यिर्मयाह 20
20
यिर्मयाह आणि पशहूर
1जेव्हा याहवेहच्या मंदिराचा मुख्य अधिकारी इम्मेरचा पुत्र पशहूर याजक, याने यिर्मयाहास अशी भविष्यवाणी करताना ऐकले, तेव्हा 2पशहूराने यिर्मयाह संदेष्ट्याला पकडून फटके मारविले आणि याहवेहच्या मंदिराजवळच्या बिन्यामीन दरवाजाजवळ खोड्यात अडकवून ठेवले. 3पशहूरने जेव्हा दुसर्या दिवशी यिर्मयाहाला खोड्यातून मोकळे केले, तेव्हा यिर्मयाह त्याला म्हणाला, “याहवेहने तुझे पशहूर नाव बदलून, येथून पुढे सर्व बाजूने दहशत असे ठेवले आहे. 4याहवेह असे म्हणतात: मी तुला स्वतःकरिता व तुझ्या मित्राकरिता दहशत असे करेन; ते सर्व शत्रूंच्या तलवारींनी बळी पडलेले तू आपल्या नजरेने पाहशील. मी संपूर्ण यहूदीया प्रांत बाबेलच्या राजाच्या स्वाधीन करेन, तो या लोकांना गुलाम करून बाबेलला नेईल किंवा त्यांना ठार मारेल. 5मी या नगरातील सर्व संपत्ती त्यांच्या शत्रूंच्या हातात देईन—सर्व उत्पादन, सर्व जडजवाहीर आणि यहूदीयाच्या राजांचा सर्व खजिना. ते त्यांना लुटतील आणि बाबेलला ते घेऊन जातील. 6आणि हे पशहूरा, तू स्वतः व तुझ्यासह तुझ्या घरात राहणारे सर्वजण बाबेलमध्ये बंदिवासात जाल. तू तिथेच मरशील व पुरला जाशील, तू व ज्यांच्याकडे तू खोटी भविष्यवाणी केलीस त्या तुझ्या सर्व मित्रगणाची गतही तशीच होईल.”
यिर्मयाहची तक्रार
7याहवेह, तुम्ही मला फसविले#20:7 किंवा पाठलाग केला आणि मी फसलो;
तुम्ही माझ्यापेक्षा प्रबळ आहात म्हणून विजयी झालात.
मी दिवसभर उपहासाचा विषय झालो आहे;
सर्वजण माझी थट्टा करतात.
8जेव्हा मी बोलू लागतो, मी आक्रोश करतो
हिंसाचार व विनाश हेच जाहीर करतो.
कारण याहवेहच्या वचनामुळे माझ्या वाट्याला
दिवसभर निंदा व अप्रतिष्ठाच आली आहे.
9परंतु जर मी म्हटले, “मी त्यांचे शब्द उच्चारणार नाही
किंवा त्यांच्या नावाने संदेश देणार नाही,”
तर त्यांचे वचन माझ्या अंतःकरणात अग्नीप्रमाणे पेटते,
व तो अग्नी माझ्या हाडात बंदिस्त राहतो.
तो आतील आत इतःपर दाबून ठेवणे मला असह्य होते.
निश्चितच, मी ते करू शकत नाही.
10मी कित्येकांना कुजबुजतांना ऐकले आहे,
“सर्व बाजूंनी दहशत!
त्याला दोषी ठरवा! चला, त्याला दोषी ठरवू या!”
माझे सर्व मित्रगण
माझ्या हातून एखादी चूक होण्याची वाट पाहत आहेत. ते म्हणतात,
“कदाचित त्याची फसवणूक होईल;
मग आपण त्याच्यावर वर्चस्व करू
आणि आपला सूड उगवू.”
11परंतु याहवेह सामर्थ्यवान योद्ध्यासारखे माझ्यासोबत आहेत;
म्हणून माझा छळ करणारे अडखळतील व वरचढ होणार नाहीत.
ते पराजित होतील आणि पुरेपूर फजीत होतील;
आणि त्यांची अप्रतिष्ठा कधीही विसरली जाणार नाही.
12हे सर्वसमर्थ याहवेह, तुम्ही नीतिमानाची पारख करता
अंतःकरणाची व मनाची तपासणी करता,
तुम्ही त्यांचा सूड घेतांना मला पाहू द्या,
कारण मी माझी फिर्याद तुमच्यापुढे सादर केली आहे.
13याहवेहचे स्तवन करा!
याहवेहची स्तुती गा!
दुष्टजनांच्या हातातून
ते गरजवंताचे प्राण वाचवितात.
14मी जन्मलो तो दिवस शापित होवो!
ज्या दिवशी आईने मला जन्म दिला तो आशीर्वादित नसो!
15“तुला बाळ झाले आहे—पुत्र झाला आहे!”
हा संदेश ज्या मनुष्याने माझ्या पित्यास कळविला, तो मनुष्य शापित असो,
याव्दारे त्यांना मोठा आनंद झाला होता.
16याहवेहने दयामाया न दाखविता प्राचीन नगरांचा जसा नाश केला,
तसाच त्या निरोप्याचाही नाश होवो.
सकाळी तो शोकगीते ऐको,
व दुपारी रणगर्जना.
17कारण त्यांनी मला गर्भाशयामध्ये मारून टाकले नाही,
मी माझ्या आईच्या उदरातच मेलो असतो,
तिचे गर्भाशयच माझी कबर होऊन ते विस्तृत झाले असते,
18मी गर्भाशयातून बाहेरच का आलो,
ही संकटे व दुःख बघण्यासाठी
आणि अप्रतिष्ठा सोसत जीवनाचा शेवट करण्यासाठी?
सध्या निवडलेले:
यिर्मयाह 20: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.