YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटीकरण 9

9
1मग पाचव्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा जो तारा आकाशातून पृथ्वीवर पडला होता आणि ज्या तार्‍याला अथांग कूपाची किल्ली देण्यात आली होती, त्याला मी पाहिले. 2तेव्हा त्याने अथांग कूप उघडले, आणि प्रचंड भट्टीच्या धुरासारखा धूर त्यातून वर आला. त्या अगाध कूपाच्या धुरामुळे सूर्य व आकाश अंधकारमय झाले. 3मग त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यांना पृथ्वीवर असणार्‍या विंचवाप्रमाणे सामर्थ्य देण्यात आले होते. 4गवत, वनस्पती किंवा पृथ्वीवरील झाडेझुडपे, यांना उपद्रव न देता ज्या लोकांच्या कपाळावर परमेश्वराच्या शिक्याची खूण नाही, त्यांच्यावर हल्ला करण्याचे काम टोळांना देण्यात आले होते. 5त्यांना ठार मारण्याचा अधिकार त्यांच्याकडे नव्हता, तर फक्त पाच महिने पीडा देण्याचे सोपविले होते. विंचू माणसाला नांगी मारतो, तेव्हा त्याला होणार्‍या पीडेसारखी ती होती. 6त्या दिवसात लोक मरणाची वाट पाहतील पण त्यांना मृत्यू येणार नाही; मृत्यू यावा म्हणून ते उत्कंठित होतील, मृत्यू त्याच्यापासून दूर पळेल.
7पृथ्वीवर आलेले टोळ युद्धासाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे दिसत होते. त्यांचे चेहरे मनुष्यांसारखे असून त्यांच्या डोक्यांवर सोन्याचा मुकुटांसारखे दिसणारे काहीतरी होते. 8त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते, आणि त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे होते. 9त्यांनी लोखंडी उरस्त्राणासारखी उरस्त्राणे घातली होती. त्यांच्या पंखांचा ध्वनी युद्धात त्वेषाने हल्ला करणारे अनेक घोडे व धावत्या रथांच्या ध्वनीसारखा होता. 10त्यांना विंचवाच्या नांग्यांसारख्या दंश करणार्‍या शेपट्या होत्या. पाच महिने लोकांचा छळ करण्याची शक्ती या शेपट्यांत होती. 11अथांग कूपाचा सत्ताधारी देवदूत त्यांचा राजा होता. त्याचे नाव हिब्रू भाषेत अबद्दोन, हेल्लेणी भाषेत अपल्लूओन (जो सर्वनाशक) असे आहे.
12एक अनर्थ आता संपला आहे; पण आणखी दोन अनर्थ येणार आहेत.
13नंतर सहाव्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा परमेश्वराच्या राजासनासमोरील सोन्याच्या वेदीच्या चारही शिंगातून निघालेली एक वाणी मी ऐकली. 14ज्या सहाव्या देवदूताजवळ रणशिंग होते त्याला ती म्हणाली, “युफ्रेटीस नदीवर बांधून ठेवलेल्या चारही देवदूतांना मोकळे कर.” 15आणि एकतृतीयांश मनुष्यजात ठार मारण्याकरिता नेमलेली घटका, दिवस, महिना व वर्ष यासाठी तयार केलेले हे चार देवदूत मोकळे करण्यात आले. 16घोडदळाची संख्या वीस कोटी होती. मी त्यांची संख्या ऐकली.
17त्या दृष्टांतात घोडे व स्वार मला दिसले ते असे: त्यांना अग्निसारखी लाल, गडद निळ्या रंगाची व गंधकासारखी पिवळ्या रंगांची उरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडामधून अग्नी, धूर व गंधक हे सारे निघत होते, 18आणि त्या पीडामुळे एकतृतीयांश मानवजात मारली गेली. 19त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटांत आहे. त्यांच्या शेपट्या सापांसारख्या असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांच्या साहाय्याने ते जखमा करतात.
20त्या पीडांमुळे जे ठार मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही. म्हणजे, भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तींची पूजा करणे त्यांनी सोडले नाही. 21तसेच, त्यांनी केलेले खून, चेटके, जारकर्म, त्यांच्या चोर्‍या या पापांबद्दल पश्चात्ताप केला नाही.

सध्या निवडलेले:

प्रकटीकरण 9: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन