YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 4

4
दबोरा
1एहूदच्या मृत्यूनंतर इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने पुन्हा वाईट कृत्य केले. 2म्हणून याहवेहने त्यांना कनानातील हासोर येथील राजा याबीनच्या हाती दिले. त्याच्या सैन्याचा सेनापती सिसेरा हा हरोशेथ-हग्गोईम येथे राहणारा होता. 3त्याच्याजवळ नऊशे लोखंडी रथ होते आणि त्याने क्रूरतेने वीस वर्षे इस्राएली लोकांचा छळ केला, त्यांनी मदतीसाठी याहवेहचा धावा केला.
4त्या समयी लप्पिदोथाची पत्नी दबोरा एक संदेष्टी होती आणि ती इस्राएलचे नेतृत्व#4:4 किंवा न्याय करत होती. 5तिने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा आणि बेथेलमध्ये दबोराच्या खजूराच्या झाडाखाली न्यायसभा चालविली आणि इस्राएली लोक त्यांच्यातील वादाचा निर्णय घेण्यासाठी तिच्याकडे येत असत. 6तिने नफतालीच्या प्रदेशातील केदेश येथे राहणारा अबीनोअमाचा पुत्र बाराकास बोलावून आणले आणि ती त्याला म्हणाली, “याहवेह इस्राएलाचे परमेश्वर तुला आज्ञा देतात: ‘जा आणि तुझ्यासोबत नफताली आणि जबुलून वंशातील दहा हजार पुरुषांना सोबत घेऊन ताबोर पर्वताकडे कूच करून जा. 7मी याबीनाच्या सैन्याचा सेनापती सिसेराला त्याच्या रथांसह आणि त्याच्या सैन्यासह किशोन नदीकडे नेईन आणि त्याला तुझ्या हाती देईन.’ ”
8बाराक तिला म्हणाला, “जर तू माझ्यासोबत येशील तर मी जाईन; परंतु तू माझ्याबरोबर येत नसशील, तर मी जाणार नाही.”
9दबोराने उत्तर दिले, “मी तुजबरोबर अवश्य येईन, परंतु जो मार्ग तू घेत आहेस त्यामध्ये तुझा सन्मान होणार नाही, कारण याहवेह सिसेराला एका स्त्रीच्या हातात देतील.” मग ती बाराकासोबत केदेश येथे गेली. 10बाराकाने जबुलूनी आणि नफतालीच्या लोकांना बोलाविले आणि तेव्हा दहा हजार पुरुष त्याच्यामागे निघाले. दबोराही त्याच्यासह केदेशला गेली.
11आता हेबेर केनीने मोशेचा मेहुणा#4:11 किंवा सासरा होबाबचे गोत्र व इतर केनी लोकांना सोडले आणि केदेशजवळ साननीम येथील मोठ्या एलावृक्षाजवळ आपला तंबू ठोकला.
12जेव्हा त्यांनी सिसेराला सांगितले की अबीनोअमाचा मुलगा बाराक ताबोर पर्वतावर गेला आहे, 13तेव्हा सिसेराने आपले सर्व लोक आणि आपले नऊशे लोखंडी रथ सज्ज करून, हरोशेथ-हग्गोईम येथून किशोन नदीकडे कूच केले.
14तेव्हा दबोरा बाराकास म्हणाली, “जा! आज तो दिवस आहे, याहवेहने सिसेराला तुझ्या हाती दिलेले आहे. याहवेह तुझ्यापुढे निघाले आहेत ना?” तेव्हा बाराक दहा हजार लोकांसह ताबोर पर्वतावरून उतरला. 15जसा बाराक पुढे गेला, याहवेहने सिसेरा आणि त्याचे सर्व रथ आणि त्याच्या सैनिकांचा तलवारीने धुव्वा उडविला, सिसेरा तर आपल्या रथातून उतरला आणि पायी पळून गेला.
16बाराकाने रथांचा आणि सैन्याचा हरोशेथ-हग्गोईमपर्यंत पाठलाग केला आणि सिसेराचे संपूर्ण सैन्य तलवारीने पडले; एकही पुरुष जिवंत राहिला नाही. 17सिसेरा तर केनी हेबेराची पत्नी याएलच्या डेर्‍याकडे पायी पळून गेला, कारण हासोरचा राजा याबीन आणि केनी हेबेरच्या घराण्यात सलोखा होता.
18याएल सिसेराला भेटण्यास बाहेर आली आणि त्याला म्हणाली, “या, महाराज, आत या. भिऊ नका.” म्हणून तो तिच्या डेर्‍यात गेला आणि तिने त्याला कांबळीखाली झाकले.
19“मला तहान लागली आहे,” तो तिला म्हणाला. “कृपा करून मला थोडेसे पाणी दे.” तेव्हा तिने त्याला दुधाची बुधली उघडून त्यातून त्याला थोडे दूध दिले आणि त्याला झाकून टाकले.
20तो तिला म्हणाला, “डेर्‍याच्या दाराशी उभी राहा. जर कोणी येईल आणि तुला विचारेल, ‘आत कोणी आहे का?’ तर ‘नाही’ असे सांग.”
21सिसेरा थकून झोपलेला होता, परंतु हेबेराची पत्नी याएलने डेर्‍याची मेख आणि हातोडा घेतला आणि हळूच त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात तिने मेख ठोकली व ती आरपार जाऊन जमिनीत रुतून बसली आणि तो मरण पावला.
22बाराक सिसेराचा शोध करीत आला, तेव्हा याएल त्याला सामोरी गेली व म्हणाली, “या, ज्या पुरुषाचा तुम्ही शोध करीत आहात, तो मी तुम्हाला दाखविते.” तो तिच्याबरोबर आत गेला, तेव्हा तिथे डेर्‍याची मेख कपाळातून आरपार जाऊन सिसेरा मरून पडलेला त्याला दिसला.
23त्या दिवशी परमेश्वराने कनानाचा राजा याबीनास इस्राएलसमोर पराजित केले. 24इस्राएली लोकांचे वर्चस्व अधिकाधिक प्रबळ होत गेले आणि शेवटी त्यांनी कनानाचा राजा याबीनचा नाश केला.

सध्या निवडलेले:

शास्ते 4: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन