योहान 12
12
बेथानी येथे मरीयेने येशूला केलेला तैलाभ्यंग
1मग येशू वल्हांडणाच्या पूर्वी सहा दिवस बेथानीस आला. जो लाजर मेला होता व ज्याला त्याने मेलेल्यांतून उठवले होते तो तेथे होता.
2म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली; तेव्हा मार्था वाढत होती; आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणार्यांपैकी एक होता.
3तेव्हा मरीयेने अर्धा शेर शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले; तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले.
4मग त्याच्या शिष्यांतील एक जण यहूदा इस्कर्योत, जो त्याला धरून देणार होता, तो म्हणाला,
5“हे सुगंधी तेल तीनशे रुपयांना विकून ते गरिबांना का दिले नाही?”
6त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही; तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो तसे म्हणाला.
7ह्यावरून येशूने म्हटले, “हिच्या वाटेस जाऊ नका. माझ्या उत्तरकार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या.
8कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत; परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही.”
9तो तेथे आहे असे यहूदी लोकांपैकी पुष्कळांना कळले आणि केवळ येशूकरता नाही तर ज्या लाजराला त्याने मेलेल्यांतून उठवले होते त्यालाही पाहण्याकरता ते आले.
10मुख्य याजकांनी लाजरालाही जिवे मारण्याचा निश्चय केला,
11कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहूदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते.
येशूचा जयोत्सवाने यरुशलेमेत प्रवेश
12दुसर्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरुशलेमेस येत आहे असे ऐकून
13खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करत म्हणाले,
“होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा’
इस्राएलाचा राजा ‘धन्यवादित असो!’
14येशूला लहान गाढव मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला.
15“हे सीयोनेच्या कन्ये, भिऊ नकोस;
पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर
बसून येतो!”
ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले.
16प्रथम ह्या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नव्हत्या; परंतु येशूचा गौरव झाल्यावर त्यांना आठवण झाली की, त्याच्याविषयी ह्या गोष्टी लिहिलेल्या असून त्याप्रमाणे लोकांनी त्याला केले.
17त्याने लाजराला कबरेतून बोलावून मेलेल्यांतून उठवले, त्या वेळेस जो लोकसमुदाय त्याच्याबरोबर होता त्याने त्याबद्दल साक्ष दिली.
18त्याने हे चिन्ह केले होते असे त्यांनी ऐकले म्हणूनही लोक त्याला भेटण्यास गेले.
19मग परूशी एकमेकांना म्हणाले, “तुमचे काही चालत नाही हे लक्षात आणा; पाहा, जग त्याच्यामागे चालले आहे.”
हेल्लेण्यांची विनंती
20सणात उपासना करण्यास आलेल्या लोकांपैकी काही हेल्लेणी होते.
21त्यांनी गालीलातील बेथसैदाकर फिलिप्प ह्याच्याजवळ येऊन विनंती केली की, “महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे.”
22फिलिप्पाने येऊन अंद्रियाला सांगितले; आणि अंद्रिया व फिलिप्प ह्यांनी येऊन येशूला सांगितले.
23येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे.
24मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो.
25जो आपल्या जिवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल, आणि जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील.
26जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल; जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील.
27आता माझा जीव व्याकूळ झाला आहे; मी काय बोलू? हे बापा, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर; परंतु मी ह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे.
28हे बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर.” तेव्हा अशी आकाशवाणी झाली की, “मी ते गौरवले आहे आणि पुन्हाही गौरवीन.”
29तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, “मेघगर्जना झाली.” दुसरे म्हणाले, “त्याच्याबरोबर देवदूत बोलला.”
30येशूने उत्तर दिले, “ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली.
31आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल;
32आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.”
33आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवण्याकरता तो असे बोलला.
34म्हणून लोकांनी त्याला विचारले, “ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?”
35ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हांला अंधकाराने गाठू नये म्हणून तुमच्याजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला; कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही.
36तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुमच्याजवळ प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा.”
येशू ह्या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला.
यहूदीयात आढळलेला अविश्वास
37त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असताही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही;
38हे ह्यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे :
“प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी
विश्वास ठेवला आहे?
परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?”
39ह्यामुळे त्यांना विश्वास ठेवता आला नाही; ह्या कारणाने यशया आणखी म्हणाला :
40“त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू
नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये.
म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले
व त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे.”
41यशयाने त्याचा गौरव पाहिला म्हणून तो असे म्हणाला आणि त्याच्याविषयी बोलला.
42असे असूनही अधिकार्यांतून देखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपण सभाबहिष्कृत होऊ नये म्हणून परूश्यांमुळे ते तसे कबूल करत नव्हते;
43कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटला.
येशूच्या सार्वजनिक शिक्षणाचा सारांश
44तेव्हा येशू मोठ्याने म्हणाला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवत नाही तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर ठेवतो.
45आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्याला पाहतो.
46जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे.
47आणि जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळत नाही त्याचा न्याय मी करत नाही; कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे.
48जो माझा अव्हेर करतो व माझ्या वचनांचा स्वीकार करत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे; जे वचन मी सांगितले, तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील.
49कारण मी आपल्या मनचे बोललो नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे ह्यांविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे.
50त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे; म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”
Atualmente Selecionado:
योहान 12: MARVBSI
Destaque
Compartilhar
Copiar
Quer salvar seus destaques em todos os seus dispositivos? Cadastre-se ou faça o login
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.