लूक 1
1
परिचय
1आम्हामध्ये ज्या घटना घडल्या त्यांचा वृतांत संग्रहित करण्याचे काम अनेकांनी हाती घेतले. 2या घटनांचे वृतांत प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या प्रथम साक्षीदारांनी व परमेश्वराच्या वचनाची सेवा करणार्यांनी आमच्याकडे सोपविलेले आहेत. 3सन्माननीय थियफिल, तुमच्यासाठी एक अचूक व अधिकृत वृतांत लिहून काढावा, हे मनात ठेऊन, मी स्वतःसुद्धा प्रत्येक गोष्टीचा अगदी सुरुवातीपासून बारकाईने व काळजीपूर्वक शोध केला आहे. 4यासाठी की, ज्या गोष्टी तुम्हाला शिकविण्यात आल्या आहेत, त्यांची तुम्हाला खात्री होईल.
बाप्तिस्मा करणारा योहान याच्या जन्माविषयी भविष्यवाणी
5यहूदीयाचा राजा हेरोद याच्या काळात तेथे जखर्या नावाचा एक याजक होता, तो अबीयाच्या याजकवर्गातील होता; त्याची पत्नी अलीशिबा हीसुद्धा अहरोनाच्या वंशाची होती. 6दोघेही परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान असून प्रभुच्या आज्ञा व नियम पाळण्यात करण्यामध्ये निर्दोष होते. 7त्यांना मूलबाळ नव्हते कारण अलीशिबा गर्भधारण करू शकत नव्हती आणि ती दोघेही खूप वयस्कर झालेली होती.
8एकदा आपल्या गटाच्या अनुक्रमाने जखर्या परमेश्वरापुढे याजक म्हणून सेवा करीत असताना, 9परमेश्वराच्या मंदिरात जाऊन धूप जाळण्यासाठी याजकांच्या रितीप्रमाणे चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली. 10आणि जेव्हा धूप जाळण्याची वेळ आली तेव्हा, जमलेले सर्व भक्तजन बाहेर प्रार्थना करीत होते.
11तेव्हा जखर्याच्या समोर प्रभुचा एक दूत प्रगट झाला, तो धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा राहिला. 12जेव्हा जखर्याने त्याला पाहिले तो चकित झाला आणि भयभीत झाला. 13पण देवदूत त्याला म्हणाला, “जखर्या भिऊ नकोस, कारण परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. तुझी पत्नी अलीशिबा तुझ्यासाठी एक पुत्र प्रसवेल आणि तू त्याला योहान असे म्हणावे. 14तो तुला आनंद व उल्हास होईल आणि त्याच्या जन्मामुळे अनेकांना हर्ष वाटेल. 15तो प्रभुच्या दृष्टीने अतिमहान होईल. तो कधीही द्राक्षारस किंवा मद्य पिणार नाही आणि मातेच्या गर्भात असतानाच तो पवित्र आत्म्याने भरून जाईल. 16तो अनेक इस्राएल लोकांना आपल्या प्रभुपरमेश्वराकडे परत घेऊन येईल. 17तो एलीयाच्या आत्म्याने व सामर्थ्याने प्रभुच्या पुढे चालेल, आईवडिलांची हृदये त्यांच्या लेकरांकडे वळविल व अवज्ञा करणार्यांना नीतिमान लोकांच्या ज्ञानाकडे वळविल व लोकांना प्रभुच्या मार्गाप्रमाणे चालण्यासाठी तयार करील.”
18जखर्या देवदूताला म्हणाला, “मी याबद्दल खात्री कशी बाळगावी? मी वृद्ध मनुष्य आहे आणि माझ्या पत्नीचे वय होऊन गेले आहे.”
19यावर देवदूत म्हणाला, “मी गब्रीएल आहे. मी प्रत्यक्ष परमेश्वराच्या समक्षतेत उभा असतो आणि तुझ्याबरोबर बोलण्यास व ही आनंदाची बातमी तुला सांगण्यासाठी मला पाठविले आहे, 20आणि आता हे पूर्ण होईल त्या दिवसापर्यंत तू मुका होशील व तुला बोलता येणार नाही, कारण नेमलेल्या समयी माझे शब्द खरे होतील या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेविला नाही.”
21इकडे, लोक जखर्याची वाट पाहत होते. तो मंदिरात इतका वेळ का थांबला याचे त्यांना आश्चर्य वाटले. 22तो बाहेर आला, तेव्हा त्याला त्यांच्याशी बोलता येईना. यावरून त्याने मंदिरात दृष्टांत पाहिला असेल हे त्यांनी ओळखले, मात्र बोलू न शकल्यामुळे तो त्यांना खुणा करीत होता.
23मग त्याच्या सेवाकार्याचा काळ संपला, तो घरी परतला. 24त्यानंतर त्याची पत्नी अलीशिबा गर्भवती झाली आणि पाच महिने एकांतवासात राहिली. 25“प्रभुने हे माझ्यासाठी केले आहे, ती म्हणाली, या दिवसांमध्ये त्यांची कृपादृष्टी मजवर करून लोकांमध्ये होणारी माझी बदनामी दूर केली आहे.”
येशूंच्या जन्माचे भविष्यकथन
26अलीशिबेला गर्भवती होऊन सहा महिने झाले असताना, परमेश्वराने गब्रीएल दूताला गालील प्रांतातील नासरेथ गावात, 27एका कुमारीकडे पाठविले, जिचे लग्न दावीद राजाच्या वंशावळीतील योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर ठरले होते. त्या कुमारीचे नाव मरीया होते. 28गब्रीएल देवदूत मरीयेपुढे प्रगट झाला आणि तिला म्हणाला, “हे कृपा पावलेल्या स्त्रिये, अभिवादन! प्रभू तुझ्याबरोबर आहे.”
29देवदूताच्या शब्दांनी मरीया फारच अस्वस्थ झाली आणि हे अभिवादन कशाप्रकारचे असावे याविषयी ती विचार करू लागली. 30देवदूत तिला म्हणाला, “मरीये; भिऊ नकोस. कारण परमेश्वराची कृपा तुझ्यावर झाली आहे. 31तू गर्भधारण करून पुत्राला जन्म देशील आणि तू त्याचे नाव येशू असे ठेवावे. 32ते परमथोर होईल आणि त्यांना परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू परमेश्वर त्यांना त्यांचा पूर्वज दावीद, याचे सिंहासन देईल. 33ते याकोबाच्या संतानांवर सदासर्वकाळ राज्य करतील व त्यांच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही.”
34मरीयेने देवदूताला विचारले, “हे कसे होईल? मी तर कुमारिका आहे!”
35यावर देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेल आणि सर्वोच्च परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. त्यामुळे जो पवित्र पुत्र तुला होणार आहे त्यांना परमेश्वराचा पुत्र असे म्हणतील. 36तुझी नातलग अलीशिबा हिलासुद्धा तिच्या वृद्धापकाळात बाळ होणार आहे आणि जी गर्भधारणा करू शकत नव्हती, तिला आता सहावा महिना आहे. 37कारण परमेश्वराने दिलेले कोणतेही वचन पूर्ण होणे अशक्य नाही.”
38मरीया म्हणाली, “मी प्रभुची दासी आहे, तुम्ही जे वचन मला दिले आहे त्याची पूर्तता होवो.” आणि मग देवदूत तिला सोडून गेला.
मरीया अलीशिबाची भेट घेते
39त्या दिवसात मरीया तयार होऊन यहूदीयाच्या डोंगराळ भागातील एका गावाकडे घाईघाईने गेली. 40तिने जखर्याच्या घरात प्रवेश करून अलीशिबेला अभिवादन केले. 41जेव्हा मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले, तेव्हा पोटातील बालकाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. 42अलीशिबा मोठ्या आवाजात म्हणाली: “तू सर्व स्त्रियांमध्ये धन्य आणि जे बाळ तुझ्या पोटी जन्म घेईल ते धन्य. 43परंतु माझ्या प्रभुच्या आईने माझ्याकडे यावे ही माझ्यावर किती मोठी कृपा आहे? 44ज्या क्षणाला तुझ्या अभिवादनाचा आवाज माझ्या कानाने ऐकला, त्याच क्षणाला बाळाने माझ्या पोटात आनंदाने उडी मारली. 45धन्य आहे ती जिने प्रभुने तिला दिलेल्या वचनाची पूर्णता तो करेल असा विश्वास ठेवला.”
मरीयेचे गीत
46मरीया म्हणाली:
“माझा आत्मा प्रभुचे गौरव करतो
47माझा आत्मा माझ्या तारणार्या परमेश्वरामध्ये आनंद करतो,
48कारण आता त्यांनी त्यांच्या
दासीच्या लीन अवस्थेकडे दृष्टी लावली आहे.
येथून पुढे सर्व पिढया मला धन्य म्हणतील.
49कारण ज्या सर्वशक्तिमान परमेश्वराने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत,
त्यांचे नाव पवित्र आहे.
50त्यांचे भय बाळगणार्यांवर, त्यांची करुणा
एका पिढीपासून दुसर्या पिढीपर्यंत टिकून राहते.
51त्यांनी आपल्या बाहूने महान कार्य केले आहेत;
जे अंतर्मनाच्या विचारांमध्ये गर्विष्ठ आहेत अशांना त्यांनी विखुरले आहे.
52त्यांनी शासकांना त्यांच्या सिंहासनावरून खाली आणले आहे.
पण नम्रजनांस उच्च केले आहे.
53भुकेल्यास त्यांनी उत्तम गोष्टींनी तृप्त केले आहे.
परंतु श्रीमंतांना रिकामे पाठविले आहे.
54त्यांचा सेवक इस्राएल यास दयाळू असल्याचे आठवून
त्याला साहाय्य पाठविले,
55जसे आपल्या पूर्वजांना त्यांनी वचन दिले होते,
ते अब्राहाम आणि त्यांच्या संततीवर सदासर्वकाळ राहील.”
56मरीया अलीशिबेजवळ सुमारे तीन महिने राहिली आणि नंतर ती तिच्या घरी परत गेली.
बाप्तिस्मा करणार्या योहानाचा जन्म
57अलीशिबेच्या प्रसूतिची वेळ आली, तेव्हा तिने पुत्राला जन्म दिला. 58प्रभुने तिच्यावर किती मोठी दया दाखविली हे ऐकून तिचे शेजारी व नातेवाईक तिच्या आनंदात सामील झाले.
59मग आठव्या दिवशी ते बाळाच्या सुंतेसाठी आले, ते त्याच्या वडिलांचे जखर्या हेच नाव त्याला देणार होते, 60पण त्याची आई अलीशिबा म्हणाली, “नाही, त्याचे नाव योहान आहे.”
61तेव्हा त्यांनी तिला म्हटले पण, “हे नाव तुमच्या नातलगात सापडत नाही.”
62नंतर त्यांनी हातांनी खुणा करून त्याच्या वडिलांना, बाळाचे नाव काय ठेवायचे आहे असे विचारले. 63वडिलांनीही एक पाटी मागवून त्यावर, “त्याचे नाव योहान आहे” असे लिहिले आणि प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला. 64तत्क्षणी जखर्याचे तोंड उघडले व वाचा मोकळी झाली आणि तो बोलू लागला व परमेश्वराची स्तुती करू लागला. 65आणि सर्व शेजारी भयभीत झाले व डोंगराळ यहूदीया प्रदेशात राहणारे येथील सर्व या गोष्टींविषयी बोलू लागले. 66ज्या प्रत्येकाने याविषयी ऐकले व नवल करून म्हटले की, “हा बालक पुढे कोण होणार?” कारण प्रभुचा हात त्याजबरोबर होता.
जखर्याचे गीत
67नंतर बालकाचा पिता जखर्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि भविष्यवाणी करू लागला:
68“प्रभुची स्तुती करा! इस्राएलाचा परमेश्वर यांची स्तुती करा,
कारण ते आपल्या लोकांकडे आले आहेत आणि त्यांच्यासाठी खंडणी भरली आहे.
69त्यांनी आपला सेवक दावीद याच्या घराण्यातून
आपल्यासाठी तारणाचे शिंग#1:69 शिंग प्रबळ राजाचे प्रतीक उभारले आहे.
70जसे त्यांनी फार पूर्वी आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते,
71आमच्या शत्रूपासून आणि
आमचा द्वेष करणार्या सर्वांच्या हातातून त्यांनी आमचा उद्धार केला आहे,
72आमच्या पूर्वजांवर दया,
आणि त्यांच्या पवित्र कराराची आठवण करावी.
73आणि त्यांनी आमचा पूर्वज अब्राहाम याला शपथ देऊन वचन दिले:
74आमच्या शत्रूंच्या हातून आमची सुटका करावी,
आणि समर्थ होऊन निर्भयतेने त्यांची सेवा करावी,
75पवित्रपणाने आणि नीतिमत्त्वाने आमचे सर्व दिवस त्यांच्यासमोर घालवावेत.
76“आणि तू, माझ्या बाळा, तुला परात्पराचा संदेष्टा असे म्हणतील;
कारण तू प्रभुच्या पुढे जाऊन त्यांचा मार्ग तयार करशील,
77त्यांच्या पापांच्या क्षमेद्वारे,
त्याच्या लोकांना तारणाचे ज्ञान देशील.
78कारण परमेश्वराच्या करुणेमुळे,
आपल्यावर स्वर्गातून दिव्य प्रभातेचा उदय होण्याची वेळ आली आहे.
79जे अंधारात जगत आहेत,
जे मरणाच्या छायेत आहेत त्यांच्यावर प्रकाश पडावा आणि,
आमच्या पायांना शांतीच्या मार्गाचे मार्गदर्शन प्राप्त व्हावे.”
80तो बालक वाढत गेला, आत्म्यात सबळ झाला व त्याची वाढ झाली आणि तो इस्राएल लोकांस जाहीरपणे प्रकट होईपर्यंत अरण्यात राहिला.
Atualmente selecionado:
लूक 1: MRCV
Destaque
Partilhar
Copiar
Quer salvar os seus destaques em todos os seus dispositivos? Faça o seu registo ou inicie sessão
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.