प्रकटीकरण 2
2
इफिस येथील मंडळीस
1“इफिस येथील मंडळीच्या देवदूताला लिही:
जो आपल्या उजव्या हातात सात तारे धरतो, व जो सोन्याच्या सात समयांमध्ये चालतो, त्यांचे हे शब्द आहेत.
2तुमची कृत्ये, तुमचे परिश्रम आणि तुमचा धीर मी पाहिला आहे. दुष्ट लोक तुम्हाला सहन होत नाहीत हे मला माहीत आहे. प्रेषित नसताना स्वतःला प्रेषित म्हणविणार्यांची परीक्षा करून ते कसे लबाड आहेत, हे तुम्ही शोधून काढले आहे. 3माझ्या नावासाठी, तुम्ही खचून न जाता धीराने दुःख सोसले आहे. 4परंतु तुझी जी पहिली प्रीती होती ती तू सोडली आहेस, याविषयी तुला दोष देणे मला भाग आहे. 5तुम्ही कसे पतन पावलात याची आठवण करा! पश्चात्ताप करा आणि जी कृत्ये तुम्ही पूर्वी करीत होता ती करा. जर तुम्ही पश्चात्ताप करणार नाही, तर मी तुमच्याकडे येईन आणि तुमची समयी तिच्या स्थानापासून दूर करीन. 6पण एक गोष्ट तुमच्यात अनुकूल आहे: माझ्याप्रमाणेच तू देखील निकलाइतांच्या कृत्त्यांचा द्वेष करतोस. 7ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको, आत्मा मंडळयास काय म्हणतो, जो विजय मिळवितो, त्याला मी परमेश्वराच्या स्वर्गलोकात असलेल्या जीवनाच्या वृक्षाचे फळ खाण्याचा अधिकार देईन.
स्मुर्णा येथील मंडळी
8“स्मुर्णा येथील मंडळीच्या देवदूताला लिही:
जे पहिले व शेवटले, जो मरण पावला होते व जिवंत झाले, ते असे म्हणतात.
9मी तुझे दुःख आणि दारिद्रय जाणतो, तरीपण तू धनवान आहेस! आणि जे म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते नाहीत तर सैतानाचे सभास्थान आहेत, अशा लोकांनी केलेली निंदा मी जाणतो. 10तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याची भीती बाळगू नकोस. तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि दहा दिवस तुम्हाला छळ सहन करावा लागेल. परंतु तू मरेपर्यंत विश्वासू राहा, आणि मी तुला विजयाचे मुकुट म्हणून जीवन देईन. 11ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको, आत्मा मंडळयास काय म्हणतो, जो कोणी विजय मिळवितो त्याला दुसर्या मरणाची बाधा होणारच नाही.
पर्गमम येथील मंडळीस
12“पर्गमम येथील मंडळीच्या देवदूतास लिही:
ज्यांच्याजवळ तीक्ष्ण आणि दुधारी तलवार आहे, ते असे म्हणतात:
13तू कोठे राहतोस हे मला ठाऊक आहे, जेथे सैतानाचे आसन आहे तेथे. तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस. माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुमच्या शहरामध्ये जेथे सैतान राहतो, तेथे ठार मारला गेला, त्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाही. 14तथापि तुला काही गोष्टींविषयी दोष देणे मला भाग आहे: त्या या की, बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे काही लोक तुमच्यामध्ये आहेत. त्यांनी बालाकाला इस्राएली लोकांना मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाणे व लैंगिक पापे करण्यासाठी प्रवृत्त केले. 15होय, या निकलाइतांच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तुमच्यातही आहेत. 16यास्तव पश्चात्ताप कर! नाही तर, मी तुझ्याकडे लवकरच येऊन माझ्या तोंडातून निघणार्या तलवारीने त्यांच्याविरुद्ध लढेन. 17ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको, आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो, जो विजय मिळवितो, त्याला गुप्त राखलेल्या मान्न्यातून मी देईन आणि मी त्या व्यक्तीला ज्यावर नवे नाव लिहिलेले असेल तो पांढरा खडाही देईन, ते तो खडा घेणार्याशिवाय कोणालाही माहीत नसेल.
थुवतीरा येथील मंडळी
18“थुवतीरा येथील मंडळीच्या देवदूताला लिही:
ज्याचे नेत्र आगीच्या ज्वालेसारखे भेदक आहेत व ज्याचे पाय चकाकत्या कांस्यासारखे आहेत, तो परमेश्वराचा पुत्र म्हणतो:
19तुमच्या सर्व सत्कार्याची मला माहिती आहे, आणि तुमची प्रेमळ वागणूक व विश्वास, तुमची सेवा व धीर ही सर्व मी जाणतो. आणि दिवसेंदिवस या सर्व गुणांमध्ये तुमची प्रगती होत आहे हेही मला दिसते. 20परंतु याबाबतीत तुला दोष देणे मला भाग आहे, कारण ईजबेल नावाची जी स्त्री स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास माझ्या सेवकांना तिच्या शिकवणीने भुलवते, तिचे तू सहन करतोस. 21मी तिला वेळ दिला, पण आपल्या जारकर्माबद्दल पश्चात्ताप करण्याचे तिने नाकारले. 22पाहा, मी तिला क्लेशमय अंथरुणावर खिळवून टाकीन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणार्या लोकांनी तिचा मार्ग सोडून पश्चात्ताप न केल्यास तीव्र क्लेश देईन. 23मी तिच्या लेकरांना ठार मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी मने व अंतःकरणे यांची पारख करणारा आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला मी ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईन. 24-25थुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही व सैतानाच्या गहन गोष्टी शिकला नाहीत, मी तुम्हाला सांगतो, की मी तुमच्यावर अधिक ओझे लादणार नाही, फक्त मी येईपर्यंत, तुमच्याजवळ जे आहे ते दृढ धरून राहा. 26जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे करीत राहतो, त्याला मी राष्ट्रांवर अधिकार देईन. 27आणि तो त्यांच्यावर लोह-राजदंडाने अधिकार गाजवून मातीच्या पात्राप्रमाणे त्यांच्या ठिकर्या करेल;#2:27 स्तोत्र 2:9— 28ज्याप्रमाणे मला माझ्या पित्याकडून अधिकार मिळाला आहे, त्याप्रमाणे मी त्याला पहाटेचा तारा देखील देईन. 29ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको, आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो.
सध्या निवडलेले:
प्रकटीकरण 2: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.