प्रकटीकरण 3
3
सार्दीस येथील मंडळीस
1“सार्दीस येथील मंडळीच्या देवदूताला लिही:
ज्यांच्याजवळ परमेश्वराचे सात आत्मे व सात तारे आहेत, त्यांची ही वचने आहेत:
तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत, तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी मत आहे, पण तू मेलेला आहेस. 2जागृत हो! जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर, कारण तुझी कृत्ये माझ्या परमेश्वराच्या दृष्टीने मला परिपूर्ण अशी आढळली नाहीत. 3जे तुम्ही प्रथम ऐकले व स्वीकारले, त्याची आठवण करा आणि त्यावर दृढविश्वास ठेऊन माझ्याकडे परत वळा. कारण तुम्ही जागृत झाला नाही, तर जसा चोर येतो तसा मी येईन, आणि मी कोणत्या घटकेस येईन हे तुम्हाला मुळीच समजणार नाही. 4मात्र ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाहीत, असे थोडे लोक सार्दीस येथे तुमच्यामध्ये आहेत. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील कारण ते त्यास पात्र आहेत. 5जो विजय मिळवितो तो त्यांच्यासारखा शुभ्र वस्त्रे परिधान करेल. मी त्या व्यक्तिचे नाव जीवनाच्या पुस्तकातून कधीच खोडणार नाही. माझ्या पित्यासमोर व त्यांच्या देवदूतांसमोर मी त्याच्या नावाचा जाहीरपणे स्वीकार करीन. 6ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको, आत्मा मंडळयांस काय म्हणतो.
फिलदेल्फिया येथील मंडळीस
7“फिलदेल्फिया येथील मंडळीच्या देवदूतास लिही:
जे पवित्र व सत्य आहे, ज्यांच्याजवळ दावीदाची किल्ली आहे, ते जे उघडतात, ते कोणालाही बंद करता येत नाही, आणि ते जे बंद करतात, ते कोणाला उघडता येत नाही, हे त्यांचे शब्द आहेत.
8तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पाहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. मला माहीत आहे की तुला कमी शक्ती आहे, तरी तू माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही. 9जे सैतानाच्या सभास्थानातील असून स्वतःला यहूदी म्हणतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यांना मी तुझ्या स्वाधीन करीन. पाहा, ते तुझ्या पाया पडतील व मी तुझ्यावर प्रीती केली आहे हे ते स्वीकारतील. 10धीर धरण्याविषयीच्या माझ्या आज्ञा तू पाळल्या आहेत, म्हणून पृथ्वीवर राहणार्या लोकांची परीक्षा होण्याचा जो प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन. 11मी लवकर येत आहे. तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे, ते दृढ धरून ठेव. 12जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या परमेश्वराच्या मंदिरातील स्तंभ करीन. ते तेथून कधीही बाहेर जाणार नाहीत. माझ्या परमेश्वराचे नाव, स्वर्गातून माझ्या परमेश्वरापासून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या परमेश्वराची नगरी, हिचे नाव आणि माझे नवे नाव मी त्याच्यावर लिहीन. 13आत्मा मंडळयांस काय म्हणतो, हे ज्यांना कान आहेत त्यांनी ऐकावे.
लावदिकीया येथील मंडळीस
14“लावदिकीया येथील मंडळीच्या देवदूतास लिही:
जे आमेन आहेत, विश्वासू व खरे साक्षी आणि परमेश्वराच्या सृष्टीचा शासक आहेत, ते असे म्हणतात.
15तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू थंड नाहीस व उष्ण नाहीस. तू थंड किंवा उष्ण असतास तर बरे झाले असते! 16पण तुम्ही कोमट आहात, म्हणजे उष्णही नाही आणि शीतही नाही; म्हणून मी तुम्हाला माझ्या मुखातून बाहेर ओकून टाकीन. 17तुम्ही म्हणता, ‘मी श्रीमंत आहे; हवे ते धन मिळविले आहे; मला कसली उणीव नाही’ पण तुम्ही कष्टी, दीन, दरिद्री, आंधळे व उघडे आहात, हे तुम्हाला समजत नाही. 18म्हणून तुम्हाला माझा असा सल्ला आहे की श्रीमंत होण्यासाठी तुम्ही माझ्याकडून अग्नीत शुद्ध केलेले सोने विकत घ्यावे. तुमची लज्जास्पद नग्नता झाकण्यात यावी म्हणून तुम्ही माझ्याकडून स्वच्छ, शुद्ध, शुभ्र वस्त्रे विकत घ्यावी. तुम्हाला दृष्टीलाभ व्हावा म्हणून तुम्ही माझ्याकडून अंजन विकत घ्यावे. 19ज्यांच्यावर मी प्रीती करतो, त्यांना मी दटावतो व शिक्षा देऊन शिस्त लावतो. म्हणून आस्थावान होऊन पश्चात्ताप करावा. 20पाहा! मी दाराशी उभा राहून, दार ठोठावीत आहे. कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी आत येईन; मी त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील. 21मी विजयी होऊन माझ्या पित्याबरोबर त्यांच्या राजासनावर बसलो, तसेच विजय मिळविणार्या प्रत्येकाला मी माझ्या राजासनावर, माझ्याबरोबर बसण्यास अधिकार देईन. 22ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको, आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो.”
सध्या निवडलेले:
प्रकटीकरण 3: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.