लेवीय 1
1
होमार्पण
1याहवेहनी मोशेला बोलाविले आणि सभामंडपातून त्याच्याशी बोलणे केले. ते म्हणाले, 2“इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा तुमच्यामधील कोणी याहवेहसाठी अर्पण आणतील, तेव्हा तुमच्या गुरांमधील किंवा कळपातील प्राण्यांचे अर्पण आणावे.
3“ ‘जर हे होमार्पण गुरांमधून करावयाचे असेल, तर निर्दोष असलेला नरगोर्हा तुम्ही अर्पण करावा. तुम्ही ते सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ आणावे, म्हणजे ते याहवेहद्वारे मान्य केले जाईल. 4तुम्ही तुमचे हात त्या होमार्पणाच्या मस्तकावर ठेवावे आणि प्रायश्चित्त म्हणून तुमच्याऐवजी ते तुमच्यासाठी स्वीकारले जाईल. 5तुम्ही याहवेहसमोर त्या गोर्ह्याचा वध करावा आणि नंतर अहरोनाचे जे पुत्र याजक आहेत, ते त्याचे रक्त आणतील आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या वेदीभोवती शिंपडतील. 6तुम्ही यज्ञपशूची कातडी काढावी आणि पशूचे कापून तुकडे करावे. 7अहरोनाचे जे पुत्र याजक आहेत, त्यांनी वेदीवर अग्नी ठेवावा आणि अग्नीवर लाकडांची रचना करावी. 8नंतर अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी वेदीवर जळत असलेल्या लाकडांवर त्या पशूचे तुकडे, शिर व चरबी यासह व्यवस्थित रचून ठेवावी. 9पाय व आतडी पाण्याने धुऊन याजकाने त्या सगळ्यांचे वेदीवर होम करावे. हे होमार्पण आहे, हे अन्नार्पण आहे. याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.
10“ ‘जर हे होमार्पण कळपातून आणलेले, मेंढी किंवा शेळी असेल तर तुम्ही दोष नसलेल्या नराचे अर्पण करावे. 11तुम्ही याहवेहसमोर वेदीच्या उत्तर दिशेला त्या प्राण्याचा वध करावा आणि अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीभोवती शिंपडावे. 12मग त्या पशूचे कापून तुकडे करावेत आणि याजकाने शिर व चरबी यासह ते तुकडे वेदीवरील लाकडांवर ठेवावे. 13त्याची आतडी आणि पाय तुम्ही पाण्याने धुऊन घ्यावीत आणि याजकाने हे सर्व घेऊन यावे आणि त्यांचा वेदीवर होम करावा. हे होमार्पण आहे, हे अन्नार्पण आहे, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.
14“ ‘जर याहवेहसाठी पक्ष्यांचे होमार्पण म्हणून अर्पण असेल तर त्याने पारवा किंवा कबुतराची पिल्ले अर्पण करावी. 15याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगळून काढावे आणि त्याचे वेदीवर होम करावे; त्याचे रक्त वेदीच्या बाजूला वाहू द्यावे. 16त्याने त्या पक्ष्याची चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस राख टाकावयाच्या जागी फेकून द्यावी. 17तो त्याला पंखांच्या मधोमध फाडेल, त्याचे पूर्णपणे तुकडे करणार नाही आणि नंतर याजक त्याचे वेदीवरील जळत्या लाकडांवर होमार्पण करेल. हे होमार्पण आहे, हे अन्नार्पण आहे, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.
सध्या निवडलेले:
लेवीय 1: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.