YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 9

9
अबीमेलेखाची कारकीर्द
1यरूब्बआलचा पुत्र अबीमेलेख हा आपल्या आईच्या भावांना भेटण्यासाठी शेखेम येथे गेला आणि त्यांना व आपल्या आईच्या सर्व घराण्याला तो बोलला, 2“तुम्ही शेखेमातील सर्व नागरिकांना विचारा, ‘तुमच्यासाठी काय उत्तम आहे: यरूब्बआलच्या सर्व सत्तर पुत्रांनी किंवा एक व्यक्तीने तुमच्यावर राज्य करावे?’ स्मरण ठेवा मी तुमच्या रक्तामांसाचा आहे.”
3जेव्हा बंधूंनी हे सर्व शेखेमातील नागरिकांना सांगितले, त्यांनी अबीमेलेखाचे अनुसरण करण्याचे ठरविले, कारण ते म्हणाले, “तो आमचा नातेवाईक आहे.” 4त्यांनी त्याला बआल-बरीथ मंदिरातील सत्तर शेकेल#9:4 अंदाजे 800 ग्रॅ. चांदी दिली आणि अबीमेलेखाने ती अविचारी व लुच्ची माणसे त्याच्यामागे चालण्यासाठी उपयोगी आणली. 5तो ओफराह येथील आपल्या पित्याच्या घरी गेला व तिथे एका दगडावर त्याने आपल्या सत्तर भावांचा म्हणजे यरूब्बआलाच्या पुत्रांचा वध केला. परंतु यरूब्बआलाचा धाकटा पुत्र योथाम लपून निसटून गेला. 6तेव्हा शेखेमातील आणि बेथमिल्लोतील सर्व नागरिकांनी एक सभा बोलावली आणि शेखेमातील स्तंभाजवळील मोठ्या एलावृक्षाजवळ त्यांनी अबीमेलेखाचा राजा म्हणून राज्याभिषेक केला.
7जेव्हा योथामाला हे सांगण्यात आले, तेव्हा तो गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर उभा राहिला व त्यांना उंच वाणीने ओरडून म्हणाला, “शेखेमातील नागरिकांनो माझे ऐका, म्हणजे परमेश्वर तुमचे ऐकतील. 8एकदा वृक्षांनी त्यांच्यासाठी राजाला अभिषिक्त करण्यास गेले. ते जैतून वृक्षाला म्हणाले, ‘तू आमचा राजा हो!’
9“परंतु जैतून वृक्षाने उत्तर दिले, ‘ज्याद्वारे दैवत आणि मनुष्य या दोघांचा सन्मान होतो ते माझे तेल देणे मी सोडून इतर वृक्षांवर हलतडुलत राहावे काय?’
10“नंतर ते वृक्ष अंजिराच्या वृक्षास म्हणाले, ‘ये आणि तू आमचा राजा हो!’
11“परंतु अंजिराच्या वृक्षाने उत्तर दिले, ‘केवळ इतर वृक्षांवर हलतडुलत राहण्यासाठी मी माझे माधुर्य आणि चांगली फळे देण्याचे सोडून द्यावे का?’
12“मग ते वृक्ष द्राक्षवेलास म्हणाले, ‘ये आणि आमचा राजा हो.’
13“परंतु द्राक्षवेलाने उत्तर दिले, ‘केवळ इतर वृक्षांवर हलतडुलत राहण्यासाठी दैवत व मनुष्यांना आनंदित करणारा द्राक्षारस देण्याचे मी सोडून द्यावे का?’
14“अखेरीस सर्व वृक्ष काटेरी झुडूपाला म्हणाले, ‘ये आणि तू आमचा राजा हो.’
15“ते काटेरी झुडूप त्या वृक्षांना म्हणाला, ‘तुमचा राजा म्हणून माझा अभिषेक व्हावा अशी तुमची इच्छा आहे, हे जर सत्य असेल तर या आणि माझ्या सावलीचा आश्रय घ्या; पण जर तसे नसेल तर काटेरी झुडूपातून अग्नी निघो व तो लबानोनाचे गंधसरू भस्म करून टाको!’
16“तुम्ही अबीमेलेखाचा तुमचा राजा करून सन्मानाने आणि चांगल्या विश्वासाने वागलात काय? यरूब्बआल आणि त्याचा कुटुंबासाठी योग्य ते केले आहे का? ज्या योग्यतेचा तो आहे, त्याप्रमाणे त्याच्याशी वागलात का? 17आठवण ठेवा की माझा पिता तुमच्यासाठी लढला व तुम्हाला मिद्यानी लोकांच्या तावडीतून सोडविण्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला. 18परंतु आज तुम्ही माझ्या पित्याच्या कुटुंबाविरुद्ध बंड केले व तुम्ही त्याच्या सत्तर पुत्रांचा एका दगडावर वध केला आणि आता अबीमेलेख जो एक दासीचा पुत्र आहे, त्याला शेखेमातील नागरिकांवर राजा केले आहे, कारण तो तुमचा नातेवाईक आहे. 19आज तुम्ही यरूब्बआल आणि त्याच्या कुटुंबासोबत सन्मानाने आणि सदिच्छेने वागलात काय? तर मग अबीमेलेख तुमचा आनंद होवो आणि तुम्ही त्याचा आनंद होवो! 20परंतु जर तसे नाही, तर अबीमेलेखातून अग्नी निघून तुम्हाला, शेखेमाच्या आणि बेथमिल्लोच्या नागरिकांना भस्म करो आणि शेखेमाच्या आणि बेथमिल्लोच्या नागरिकातून अग्नी निघून अबीमेलेखाला भस्म करो!”
21मग योथाम निसटून गेला व आपला भाऊ अबीमेलेखाच्या भीतीमुळे बैर येथे जाऊन राहिला.
22अबीमेलेखाने इस्राएलावर तीन वर्षे राज्य केल्यानंतर, 23परमेश्वराने अबीमेलेख व शेखेमाच्या नागरिकांमध्ये वैर निर्माण केले, ज्यामुळे त्यांनी अबीमेलेखाचा विश्वासघात केला. 24यरूब्बआलाच्या सत्तर पुत्रांचा विरोधात केलेल्या अपराधाचा, त्यांचा रक्तपात करण्याचा, त्यांचा भाऊ अबीमेलेख आणि शेखेमाच्या नागरिकांवर ज्यांनी अबीमेलेखाचा त्याच्या बंधूंची हत्या करण्यास साहाय्य केले होते, त्यांचा सूड घेण्यास परमेश्वराने असे केले. 25शेखेमाच्या नागरिकांनी त्याच्याविरुद्ध डोंगराच्या माथ्यावर वाटेवर दबा धरण्यास लोक ठेवले आणि त्या वाटेने जाणार्‍या येणार्‍या प्रत्येकाला ते लुबाडू लागले आणि हे कोणीतरी अबीमेलेखाचा सांगितले.
26मग एबेदचा पुत्र गाल आपल्या भावांबरोबर शेखेमास आला आणि तेथील नागरिकांनी त्याच्यावर भरवसा ठेवला. 27नंतर ते शेतात गेले आणि द्राक्षे गोळा केली आणि ती तुडविली व त्यांच्या दैवताच्या मंदिरात उत्सव केला. ते खातपीत असताना त्यांनी अबीमेलेखाला शाप दिला. 28नंतर एबेदचा पुत्र गाल म्हणाला, “अबीमेलेख कोण आहे आणि आम्ही शेखेमी लोकांनी त्याची चाकरी का करावी? तो यरूब्बआलाचा पुत्र नाही का आणि त्याचा कारभारी जबुल नाही का? शेखेमचा पिता हमोरच्या कुटुंबाची तुम्ही सेवा करा! अबीमेलेखाच्या कुटुंबाची आम्ही सेवा का करावी? 29जर हे लोक माझ्या अधिकारात असते तर किती बरे झाले असते! तेव्हाच मी अबीमेलेखाला काढून टाकले असते. मी अबीमेलेखाला म्हणेन, ‘तुझे संपूर्ण सैन्य घेऊन बाहेर पड आणि लढाई कर!’ ”
30परंतु नगराधिपती जबुलाने एबेदचा पुत्र गालचे बोलणे ऐकले तेव्हा तो भयंकर संतापला. 31त्याने अबीमेलेखकडे दूत पाठवून त्याला कळविले, “एबेदचा पुत्र गाल व त्याचे भाऊबंद शेखेमात आले आहेत आणि आता ते या शहराला तुझ्याविरुद्ध चिथावीत आहेत. 32म्हणून आता तू आणि तुझे लोक रात्री या आणि शेतांमध्ये दबा धरून बसा. 33सकाळी अगदी सूर्योदय झाल्याबरोबर शहरावर स्वारी कर. जेव्हा गाल आणि त्याचे लोक तुझ्याविरुद्ध लढण्यास बाहेर येतील, तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी पाहा.”
34तेव्हा अबीमेलेख आणि त्याच्या सर्व सैन्याने रात्रीच कूच केले आणि शेखेमजवळ त्यांनी आपल्या चार टोळ्या केल्या व शहराच्या सभोवती ते दबा धरून बसले. 35आता एबेदचा पुत्र गाल बाहेर आला आणि शहराच्या वेशीजवळ उभा राहिला, अबीमेलेख आणि त्याचे सैन्य जे दबा धरून बसले होते तेही बाहेर आले.
36जेव्हा गालने त्यांना पाहिले, तेव्हा तो जबुलास म्हणाला, “पाहा, डोंगराच्या शिखरांवरून लोक उतरत आहेत!”
जबुल त्याला म्हणाला, “नाही, ती केवळ डोंगराची सावली आहे जी तुला माणसांसारखी दिसत आहे.”
37परंतु गाल परत म्हणाला: “पाहा, मध्य उंचवट्यापासून#9:37 या इब्री शब्दाचा अर्थ पृथ्वीची नाभी लोक खाली येत आहेत आणि दैवप्रश्न करणाऱ्यांच्या एला वृक्षाच्या मागील वाटेने टोळी येत आहे.”
38तेव्हा जबुल त्याला म्हणाला, “आता तुझे ते मोठेपणाचे बोलणे कुठे आहे, तू जे बोलला होता, ‘अबीमेलेख कोण आहे की त्याची चाकरी करावी?’ हीच माणसे आहेत ना ज्यांची तू थट्टा केली होती? तर बाहेर जा आणि त्यांच्याशी लढ!”
39तेव्हा गालने#9:39 किंवा च्या दृष्टिआड गेला शेखेमाच्या नागरिकांना लढण्यासाठी नेले व अबीमेलेखाशी तो लढला. 40नंतर अबीमेलेखाने त्याचा वेशीच्या प्रवेश दारापर्यंत पाठलाग केला आणि पळून जात असता अनेक मृत्युमुखी पडले. 41मग अबीमेलेख अरुमा येथे राहिला आणि जबुलाने गाल आणि त्याच्या भाऊबंदांना शेखेमातून घालवून दिले.
42दुसर्‍या दिवशी शेखेमातील लोक बाहेर शेतात गेले आणि अबीमेलेखाला ही बातमी देण्यात आली. 43म्हणून त्याने लोक घेतले, त्यांना तीन तुकड्या मध्ये विभाजित केले व ते शेतांमध्ये दबा धरून बसले. जेव्हा त्याने पहिले की लोक शहरातून बाहेर येत आहेत, तेव्हा त्याने उठून त्यांच्यावर हल्ला केला. 44अबीमेलेख आणि त्याच्या तुकडीने शहराच्या वेशीजवळ पुढे धावत येऊन ती रोखून धरली. त्याच्या इतर दोन तुकड्यांनी जे शेतात होते त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा शेतांमध्ये संहार केला. 45संपूर्ण दिवसभर अबीमेलेख शहर काबीज करेपर्यंत शहरावर हल्ला करीत राहिला आणि त्याने त्यातील लोकांचा संहार केला. नंतर त्याने शहराचा नाश केला आणि त्यावर मीठ पेरले.
46हे ऐकून शेखेमाचे नागरिक जे बुरुजात होते त्यांनी बआल-बरीथच्या मंदिराशेजारी असलेल्या किल्ल्यामध्ये आश्रय घेतला 47जेव्हा अबीमेलेखाने हे ऐकले की नागरिक शेखेमाच्या बुरुजात एकत्र झाले आहेत, 48अबीमेलेख आणि त्याची सर्व माणसे सलमोन डोंगराकडे गेले. त्याने कुर्‍हाड घेतली आणि झाडांच्या फांद्या तोडून, त्या आपल्या खांद्यावर उचलून ठेवल्या. त्याने आपल्या लोकांना आदेश दिला, “त्वरा करा! तुम्ही मला जे करताना पाहिले तसेच करा!” 49म्हणून सर्व माणसांनी फांद्या तोडल्या आणि अबीमेलेखाच्या मागे चालले. त्यांनी फांद्यांची रास बुरुजाच्या चहूबाजूंनी लावली आणि लोक आत असता त्याला आग लावली. अशा रीतीने शेखेमाच्या बुरुजामध्ये असलेले सुमारे एक हजार स्त्रीपुरुष मरण पावले.
50त्यानंतर अबीमेलेख तेबेस येथे गेला आणि त्याला वेढा दिला आणि ते हस्तगत केले. 51त्या शहरात एक मजबूत बुरूज होता, ज्यामध्ये सर्व पुरुष आणि सर्व स्त्रिया—शहरातील सर्व लोक—बुरुजाकडे पळाले. त्यांनी स्वतःला आतमध्ये बंद करून घेतले आणि बुरुजाच्या छतावर चढले. 52अबीमेलेख बुरुजाकडे गेला आणि त्याने त्यावर हल्ला केला. पण बुरुजाला आग लावण्यासाठी तो प्रवेशद्वाराजवळ गेला असताना, 53एका स्त्रीने जात्याची वरची तळी खाली सरळ अबीमेलेखाच्या डोक्यावर टाकली आणि त्याच्या कवटीचा चुराडा केला.
54त्याने घाईने आपल्या शस्त्रवाहकास बोलावून आदेश दिला, “तुझी तलवार काढ आणि मला ठार कर, ‘एका स्त्रीने त्याला ठार केले, असे कोणीही म्हणू शकणार नाही.’ ” तेव्हा त्या तरुणाने त्याला आपल्या तलवारीने भोसकले आणि तो मरण पावला. 55जेव्हा इस्राएली लोकांनी अबीमेलेख मृत झाल्याचे पाहिले, तेव्हा ते आपापल्या घरी परतले.
56अबीमेलेखाने आपल्या सत्तर भावांचे वध करून आपल्या वडिलांविरुद्ध जी दुष्टाई केली होती, तिची परतफेड परमेश्वराने अशा रीतीने केली. 57शेखेमातील लोकांच्या सर्व दुष्टाईबद्दल परमेश्वराने त्यांना शिक्षा दिली. यरूब्बआलाचा पुत्र योथामचा शापही त्यांच्यावर आला.

सध्या निवडलेले:

शास्ते 9: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन