्यांच्या वैभवाचा गौरव करतील.
ज्याला याहवेहचा श्वास जोराने पुढे नेतो
तसे ते कोंडलेल्या महापूरासारखे येतील.#59:19 किंवा पलायन करावास लावतो
20“याकोबातील ज्या लोकांनी आपल्या पापाबद्दल पश्चात्ताप केला आहे,
सीयोनात त्यांचा उद्धारक येईल,”
अशी याहवेह घोषणा करतात.
21याहवेह म्हणतात, “माझ्याबाबतीत म्हणाल, तर त्यांच्याशी केलेला हा माझा करार आहे. माझा पवित्र आत्मा जो तुमच्यावर आहे, तो तुमचा त्याग करणार नाही आणि माझे वचन जे मी तुमच्या मुखात घातले आहे, ते सदोदित तुमच्या ओठांवर, तुमच्या संततीच्या ओठांवर आणि त्यांच्या वंशजांच्या ओठांवर; आतापासून आणि सदासर्वकाळ राहील,” असे याहवेह म्हणतात.

सध्या निवडलेले:

यशायाह 59: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन