इय्योब 6
6
इय्योब
1इय्योबाने उत्तर दिले:
2“माझे क्लेश जर केवळ तोलून पाहिले
आणि माझी सर्व विपत्ती तागडीत घातली तर!
3ते खचितच वजनाने समुद्राच्या वाळूपेक्षा जास्त भरतील.
म्हणूनच माझे शब्द उतावळेपणाचे आहेत ह्यात काही आश्चर्य नाही.
4सर्वसमर्थाचे तीर माझ्यात शिरले आहेत,
त्या तीरांचे विष माझा आत्मा पिऊन टाकतो;
परमेश्वराचा आतंक माझ्याविरुद्ध उभा आहे.
5गवत मिळते तेव्हा रानगाढव ओरडते काय,
किंवा बैलापुढे चारा असतो तेव्हा तो हंबरतो काय?
6बेचव पदार्थ मिठावाचून खाता येतो काय,
किंवा अंड्याच्या पांढर्या बलकाला रुची असते काय?
7त्याला मी स्पर्श करण्याचे नाकारतो;
असे अन्न मला आजारी बनवते.
8“अहा! जर मी मागितलेले मला मिळाले,
ज्याची मी आशा करतो ते परमेश्वराने दिले,
9की परमेश्वराने त्यांच्या इच्छेनुसार मला चिरडून टाकावे,
आपला हात ढिला सोडून माझ्या जिवाचा नाश करावा!
10तरीही हे मला सांत्वनच असणार—
आणि तीव्र क्लेशातही माझा आनंद असणार—
कारण त्या परमपवित्रांची वचने मी धिक्कारली नाहीत.
11“मी आशा धरावी अशी माझ्यात काय शक्ती आहे?
माझ्यात असे काय आहे की मी धीर धरावा?
12माझ्याठायी खडकाचे सामर्थ्य आहे काय?
किंवा माझे शरीर कास्याचे आहे काय?
13आता यश माझ्यापासून दूर केले गेले आहे,
मग माझ्यात स्वतःला मदत करण्यासाठी शक्ती आहे का?
14“जो कोणी मित्रावर दया करण्यापासून स्वतःस आवरतो
त्याने सर्वसमर्थाचे भय सोडून दिले आहे.
15माझे बंधुजन खंडित झालेल्या ओढ्याप्रमाणे,
वाहून जाणार्या ओहोळाप्रमाणे दगा देणारे आहेत
16जो ओढा वितळणार्या बर्फाने अदृश्य होतो;
आणि द्रवीकरण होत असलेल्या हिमामुळे तो फुगून जातो,
17तो तापला म्हणजे आटून जातो;
उन्हाळ्यात तो आपल्या जागीच नाहीसा होतो.
18प्रवासी काफिले टवटवीत होण्यासाठी बाजूला वळतात,
परंतु ते ओसाड ठिकाणी जातात आणि नष्ट होतात.
19तेमाच्या काफिल्यांनी पाण्याचा शोध केला,
शबाच्या व्यापारी प्रवाशांनी पाण्याची आशा धरली.
20ते त्रस्त झाले, कारण त्यांना खात्री झाली होती;
केवळ निराश होण्यासाठी ते तिथे आले.
21तुम्ही सुद्धा माझी मदत करू शकत नाही असे सिद्ध झाले आहे;
कारण अनर्थ पाहिला की तुम्ही घाबरून जाता.
22‘माझ्यावतीने काहीतरी द्या,
तुमच्या संपत्तीतून माझी किंमत मोजून मला मुक्त करा,
23माझ्या शत्रूच्या हातातून मला सोडवा,
किंवा निर्दयाच्या तावडीतून माझी सुटका करा,’ मी कधी असे म्हटले का?
24“मला शिकवा आणि मी शांत बसेन;
मी कुठे चुकलो ते मला सांगा.
25सत्य बोलणे हे किती क्लेशदायक असते!
परंतु तुमचे वाद काय सिद्ध करतात?
26तुम्ही मला शब्दात धरावयास पाहता का,
माझे निराशेचे शब्द वार्यासारखे वाटतात का?
27तुम्ही तर अनाथांवर चिठ्ठ्या टाकण्यास
व आपल्या मित्रांची विक्री करण्यास चुकत नाही.
28“पण आता कृपा करून माझ्याकडे नीट पाहा.
मी तुमच्या तोंडावर तुमच्याशी लबाडी करेन, असे तुम्हाला वाटते का?
29कळवळा येऊ द्या, अन्याय करू नका;
पुन्हा विचार करा, कारण माझी सत्यता पणास लागली आहे.#6:29 किंवा माझे नीतिमत्व स्थिर आहे
30माझ्या जिभेवर काही दुष्टपणा आहे काय?
माझ्या मुखाला अधर्माची पारख नाही काय?
सध्या निवडलेले:
इय्योब 6: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.