इय्योब 7
7
1“या पृथ्वीवर मानवाला कठीण श्रम करावे लागत नाहीत का?
त्यांचे दिवस हे मोलकर्यासारखे नाहीत काय?
2जसा गुलाम उत्कंठेने संध्याकाळच्या छायेची उत्कंठेने वाट पाहतो,
किंवा जसा मजूर वेतनासाठी आशा लाऊन असतो,
3त्याचप्रमाणे मला निष्फळतेचे महिने दिले गेलेले आहेत,
कष्टाच्या रात्री माझ्यासाठी नेमलेल्या आहेत.
4मी झोपी जाण्याच्या वेळी विचार करतो, ‘उठण्यासाठी अजून किती वेळ आहे?’
रात्र काही संपतच नाही, पहाटेपर्यंत मी तळमळत असतो.
5माझे मांस किड्यांनी व खपल्यांनी आच्छादून गेले आहे;
माझी त्वचा फाटून चिघळत आहे.
6“माझे दिवस विणकर्याच्या मागापेक्षा वेगवान आहेत,
आणि ते आशेविनाच संपतात.
7हे परमेश्वरा माझे जीवन मात्र श्वास आहे याची आठवण करा;
माझे नेत्र पुन्हा कधीही सुख पाहणार नाहीत.
8जे मला आता पाहतात ते मला आणखी पाहणार नाहीत;
तुम्ही मला शोधाल पण मी अस्तित्वहीन असेन.
9ढग जसे विरळ होऊन नाहीसे होतात,
त्याचप्रमाणे जो कबरेत जातो तो कधीही परत येत नाही.
10तो आपल्या घरी परत कधीही येणार नाही;
त्याचे वसतिस्थान त्याला पुन्हा ओळखणार नाही.
11“म्हणून मी शांत राहणार नाही;
मी आपल्या आत्म्याचा खेद उघड करून सांगेन,
माझ्या जिवाच्या कडूपणात मी गार्हाणे करेन.
12मी सागर किंवा खोल पाण्यातील विक्राळ जलचर आहे का,
की तुम्ही माझ्यावर पहारा करावा?
13जेव्हा मला वाटते की माझे अंथरूण मला समाधान देईल,
आणि माझा पलंग माझे गार्हाणे हलके करेल,
14तेव्हा सुद्धा तुम्ही मला स्वप्नांनी घाबरवितात
आणि दृष्टान्तांनी मला भेडसावतात,
15असे की या माझ्या शारीरिक स्थितीपेक्षा,
गळा दाबून मरणे मला बरे वाटते.
16मी आपल्या जिवाचा तिरस्कार करतो; मी सर्वकाळ जगणार नाही.
मला एकटे असू द्या; माझ्या जीवनाला काही अर्थ नाही.
17“मानव तो काय की तुम्ही त्याला इतके महत्त्व द्यावे,
व आपले चित्त त्याच्यावर ठेवावे,
18दररोज सकाळी त्याची परीक्षा घ्यावी
आणि प्रत्येक क्षणाला त्याची पारख करावी?
19माझ्यावरची तुमची नजर कधीही वळवणार नाही का,
एकही क्षण मला एकटे सोडणार नाही का?
20जर मी पाप केले, तर ज्या तुमची नजर लोकांवर लागलेली असते,
त्या तुमचे मी काय केले?
माझ्यावर नेम धरावा म्हणून तुम्ही मला निशाणा करून का ठेवले आहे?
मी तुम्हाला ओझे असे झालो आहे का?
21माझ्या अपराधांची क्षमा करून
माझ्या पापांची गय का करीत नाही?
कारण लवकरच मी धुळीत पडणार आहे,
तुम्ही माझा शोध कराल, परंतु मी अस्तित्वात नसेन.”
सध्या निवडलेले:
इय्योब 7: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.