शास्ते 5
5
दबोराचे गीत
1त्या दिवशी दबोरा आणि अबीनोअमाचा पुत्र बाराकाने हे गीत गाईले:
2“जेव्हा इस्राएलचे राजकुमार पुढे चालतात,
जेव्हा लोक स्वेच्छेने स्वतःला सादर करतात—
याहवेहची स्तुती करा!
3“अहो राजांनो हे ऐका! अधिपतींनो कान द्या!
मी स्वतः याहवेहची#5:3 किंवा याहवेहला स्तुती करेन;
मी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराची स्तुती गाईन.
4“जेव्हा याहवेह तुम्ही सेईरातून बाहेर निघाले,
जेव्हा तुम्ही एदोमाच्या भूमीतून चालत गेले,
पृथ्वी थरारली, आकाशाने जल ओतले,
ढगांनी जलबिंदू खाली ओतले.
5याहवेहसमोर पर्वत थरथरला,
याहवेह इस्राएलच्या परमेश्वरासमोर सीनाय थरकापला.
6“अनथाचा पुत्र शमगारच्या दिवसामध्ये,
याएलच्या काळी राजमार्ग सुने पडले;
प्रवाशांनी वळणाचा मार्ग वापरला.
7इस्राएलमधील ग्रामीण लढणार नाहीत;
मी, दबोरा उठेपर्यंत ते थांबले,
मी, इस्राएलमधील एक माता उठेपर्यंत ते थांबले.
8परमेश्वराने नवीन पुढारी निवडले
जेव्हा युद्ध शहराच्या वेशीजवळ आले होते,
परंतु इस्राएलाच्या चाळीस हजारांमध्ये
एकही ढाल किंवा भाला दिसला नाही.
9माझे हृदय इस्राएलच्या राजपुत्रांसह आहे,
लोकांमध्ये स्वेच्छेने काम करणाऱ्यांबरोबर आहे.
याहवेहची स्तुती हो!
10“तुम्ही जे शुभ्र गाढवांवर स्वार होता,
गालिचांच्या खोगिरावर बसता,
आणि तुम्ही त्या मार्गाने पायी चालणारे,
विचार करा, 11गायकांचा आवाज पाणवठ्याच्या ठिकाणी.
ते याहवेहचे विजयगीत गातात,
इस्राएलच्या गावकर्यांच्या विजयाचे स्मरण करतात.
“नंतर याहवेहचे लोक
शहराच्या द्वाराजवळ गेले.
12‘दबोरा जागी हो, जागी हो!
जागी हो, जागी हो, तुझ्या मुखातून गीत भरभरून वाहो!
ऊठ, हे बाराका!
हे अबीनोअमाच्या पुत्रा, तू बंधनात टाकलेल्या बंदिवानांना घेऊन जा.’
13“राहिलेले सरदार खाली आले;
याहवेहचे लोक बलवान लोकांविरुद्ध माझ्याकडे आले.
14ज्यांचे मूळ अमालेकामध्ये होते, ते काही लोक एफ्राईमामधून आले;
बिन्यामीन तुम्हाला अनुसरण करणार्या लोकांसह होते.
माखीराचे सरदारही आले,
जबुलूनाचे दंडधारी#5:14 या शब्दाचा अर्थ निश्चित नाही सेनापतिसुद्धा आले.
15इस्साखारचे राजपुत्र दबोरा सोबत होते;
होय, इस्साखार बाराक सोबत,
रऊबेनच्या जिल्ह्यांमध्ये
त्याच्या नेतृत्वाखाली खोर्यामध्ये पाठविले
अंतःकरणाचा बारकाईने शोध घेतला गेला.
16मेंढ्यांच्या कळपांची शिट्टी
ऐकण्यासाठी तू मेंढवाड्यात#5:16 किंवा शेकोटी का राहिलास?
रऊबेनच्या जिल्ह्यांमध्ये
अंतःकरणाचा बारकाईने शोध घेतला गेला.
17गिलआद यार्देनेपलीकडे राहिला,
पण दान आपल्या जहाजांपाशीच का राहिला?
आशेर सागरकिनारीच राहिला
आणि खाडीतील त्याच्या सुरक्षित स्थळी राहिला.
18जबुलूनच्या लोकांनी आपल्या जीव धोक्यात घातला;
तसेच नफतालीच्या लोकांनी रणभूमीवर मरणाचा धोका पत्करला.
19“राजे आले, ते लढले,
कनानाचे राजे लढले,
मगिद्दोच्या झर्याजवळ तानख येथे लढले,
त्यांनी चांदीची लूट घेतली नाही.
20आकाशातून तारे लढले,
त्यांच्या मार्गावरून ते सिसेराशी लढले.
21किशोन नदीने त्यांना वाहून नेले,
पुरातन नदी, किशोन नदी.
कूच कर, माझ्या आत्म्या; समर्थ होऊन पुढे जा!
22घोड्यांच्या टापांचा गडगडाट झाला—
घोडे चौखूर उधळले, त्याचे सशक्त घोडे चौखूर उधळले!
23याहवेहच्या दूताने आदेश दिला, ‘मेरोजला शाप द्या.
त्याच्या लोकांना कडवटपणे शाप द्या,
कारण ते याहवेहला मदत करावयाला आले नाहीत,
पराक्रमी लोकांविरुद्ध याहवेहला मदत करावयाला आले नाहीत.’
24“स्त्रियांमध्ये सर्वाधिक आशीर्वादित याएल,
केनी हेबेरची पत्नी,
तंबूत राहणार्या स्त्रियांमध्ये सर्वात धन्य.
25त्याने पाणी मागितले आणि तिने त्याला दूध दिले;
आणि सरदाराला साजेल अशा वाटीत त्याला दही दिले.
26तिचा हात तंबूच्या खुंटीकडे गेला,
उजवा हात कामगाराच्या हातोडीसाठी.
तिने सिसेराला मारले, तिने त्याचे डोके चिरडले.
तिने त्याच्या कपाळाचे भोसकून तुकडे केले.
27तिच्या पायाशी तो खचला, तो पडला,
जिथे तो पडला; तिथेच तो पडून राहिला.
तिच्या पायाशी तो खचला, तो पडला;
जिथे तो खचला, तिथे तो पडला व मेला.
28“खिडकीतून सिसेराच्या आईने डोकावले;
जाळीच्या मागे ती ओरडली,
‘त्याचा रथ येण्यास इतका वेळ का लागला आहे?
त्याच्या रथांचा कल्लोळ ऐकू येण्यास का उशीर होत आहे?’
29तिच्यातील हुशार स्त्रिया तिला उत्तर देतात;
खरंच, ती स्वतःशीच म्हणते,
30‘ते लूट शोधून वाटून तर घेत नाहीत ना:
प्रत्येक पुरुषासाठी एक किंवा दोन स्त्रिया,
सिसेरासाठी लूट म्हणून रंगीबेरंगी वस्त्रे,
रंगीबेरंगी नक्षीदार वस्त्रे,
माझ्या गळ्यात भरतकाम केलेली वस्त्रे—
ही सर्व लूट म्हणून आहेत काय?’
31“याहवेह याप्रकारे तुमच्या सर्व शत्रूंचा नाश होवो!
जसा सूर्य आपल्या सामर्थ्याने उगवतो तसे,
जे लोक तुमच्यावर प्रीती करतात ते सर्व त्या सूर्याप्रमाणे होवोत.”
त्यानंतर देशात चाळीस वर्षे देशात शांतता होती.
सध्या निवडलेले:
शास्ते 5: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.