इय्योब 8
8
बिल्दद
1तेव्हा बिल्दद शूहीने उत्तर दिले,
2“कुठवर अशा गोष्टी तू बोलत राहशील?
सोसाट्याच्या वार्यासारखे तुझे शब्द आहेत.
3परमेश्वर न्याय विपरीत करतात काय?
सर्वसमर्थ जे योग्य आहे त्याचा विपर्यास करतात काय?
4जेव्हा तुझ्या मुलांनी त्यांच्याविरुद्ध पाप केले,
म्हणून परमेश्वराने त्यांच्या पापाची त्यांना शिक्षा केली.
5परंतु जर तू मनःपूर्वक परमेश्वराला शोधशील
आणि सर्वसमर्थाकडे विनवणी करशील,
6जर तू शुद्ध व सरळ आहेस,
आतासुद्धा ते तुझ्या वतीने उभे राहतील
आणि तुला तुझ्या समृध्दीच्या स्थितीत पुनर्स्थापित करतील.
7तुझा प्रारंभ लीन असला,
तरी तुझे भावी आयुष्य समृद्धीचे होईल.
8“पूर्वीच्या पिढ्यांना विचार
आणि त्यांचे पूर्वज काय शिकले ते शोधून काढ,
9कारण आपण तर केवळ काल जन्माला आलो आहोत आणि आपण काही जाणत नाही,
आणि पृथ्वीवरील आपले दिवस केवळ सावलीच आहे.
10आपले पूर्वज तुला बोध करून सांगणार नाहीत काय?
त्यांच्या सुज्ञतेचे शब्द ते पुढे आणणार नाहीत काय?
11लव्हाळ्याची चिखला वाचून वाढ होईल काय?
वेत पाण्याविना भरभरून वाढेल काय?
12तो वाढतो पण कापला जात नाही,
गवतापेक्षा तो लवकर सुकून जातो.
13जे सर्व परमेश्वराला विसरतात त्यांचा शेवट असाच होतो;
देवहीन मनुष्याची आशा नष्ट होते.
14ठिसूळ गोष्टींवर त्यांची भिस्त असते,
ज्यावर ते अवलंबून राहतात ते मकडीच्या जाळासारखे आहे.
15ते जाळ्यावर विसंबून राहतील, परंतु ते टिकून राहवयाचे नाही;
ते त्याला बिलगतील, परंतु ते मजबूत राहत नाहीत.
16सूर्यप्रकाशात भरपूर पाणी दिलेल्या रोपट्यासारखे ते होतात.
त्यांच्या फांद्या बागेत सर्वत्र पसरतात.
17त्याची मुळे दगडांच्या चोहो बाजूंना वेढतात.
आणि त्यांच्यामध्ये आपली जागा शोधतात.
18परंतु जेव्हा त्याला त्याच्या जागेवरून उपटून टाकले जाते,
तर ती जागा त्याला नाकारून म्हणते, ‘मी तुला कधीही पाहिले नाही.’
19त्याचे जीवन खचित कोमेजून जाते,
आणि मातीतून दुसरी रोपटे आनंदाने उगवतात.
20“परंतु पाहा! जो निर्दोष आहे, अशाचा परमेश्वर धिक्कार करत नाही,
किंवा दुष्कर्म्याचा हातही सबळ करत नाही.
21परमेश्वर अजूनही तुझे मुख हास्याने,
व तुझे ओठ आनंद घोषाने भरतील.
22तुझे शत्रू लज्जा पांघरतील,
आणि दुष्टांचे निवासस्थान अस्तित्वात राहणार नाही.”
सध्या निवडलेले:
इय्योब 8: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.