Logotipo da YouVersion
Ícone de Pesquisa

लूक 23

23
1ती सर्व मंडळी उठली व त्यांनी येशूला पिलातकडे नेले. 2ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की, “हा आमच्या राष्ट्राला फितवताना, कैसरला कर देण्याची मनाई करताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे, असे म्हणताना आम्हांला आढळला.”
3पिलातने त्याला विचारले, “तू यहुदी लोकांचा राजा आहेस काय?” त्याने त्याला उत्तर दिले, “आपण म्हणता तसेच.”
4मुख्य याजकांना व लोकसमुदायाला पिलाताने म्हटले, “मला ह्या माणसात काही दोष आढळत नाही.”
5परंतु हे ऐकून ते अधिकच उग्र आविर्भावाने म्हणाले, “ह्याने गालीलपासून आरंभ करून येथपर्यंत साऱ्या यहुदियात शिक्षण देत लोकांना चिथवले आहे.”
हेरोदसमोर येशू
6हे ऐकून पिलातने हा मनुष्य गालीलकर आहे काय, असे विचारले, 7तो हेरोदच्या अंमलातला आहे, असे समजल्यावर त्याने त्याला हेरोदकडे पाठवले कारण तोही त्या दिवसांत यरुशलेममध्ये होता. 8येशूला पाहून हेरोदला फार आनंद झाला, कारण त्याच्याविषयी ऐकले असल्यामुळे त्याला भेटावे, अशी बऱ्याच दिवसांपासून त्याची इच्छा होती. येशूच्या हातून घडलेले एखादे चिन्ह पाहायला मिळेल, अशी त्याला आशा होती. 9त्याने त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले परंतु येशूने काही उत्तर दिले नाही. 10मुख्य याजक व शास्त्री उभे राहून आवेशाने त्याच्यावर आरोप करत होते. 11हेरोदने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि झगमगीत लांब झगा त्याच्या अंगावर घालून त्याला पिलातकडे परत पाठवले. 12त्याच दिवशी पिलात व हेरोद हे एकमेकांचे मित्र झाले. त्यापूर्वी त्यांचे आपसात वैर होते.
पिलात, बरब्बा व येशू
13मुख्य याजक, अधिकारी व लोक ह्यांना पिलातने एकत्र बोलावून म्हटले, 14“हा मनुष्य लोकांना फितवणारा म्हणून ह्याला तुम्ही माझ्याकडे आणले. जो आरोप तुम्ही ह्याच्यावर ठेवता, त्यासंबंधी मी तुमच्यासमक्ष ह्याची चौकशी केल्यावर मला ह्या माणसात काहीही दोष सापडत नाही. 15हेरोदलाही सापडला नाही कारण त्याने त्याला आमच्याकडे परत पाठवले आहे. ह्याने मरणदंड भोगण्यासारखे काही केलेले नाही 16म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो.” 17[त्या सणात त्यांच्याकरता तुरुंगातील एकाला सोडून देण्याची प्रथा होती.]
18सर्वांनी ओरडत मागणी केली, “ह्याला घेऊन जा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.” 19बरब्बा हा शहरात झालेले बंड आणि खून ह्यासंबंधात तुरुंगात टाकलेला होता.
20येशूला सोडावे, ह्या इच्छेने पिलातने पुन्हा त्यांच्यासमोर बोलणी केली. 21परंतु ह्याला क्रुसावर खिळा, क्रुसावर खिळा, असे ते ओरडत राहिले.
22पिलात त्यांना तिसऱ्यांदा म्हणाला, “का बरे? त्याने कोणता गुन्हा केला आहे? त्याला देहान्ताची शिक्षा द्यावी असा कोणताही गुन्हा त्याने केलेला नाही, म्हणून ह्याला शिपायांकडून फटके मारून मी सोडून देतो.”
23तरीही त्याला क्रुसावर खिळायला हवे, असा त्यांनी उच्च स्वरात ओरडून आग्रह धरला. शेवटी त्यांच्या ओरडण्याला यश आले. 24त्यांच्या मागणीप्रमाणे व्हावे, असा पिलातने निकाल दिला. 25नंतर बंड व खून ह्यासंबंधात तुरुंगात टाकलेल्या ज्याच्यासाठी त्यांनी मागणी केली होती, त्याला त्याने सोडून दिले आणि येशूला त्यांच्या हवाली केले.
येशूला क्रुसावर खिळतात
26शिपाई येशूला घेऊन जात असता शिमोन नावाचा एक कुरेनेकर माणूस गावातून शहराकडे जात होता. त्याला त्यांनी वेठीस धरून त्याच्यावर क्रूस लादला आणि त्याला तो येशूच्या मागे वाहण्यास लावले.
27येशूच्या मागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करत असलेल्या स्त्रियांचा समुदाय चालला होता. 28येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “अहो, यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. 29पाहा, असे दिवस येतील की, त्या वेळी लोक म्हणतील, ‘ज्यांनी मुले प्रसवली नाहीत व ज्यांनी मुलांना स्तनपान केले नाही त्या स्त्रिया धन्य आहेत.’ 30त्या समयी लोक पर्वतांना म्हणतील, ‘आमच्यावर पडा’, व टेकड्यांना म्हणतील, ‘आम्हांला झाका.’ 31ओल्या झाडाला असे करतात, तर वाळलेल्याचे काय होईल?”
32येशूबरोबर दुसऱ्या दोघा जणांना ते अपराधी असल्यामुळे क्रुसावर खिळण्यासाठी नेले. 33ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा त्यांनी येशूला व त्या अपराध्यांना, एकाला त्याच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे असे क्रुसावर खिळले. 34[तेव्हा येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात, हे त्यांना समजत नाही.” त्यानंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.] 35लोक पाहत उभे होते. अधिकारीही कुचेष्टा करीत म्हणाले, “त्याने दुसऱ्यांना वाचवले. जर तो देवाचा ख्रिस्त, त्याचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे.”
36शिपायांनीही जवळ येऊन, आंब त्याच्यापुढे धरून त्याचा उपहास केला, 37“तू यहुदी लोकांचा राजा असशील तर स्वतःला वाचव.”
38‘हा यहुदी लोकांचा राजा आहे’, अशी पाटीदेखील येशूच्या क्रुसावर लावली होती.
39क्रुसावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करीत म्हटले, “तू ख्रिस्त आहेस ना? तर मग स्वतःला व आम्हांला वाचव.”
40परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, “तुलाही तीच शिक्षा झाली असता, तू देवालासुद्धा भीत नाहीस काय? 41आपली शिक्षा तर यथान्याय्य आहे कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत. परंतु ह्याने काही अपराध केला नाही.” 42तो पुढे म्हणाला, “हे येशू, तू तुझ्या राजाधिकाराने येशील, तेव्हा माझी आठवण ठेव.”
43येशू त्याला म्हणाला, “मी तुला खातरीने सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.”
येशूचा मृत्यू
44दुपारी सुमारे बाराची वेळ झाली आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन तीन वाजेपर्यंत सर्व देशभर अंधार पडला. 45पवित्र स्थानातील पडदा मधोमध दुभंगला. 46मग येशूने मोठ्याने आरोळी मारत म्हटले, “हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो,” असे बोलून येशूने प्राण सोडला.
47तेव्हा जे घडले, ते पाहून सैन्याधिकाऱ्याने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा एक नीतिमान मनुष्य होता.”
48बघण्याकरता जमलेले सर्व लोक जे काही घडले ते पाहून दुःखाने ऊर बडवीत परत गेले. 49ज्या स्त्रिया येशूच्या मागे गालीलहून आल्या होत्या त्यांच्यासह येशूला व्यक्तिशः ओळखणारे सर्व जण हे पाहत दूर उभे राहिले होते.
येशूची उत्तरक्रिया
50-51तेथे यहुदियातील अरिमथाई नगरातला योसेफ नावाचा एक सज्जन व प्रतिष्ठित मनुष्य होता. तो देवराज्याची प्रतीक्षा करीत होता. जरी तो न्यायसभेचा सदस्य होता, तरी त्याने यहुदी लोकांच्या निर्णयाला व कृत्याला दुजोरा दिला नव्हता. 52त्याने पिलातकडे जाऊन येशूचा मृतदेह मागितला. 53मग तो त्याने खाली काढून तागाच्या कापडात गुंडाळला व खडकात खोदलेल्या कबरीत ठेवला. ह्या कबरीत अद्याप कोणाला ठेवले नव्हते. 54साबाथची तयारी करण्याचा तो दिवस होता आणि साबाथ सुरू होणार होता.
55गालीलहून येशूबरोबर आलेल्या स्त्रियांनी योसेफच्या बरोबर जाऊन ती कबर पाहिली व येशूचा मृतदेह कसा ठेवला हेही पाहिले. 56त्यानंतर त्यांनी घरी परत जाऊन सुगंधी द्रव्ये व सुवासिक तेले तयार केली. नियमशास्त्राच्या आज्ञेप्रमाणे साबाथ दिवशी त्यांनी विश्रांती घेतली.
प्रभू येशूचे पुनरुत्थान

Atualmente Selecionado:

लूक 23: MACLBSI

Destaque

Compartilhar

Copiar

None

Quer salvar seus destaques em todos os seus dispositivos? Cadastre-se ou faça o login