यिर्मयाह 21
21
याहवेह सिद्कीयाहची विनंती अमान्य करतात
1याहवेहचे वचन यिर्मयाहकडे आले जेव्हा सिद्कीयाह राजाने मल्कीयाहचा पुत्र पशहूर व मासेयाहचा पुत्र सफन्याह याजक यांना यिर्मयाहकडे पाठविले. ते त्याला म्हणाले, 2“आम्हाला साहाय्य करावे, अशी विनंती याहवेहला कर, कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आमच्यावर आक्रमण करणार आहे. याहवेह आमच्यावर कृपा करतील आणि प्राचीन काळी ते करीत असत तसा एखादा महान चमत्कार करून नबुखद्नेस्सरला सैन्य घेऊन परत जायला भाग पाडतील.”
3यावर यिर्मयाहने उत्तर दिले, “सिद्कीयाहला सांगा, 4‘इस्राएलचे परमेश्वर याहवेह म्हणतात की तुम्हाला ज्या बाबेलच्या राजाने व खाल्डियन लोकांनी वेढा घातला आहे, त्यांच्याशी लढताना मी तुमची शस्त्रे तुमच्याच विरुद्ध करेन. मी तुमच्या शत्रूंना या नगराच्या आत एकत्रित करणार आहे. 5माझ्या अतिक्रोध व भयानक कोपामुळे माझा उगारलेला हात व शक्तिशाली भुजा घेऊन मी स्वतःच तुमच्याविरुद्ध लढणार आहे. 6या नगरात राहणाऱ्या सर्वांवर—मनुष्य व प्राणी या दोघांवर—मी भयानक मरी पाठवेन आणि ते मरतील. 7त्यानंतर याहवेहने ही घोषणा केली, मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, त्याचे अधिकारी, व मरीमधून वाचलेल्या या नगरातील सर्व लोकांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्यांचे शत्रू, जे त्यांचा प्राण घेऊ पाहतात त्यांच्या हाती देईन. तो त्यांना तलवारीने ठार करेल; तो त्यांच्यावर कोणतीही दया, करुणा वा कृपा करणार नाही.’
8“पुढे या लोकांना सांग, ‘याहवेह म्हणतात: पाहा मी तुमच्यासमोर जीवनाचा मार्ग आणि मरणाचा मार्ग ठेवला आहे. 9या नगरात जे कोणी राहतील ते तलवारीने, दुष्काळाने, मरीने मरतील. परंतु जे कोणी ज्यांनी तुम्हाला वेढा घातला आहे त्या खास्द्यांच्या सैन्यास समर्पण करतील ते जगतील; त्यांचा जीव वाचेल. 10कारण मी या नगराचे भले नाही, तर विध्वंस करण्याचा निर्धार केला आहे, ही याहवेहची घोषणा आहे. हे नगर बाबेलच्या राजाच्या हाती देण्यात येईल आणि तो ते अग्नीने जाळून भस्म करेल.’
11“यहूदीयाच्या राजघराण्याला असे म्हण, ‘याहवेहचे वचन ऐका. 12दावीदाच्या घराण्याला, याहवेह काय म्हणतात ते ऐका:
“ ‘रोज सकाळी योग्य न्यायनिवाडा करा;
दुष्टांनी ज्याला लुबाडले आहे
अशांना त्यांच्या हातातून सोडवा,
नाहीतर माझा क्रोध भडकेल व अग्नीसारखा पेटेल
कारण तुम्ही दुष्कर्म केले आहे—
हा क्रोधाग्नी कोणीही शांत करू शकणार नाही.
13हे यरुशलेमा, मी तुझ्याविरुद्ध आहे,
तुम्ही जे या खोर्यावर राहता
खडकाळ पठारावरील रहिवासी, याहवेह असे म्हणतात;
तुम्ही म्हणता, “आमच्याविरुद्ध कोण येईल?
आमच्या वस्ती मध्ये कोण प्रवेश करेल?”
14याहवेह म्हणतात,
तुमच्या कृत्याच्या योग्य शिक्षा मी तुम्हाला करेन.
मी तुमच्या अरण्यामध्ये अग्नी पेटवेन
तो तुमच्या सभोवती असलेले सर्वकाही जाळून टाकेल.’ ”
सध्या निवडलेले:
यिर्मयाह 21: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.