नीतिसूत्रे 29
29
1अनेकदा कान उघाडणी केली तरीही जो ताठ मानेचाच राहतो,
त्याचा अचानक नाश होईल—त्याला कोणताही इलाज नसेल.
2जेव्हा नीतिमानाची भरभराट होते, तेव्हा लोक हर्षोल्हास करतात;
जेव्हा दुष्ट सत्ताधारी झाले की, लोक दुःखाने विव्हळतात.
3ज्या मनुष्याला ज्ञान प्रिय आहे, तो त्याच्या वडिलांना आनंदी करतो,
परंतु वेश्यांच्या सहवासात राहणारा आपले धन उधळतो.
4न्यायाने राजा राष्ट्राला स्थैर्य देतो,
परंतु ज्याला लाचेचा लोभ#29:4 किंवा लाच देतो असतो, तो ते कोसळून टाकतो.
5जे लोक त्यांच्या शेजार्यांची खुशामत करतात,
ते त्यांच्या पायासाठी सापळा पसरवितात.
6दुष्ट कृत्ये करणारे स्वतःच्या पापामुळेच सापळ्यात अडकतात,
परंतु नीतिमान आनंदाने गर्जना करतात आणि हर्षित असतात.
7नीतिमानाला गरिबांच्या हक्कांची काळजी असते,
पण दुष्ट अशा गोष्टीची पर्वा करीत नाही.
8टवाळी करणारे शहरात गोंधळ करतात,
परंतु सुज्ञ लोक राग घालवून टाकतात.
9सुज्ञानी मनुष्य जर मूर्खाबरोबर न्यायालयात गेला,
तर मूर्ख संतापतो आणि थट्टा करतो आणि तिथे शांतिभंग करतो.
10हिंसाचारी मनुष्य प्रामाणिक मनुष्याचा द्वेष करतो,
आणि नीतिमानाची हत्या करण्याची योजना करतो.
11मूर्ख त्याच्या रागाच्या उद्रेकाला पूर्ण वाट करून देतो,
परंतु सुज्ञ माणसे शेवटी शांती प्रस्थापित करतात.
12जर राजा लबाड गोष्टी ऐकत असेल,
तर त्याचे सर्व अधिकारी दुष्ट होतील.
13गरीब मनुष्य व जुलमी मनुष्य यांच्यामध्ये एक गोष्ट समान आहे:
ती म्हणजे याहवेह दोघांना दृष्टी प्रदान करतात.
14जर राजा गरिबांना योग्य न्याय देतो,
तर त्याचे सिंहासन दीर्घकाल टिकेल.
15छडी व ताकीद यामुळे ज्ञान मिळते;
परंतु बालकाला बेशिस्त सोडल्यास, ते आपल्या आईला कलंकित करते.
16जेव्हा दुष्टाची भरभराट होते, तेव्हा पापाचीही वाढ होते,
परंतु नीतिमान दुष्टांचे पतन पाहतील.
17तुमच्या बालकांना शिस्त लावा म्हणजे ते तुम्हाला शांती देतील;
ते तुम्हाला पाहिजे तो आनंद देतील.
18जिथे लोकांना दर्शन नाही, तिथे लोक बेबंद असतात.
परंतु तो धन्य आहे जो ज्ञानाच्या शिक्षणाकडे लक्ष लावतो.
19केवळ शब्दांनी नोकर सुधारू शकत नाहीत;
जरी त्यांना समजते, तरी ते प्रतिसाद देणार नाहीत.
20बोलण्यास उतावळा अशा कोणाला तुम्ही पाहिले आहे काय?
मूर्खाला त्यांच्यापेक्षा अधिक आशा आहे.
21ज्या चाकराचा लहानपणापासून लाड होतो,
तर मोठेपणी तो उद्धट होईल.
22क्रोधिष्ट मनुष्य भांडण सुरू करतो,
आणि तापट मनुष्य अनेक पापे करतो.
23अहंकार व्यक्तीच्या अधःपतनाचे कारण ठरतो;
परंतु जो आत्म्याने नम्र आहे, त्याला सन्मान मिळतो.
24चोरांचे साथीदार स्वतःचेच शत्रू आहेत;
ते शपथ घेतात आणि सत्य सांगण्याचे धैर्य करत नाहीत.
25मनुष्याचे भय धोकादायक सापळा असतो,
परंतु जो याहवेहवर विश्वास ठेवतो त्याला सुरक्षित ठेवण्यात येते.
26पुष्कळ लोक राजाची भेट घेण्याचा प्रयत्न करतात,
परंतु योग्य न्याय याहवेहकडूनच मिळतो.
27नीतिमान अप्रामाणिक माणसांचा द्वेष करतात;
दुष्ट माणसे प्रामाणिक माणसांचा द्वेष करतात.
सध्या निवडलेले:
नीतिसूत्रे 29: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.