तीता 2
2
शुभवार्तेसाठी चांगले कार्य
1शुद्ध शिक्षणास जे धरून आहे तेच तू शिकव. 2वयस्क पुरुषांनी नेमस्त, आदरास पात्र, आत्मसंयमी व विश्वास, प्रीती आणि सहनशीलता यामध्ये खंबीर असावे, असे शिक्षण तू त्यांना दे.
3त्याचप्रमाणे वयस्क स्त्रिया आदरयुक्त असाव्या; त्या इतरांच्या चहाड्या करीत फिरणार्या किंवा मद्यपानासक्त नसाव्या; त्या सुशिक्षण देणार्या असाव्या; 4म्हणजे त्या तरुण स्त्रियांस त्यांच्या पतींवर आणि मुलांवर प्रीती करण्यास, 5आत्मसंयमी, शुद्धाचरणी, घरकामात मग्न, मायाळू व आपल्या पतींच्या अधीन राहण्यास शिकविता येईल, म्हणजे परमेश्वराच्या वचनाची निंदा होणार नाही.
6तसेच, तरुणांनी आत्मसंयमी व्हावे, म्हणून त्यांना प्रोत्साहित कर. 7जे चांगले ते करून, तू त्यांना प्रत्येक गोष्टींत कित्ता घालून दे. तुझ्या शिकविण्यात प्रामाणिकपणा, गांभीर्य दाखव. 8दोष लावता येणार नाही अशा सद्भाषणाने युक्त तुझी शिकवण असावी; यासाठी की जे तुला विरोध करतील, त्यांना आपल्याविषयी वाईट बोलण्यास जागाच नसल्यामुळे लाज वाटावी.
9दासांना असा बोध कर की त्यांनी त्यांच्या धन्याच्या अधीन असावे, त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा, त्यांना उलट उत्तर देऊ नये; 10आणि त्यांनी चोरी करू नये, तर त्यांच्यावर भरवसा ठेवण्यास ते लायक आहेत असे दाखवावे. यासाठी की या सर्व गोष्टींत त्यांनी आपल्या तारणार्या परमेश्वराबद्दलच्या शिक्षणास शोभा आणावी.
11कारण आता सर्वांना तारण देणारी परमेश्वराची कृपा प्रकट झाली आहे. 12ती कृपा आपल्याला असे शिकविते की, आम्ही अभक्ती व ऐहिक वासनांना “नाही” म्हणून, आताच्या युगात आत्मसंयमाने, नीतीने व सुभक्तीने जगावे; 13आणि धन्य आशेची, म्हणजे येशू ख्रिस्त आपले महान परमेश्वर आणि तारणाऱ्यांचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहावी. 14त्यांनीच स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला प्रत्येक अधर्मापासून मुक्त केले, त्यांनी स्वतःसाठी शुद्ध करून त्यांच्या चांगल्या कार्यासाठी आपल्याला उत्साही प्रजा बनविले.
15अधिकाराने या सर्व विषयांचे शिक्षण देऊन लोकांना बोध आणि प्रोत्साहित कर. यात कोणीही तुला तुच्छ मानू नये.
सध्या निवडलेले:
तीता 2: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.