Logotipo da YouVersion
Ícone de Pesquisa

लूक 18

18
चिकाटी धरणार्‍या विधवेचा दाखला
1नंतर येशूंनी आपल्या शिष्यांना सतत प्रार्थना करावी व ती ही चिकाटीने करावी यासाठी एक दाखला सांगितला. 2येशू म्हणाले, “एका शहरात परमेश्वराचे भय न बाळगणारा आणि कोणाची पर्वा न करणारा एक न्यायाधीश होता. 3त्या शहरातील एक विधवा आपली विनंती घेऊन वारंवार त्या न्यायाधीशाकडे येऊन म्हणत असे, ‘माझ्या शत्रूपासून मला न्याय द्या.’
4“त्याने काही काळ लक्ष दिले नाही, परंतु शेवटी तो स्वतःशीच म्हणाला, ‘मी परमेश्वराला भीत नाही किंवा लोक काय म्हणतील याची काळजी करीत नाही, 5पण ही विधवा मला एकसारखी त्रास देत आहे. म्हणून तिला न्याय मिळाला पाहिजे, कारण ती सारखी येऊन मला त्रास करीत आहे!’ ”
6नंतर प्रभू म्हणाले, “अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. 7तर परमेश्वराचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्यांना विनवण्या करतात, त्या लोकांना ते न्याय देणार नाहीत काय? ते त्यांच्यासंबंधी उशीर करतील काय? 8मी तुम्हाला सांगतो, ते त्यांना लवकर न्याय मिळेल याकडे लक्ष लावतील. यासाठी, जेव्हा मानवपुत्र परत येईल त्यावेळी त्यांना या पृथ्वीवर विश्वास आढळेल का?”
परूशी व जकातदार यांचा दाखला
9आपण नीतिमान आहोत याचे समर्थन करून इतर सर्वांना तुच्छ मानत होते अशा लोकांसाठी त्यांनी हा दाखला सांगितला: 10“दोन माणसे प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेली. एक परूशी होता आणि दुसरा जकातदार. 11परूशी स्वतः उभा राहिला आणि प्रार्थना केली: ‘हे परमेश्वरा, मी तुमचे फार आभार मानतो, कारण मी इतर लोकांसारखा लुटारू, कुकर्मी, व्यभिचारी किंवा या जकातदारासारखा#18:11 जकातदार अर्थात् रोमी सरकारसाठी जकातावर काम करणारे नाही. 12मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो, तसेच माझ्या मिळकतीचा दशांश देतो.’
13“परंतु जकातदार दूर उभा राहिला. आपले डोळे वर आकाशाकडे न लावता आपल्या छातीवर मारून म्हणाला, ‘हे परमेश्वरा, मज पाप्यावर दया कर.’
14“मी तुम्हाला सांगतो, हा मनुष्य, त्या दुसर्‍यापेक्षा परमेश्वरासमोर नीतिमान ठरून घरी गेला. कारण जे सर्व स्वतःला उच्च करतात त्यांना नम्र केले जाईल आणि जे स्वतःला नम्र करतात, त्यांना उंच केले जाईल.”
येशू लहान मुलांना आशीर्वाद देतात
15लोकांनी आपल्या बालकांना येशूंनी त्यांच्यावर हात ठेवावे म्हणून त्यांच्याकडे आणले. परंतु शिष्यांनी त्यांना दटाविले. 16येशूंनी त्या बालकांना#18:16 बालकांना लहान मुलांची अंतःकरणे जशी असतात तसे अंतःकरणे झाल्याशिवाय परमेश्वराच्या राज्यात प्रवेश होणारच नाही आपल्याजवळ बोलाविले आणि म्हणाले, “लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका, कारण परमेश्वराचे राज्य अशांचेच आहे. 17मी तुम्हाला निश्चित सांगतो की, तुम्ही या लहान बालकासारखे होऊन परमेश्वराच्या राज्याचा स्वीकार करीत नाही, तोपर्यंत त्यात तुमचा प्रवेश होऊ शकणार नाही.”
एक श्रीमंत शासक
18एका शासकाने येशूंना विचारले: “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळावे म्हणून मी काय करावे?”
19येशूंनी उत्तर दिले, “तू मला उत्तम कशाला म्हणतोस? परमेश्वराशिवाय कोणी उत्तम नाही. 20तुला आज्ञा ठाऊक आहेत: ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख.’ ”#18:20 निर्ग 20:12‑16; अनु 5:16‑20
21तो म्हणाला, “मी लहान होतो, तेव्हापासूनच मी या सर्व आज्ञांचे पालन करीत आहे.”
22जेव्हा येशूंनी हे ऐकले, ते त्याला म्हणाले, “पण तू एका गोष्टीत उणा आहेस. तुझे आहे ते सर्वकाही विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.”
23जेव्हा त्याने हे बोलणे ऐकले, तेव्हा तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता. 24येशूंनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, “श्रीमंतांना परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे किती कठीण आहे! 25एखाद्या श्रीमंत मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”
26ज्यांनी हे बोलणे ऐकले, त्यांनी विचारले, “मग कोणाचे तारण होऊ शकेल?”
27येशूंनी उत्तर दिले, “जे काही मानवाला अशक्य आहे, परंतु त्या सर्वगोष्टी परमेश्वराला शक्य आहेत.”
28तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “आपणास अनुसरावे म्हणून आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे!”
29“मी तुम्हाला निश्चित सांगतो,” येशूंनी म्हटले, “असे कोणी नाही की ज्यांनी परमेश्वराच्या राज्यासाठी आपले घर, भाऊ बहीण, आई, पिता, पत्नी, मुले, यांचा त्याग केला, 30त्याला या जगात अनेक पटीने दिले जाईलच पण येणार्‍या युगात सार्वकालिक जीवनही लाभेल.”
येशू तिसर्‍यावेळी आपल्या मृत्यूचे भविष्य करतात
31येशूंनी त्यांच्या बारा शिष्यांना बाजूला बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले, “आपण यरुशलेमात जात आहोत आणि संदेष्ट्यांनी मानवपुत्रासंबंधी, म्हणजे माझ्याबद्दल, जे सर्वकाही लिहून ठेवलेले आहे ते पूर्ण होईल. 32त्याला गैरयहूदीयांच्या हाती सोपवून देण्यात येईल. ते त्याची थट्टा करतील, त्याचा अपमान करतील आणि त्याच्यावर थुंकतील, 33त्याला फटके मारतील आणि त्याचा जीव घेतील परंतु तीन दिवसानंतर तो पुन्हा उठेल.”
34त्यातील शिष्यांना काहीही समजले नाही. ते त्यांना आकलन होऊ नये म्हणून त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते. येशू काय बोलत आहेत हे त्यांना माहीत नव्हते.
येशू आंधळ्यांना दृष्टी देतात
35येशू यरीहो शहराजवळ आले, तेव्हा एक आंधळा भिकारी, रस्त्याच्या कडेला भीक मागत बसला होता. 36जवळून जात असलेल्या गर्दीचा आवाज त्याने ऐकला, तेव्हा त्याने विचारले काय चालले आहे. 37त्यांनी त्याला सांगितले, “नासरेथकर येशू रस्त्याने जात आहेत.”
38तो मोठ्याने ओरडला, “अहो येशू, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.”
39येशूंच्या पुढे चाललेल्या गर्दीतील लोकांनी त्याला धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, पण तो उलट अधिक मोठमोठ्याने ओरडतच राहिला, “अहो दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.”
40येशू थांबले आणि त्या मनुष्याला त्यांच्याकडे आणण्यास सांगितले. जेव्हा तो आंधळा जवळ आला, येशूंनी त्याला विचारले, 41“मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?”
“प्रभू मला दृष्टी यावी.” त्याने उत्तर दिले.
42यावर येशू म्हणाले, “ठीक आहे, तुला दृष्टी दिली आहे. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” 43त्याच क्षणाला त्याला दिसू लागले आणि परमेश्वराची स्तुती करीत तो येशूंच्या मागे चालू लागला. जेव्हा सर्व लोकांनी हे पाहिले, त्यांनी सुद्धा परमेश्वराची स्तुती केली.

Atualmente Selecionado:

लूक 18: MRCV

Destaque

Compartilhar

Copiar

None

Quer salvar seus destaques em todos os seus dispositivos? Cadastre-se ou faça o login