YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 140

140
स्तोत्र 140
संगीत दिग्दर्शकाकरिता दावीदाची रचना. एक स्तोत्र.
1याहवेह, मला दुष्ट लोकांपासून सोडवा;
हिंसक लोकांपासून मला सुरक्षित ठेवा.
2ते सतत मनात दुष्ट योजना करीत असतात
व दररोज युद्ध भडकावित असतात.
3त्यांनी त्यांच्या जिभा सर्पाच्या जिभेप्रमाणे तीक्ष्ण केली आहे;
नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते. सेला#140:3 सेला या इब्री शब्दाचा अर्थ कदाचित गीत गाताना मध्ये थोडे थांबणे असा आहे
4दुष्टांपासून माझे रक्षण करा, याहवेह;
त्या हिंसक लोकांपासून मला सुरक्षित ठेवा,
कारण मला पाडण्याचा ते कट करीत आहेत.
5या गर्विष्ठ लोकांनी मला पकडण्यासाठी पाश लपविले आहेत;
त्यांनी रस्त्याच्या बाजूस दोरांचे जाळे पसरले आहे,
आणि माझ्या मार्गावर सापळे रचले आहेत. सेला
6याहवेहला मी म्हणतो, “तुम्हीच माझे परमेश्वर आहात.”
याहवेह, माझ्या विनवणीकडे कान द्या.
7सार्वभौम याहवेह, माझ्या सामर्थ्यवान तारणकर्त्या,
युद्ध समयी तुम्हीच माझे शिरस्त्राण व्हा.
8या दुष्ट लोकांची अभिलाषा पूर्ण होऊ देऊ नका, याहवेह,
त्यांच्या योजना यशस्वी होऊ देऊ नका. सेला
9ज्यांनी मला वेढा घातला आहे, त्यांचे मस्तक गर्वाने उंचावलेले आहे;
त्यांच्या मुखातून निघालेले कपट त्यांच्यावरच उलटो.
10त्यांच्या मस्तकांवर निखारे पडोत;
ते अग्नीत फेकले जावोत,
जिथून सुटका होणार नाही, अशा खोल खाचात ते टाकले जावोत.
11या आमच्या भूमीवर निंदकांची वस्ती होऊ नये;
संकटे त्यांना शोधून त्यांचा नाश करोत.
12मला माहीत आहे की याहवेह गरिबांना न्याय देतात,
आणि गरजवंतांना खात्रीने साहाय्य करतात.
13निश्चितच नीतिमान लोक तुमची उपकारस्तुती करतील;
आणि नीतिमान तुमच्या समक्षतेत राहतील.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 140: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन