YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटीकरण 11

11
दोन साक्षीदार
1मग मला एक मापनपट्टी देण्यात आली आणि मला सांगण्यात आले, “जा परमेश्वराच्या मंदिराचे आणि वेदीचे मोजमाप उपासकांसहित घे. 2पण पवित्र मंदिरा बाहेरच्या अंगणाचे माप घेऊ नको, कारण ते गैरयहूदीयांना देण्यात आले आहे. गैरयहूदी राष्ट्रे यरुशलेम शहरास बेचाळीस महिने पायाखाली तुडवतील. 3आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना घोंगडे पाट नेसून 1,260 दिवस भविष्य सांगण्यासाठी निवडणार आहे.” 4ते दोन साक्षीदार पृथ्वीच्या प्रभुसमोर उभे असलेले “दोन जैतून वृक्ष” व दोन समया आहेत. 5आणि त्यांना कोणी अपाय करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्या तोंडातून अग्नी निघतो आणि त्यांच्या वैर्‍यांना गिळून घेतो आणि जर कोणी मनुष्य त्यांना अपाय करू इच्छील तर तो अशाप्रकारे मारला जाणे आवश्यक आहे. 6त्यांच्या भविष्यवाणी करण्याच्या काळात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला आहे; तसेच पृथ्वीवरील नद्यांचे व समुद्रांचे पाणी रक्तमय करण्याचा व त्यांना वाटेल तेव्हा आणि वाटेल तितक्या वेळा, लोकांत पीडा उत्पन्न करण्याचाही अधिकार देण्यात आला आहे.
7त्यांची साक्ष संपल्यानंतर, अथांग कूपातून येणारा पशू त्यांच्याविरुद्ध लढाई करील आणि त्यांचा पाडाव करून त्यांना ठार करील. 8ज्या मोठ्या शहराला लाक्षणिक अर्थाने सदोम आणि इजिप्त असे म्हटले आहे, आणि ज्या शहरात त्यांच्या प्रभुला क्रूसावर खिळण्यात आले होते, त्या शहरातील रस्त्यांवर त्यांची प्रेते पडून राहतील. 9सर्व लोक, वंश, भाषा बोलणारे आणि राष्ट्रे ती त्यांची प्रेते साडेतीन दिवस टक लावून पाहतील आणि त्यांना पुरण्यास नकार देतील. 10उलट, आपला इतका छळ करणार्‍या या दोन संदेष्ट्यांच्या मृत्यूबद्दल सर्व जगभर लोक जागोजागी आनंदोत्सव करतील, एकमेकांना भेटी देतील.
11पुढे साडेतीन दिवसानंतर परमेश्वरापासून येणारा जीवनदायी श्वास त्यांच्यामध्ये संचारला, तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांचा थरकाप उडाला. 12मग स्वर्गातून एक मोठी वाणी त्यांच्याबरोबर बोलताना त्यांनी ऐकली. ती म्हणाली, “इकडे वर या!” तेव्हा ते आपल्या शत्रूंच्या देखत मेघारूढ होऊन स्वर्गात वर गेले.
13त्याच घटकेस एक प्रचंड भूमीकंप झाला, आणि शहराचा एक दशांश भाग जमीनदोस्त होऊन, सात हजार लोक मरण पावले. तेव्हा भूमीकंपातून वाचलेल्या प्रत्येकाने भयभीत होऊन स्वर्गीय परमेश्वराचे गौरव केले.
14दुसरा अनर्थ संपला; पण पाठोपाठ तिसरा अनर्थ लवकर येत आहे.
सातवे रणशिंग
15कारण त्याचवेळी सातव्या देवदूताने आपला रणशिंग वाजविला, त्याबरोबर स्वर्गातून अनेक प्रचंड ध्वनी झाले, त्या वाण्या म्हणत होत्या:
“जगाचे राज्य
आमच्या प्रभुचे आणि त्यांच्या ख्रिस्ताचे झाले आहे,
ते युगानुयुग राज्य करील.”
16तेव्हा परमेश्वरासमोर, आपल्या आसनांवर बसलेल्या चोवीस वडीलजनांनी परमेश्वरापुढे दंडवत करून त्यांची उपासना केली. 17ते म्हणाले:
“हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो.
जे आहे, आणि जे होते,
आता तुम्ही आपले महान सामर्थ्य प्रकट करून
तुमच्या शासनाची सुरुवात केली आहे.
18राष्ट्रे तुमच्यावर क्रोधाविष्ट झाली होती;
पण आता तुम्ही त्यांच्यावर क्रोधाविष्ट होण्याची वेळ आली आहे.
आता मृतांचा न्याय करण्याची वेळ आली आहे,
तुमचे सेवक संदेष्टे,
तुमचे पवित्रजन आणि तुमच्या नावाचे भय धरणारे सर्व लहान थोर अशा सर्वांना पारितोषिके देण्याची,
आणि पृथ्वीवर नाश करणार्‍यांचा नाश
करण्याची वेळ आली आहे.”
19तेव्हा स्वर्गात परमेश्वराचे मंदिर उघडण्यात आले, आणि मंदिरात असलेला परमेश्वराच्या करारांचा कोश दिसू लागला. विजा चमकू लागल्या, मेघगर्जना आणि गडगडाट होऊ लागला. भूमीकंप झाला आणि गारांचे मोठे वादळ झाले.

सध्या निवडलेले:

प्रकटीकरण 11: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन