YouVersion
Pictograma căutare

लूक 20

20
येशूच्या अधिकाराविषयी प्रश्‍न
1एके दिवशी येशू मंदिरात शिकवण देत व शुभवर्तमान सांगत असता मुख्य याजक व शास्त्री हे वडीलजनांसह त्याच्यापुढे येऊन त्याला म्हणाले, 2“तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि तुम्हांला हा अधिकार देणारा कोण, हे आम्हांला सांगा.”
3त्याने त्यांना उत्तर दिले, “मीदेखील तुम्हांला एक प्रश्‍न विचारतो. त्याचे मला उत्तर द्या. 4योहानचा बाप्तिस्मा स्वर्गीय होता किंवा मानवी होता?”
5ते आपसात विचार करून म्हणाले, “स्वर्गीय असे म्हणावे तर हा म्हणेल, “तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ 6आणि मानवी असे म्हणावे तर सर्व लोक आपल्यावर धोंडमार करतील कारण योहान संदेष्टा होता, अशी त्यांची खातरी पटलेली आहे.” 7म्हणून त्यांनी उत्तर दिले, “तो कोणत्या प्रकारचा होता, हे आम्हांला ठाऊक नाही.”
8नंतर येशूने त्यांना म्हटले, “तर कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी मी करतो, हे मीसुद्धा तुम्हांला सांगणार नाही.”
द्राक्षमळ्याचा दाखला
9येशू लोकांना एक दाखला सांगू लागला: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला आणि तो कुळांकडे सोपवून देऊन स्वतः बरेच दिवस परदेशी निघून गेला. 10कुळांनी त्याला द्राक्षमळ्यातील त्याच्या हिश्शाची फळे द्यावीत म्हणून त्याने हंगामाच्या वेळी त्यांच्याकडे एका दासाला पाठवले. परंतु कुळांनी त्याला मारहाण करून रिकामे पाठवून दिले. 11पुन्हा त्याने दुसऱ्या एका दासाला पाठवले. त्यालादेखील त्यांनी मारहाण करून व त्याचा अपमान करून काही न देता पाठवून दिले. 12त्याने तिसऱ्याला पाठवले. त्यालाही त्यांनी घायाळ करून बाहेर हाकलून लावले. 13शेवटी द्राक्षमळ्याचा धनी म्हणाला, ‘आता मी काय करू? मी माझ्या प्रिय पुत्राला पाठवतो. निदान ते त्याचा मान राखतील’, 14परंतु कुळे त्याला पाहून आपसात विचार करून म्हणाली, ‘हा तर वारस आहे, ह्याला आपण ठार मारू म्हणजे वतन आपलेच होईल.’ 15त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर काढून ठार मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी त्यांचे काय करील?”, येशूने विचारले. 16“तो येऊन त्या कुळांचा नाश करील व द्राक्षमळा दुसऱ्यांकडे सोपवून देईल”, येशूनेच स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर दिले. हे ऐकून लोक म्हणाले, “असे न होवो.”
17येशूने त्यांच्याकडे रोखून पाहिले व म्हटले, “तर मग ‘जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला आहे’, असा जो धर्मशास्त्रलेख आहे, त्याचा अर्थ काय? 18जो कोणी त्या दगडावर पडेल त्याचे तुकडे तुकडे होतील परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा तो भुगा भुगा करून टाकील.”
कर देण्याबाबत प्रश्न
19शास्त्री व मुख्य याजक हे त्याच घटकेस त्याच्यावर हात टाकायच्या विचारात होते, कारण हा दाखला त्याने त्यांना उद्देशून सांगितला, हे ते समजले. पण त्यांना लोकांची भीती वाटली. 20म्हणून ते त्याच्या पाळतीवर राहिले आणि त्याला बोलण्यात पकडून रोमन राज्यपालांच्या अधिकाराखाली व सत्तेखाली आणावे म्हणून त्यांनी प्रामाणिकपणाचे ढोंग केलेले हेर त्याच्याकडे पाठवले. 21त्यांनी त्याला म्हटले, “गुरुवर्य, आपल्या बोलण्यात व शिकवणीत आपण पक्षपात करीत नसता. किंबहुना आपण देवाचा मार्ग सत्यास अनुसरून शिकवता, हे आम्हांला माहीत आहे. 22आम्ही कैसरला कर द्यावा, हे योग्य आहे की नाही?”
23तो त्यांचे कपट ओळखून त्यांना म्हणाला, “मला एक नाणे दाखवा. 24ह्याच्यावरील मुद्रा व लेख कोणाचा आहे?” ते म्हणाले, “कैसरचा.”
25त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसरचे ते कैसरला व देवाचे ते देवाला द्या.”
26त्यांना त्याला लोकांसमक्ष त्याच्या बोलण्यात धरता येईना. त्याच्या उत्तराचे आश्चर्य वाटून ते स्तब्ध राहिले.
पुनरुत्थानाविषयी प्रश्न
27पुनरुत्थान नाही, असे म्हणणाऱ्या सदुक्यांतून कित्येकांनी जवळ येऊन येशूला विचारले, 28‘गुरुवर्य, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, एखाद्याचा भाऊ त्याची पत्नी जिवंत असता निःसंतान निधन पावला तर त्याच्या भावाने त्या स्त्रीबरोबर विवाह करून त्याच्या भावाचा वंश चालवावा. 29एके ठिकाणी सात भाऊ राहत होते, त्यांच्यातील पहिल्या भावाने लग्न केले व तो निःसंतान मरण पावला. 30मग दुसऱ्याने तिच्याबरोबर विवाह केला व तिसऱ्यानेदेखील. 31ह्याप्रमाणे ते सातही निःसंतान असे निधन पावले. 32शेवटी ती स्त्रीदेखील देवाघरी गेली. 33तर पुनरुत्थानसमयी ती त्यांच्यापैकी कोणाची पत्नी होईल; ती तर त्या सातांचीही पत्नी झाली होती.”
34येशूने त्यांना म्हटले, “ह्या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न लावून देतात. 35परंतु त्या युगासाठी व मेलेल्यांतून पुनरुत्थान प्राप्त करून घेण्यासाठी जे योग्य ठरतील, ते लग्न करणार नाहीत व लग्न लावून देणार नाहीत. 36खरे म्हणजे ते पुढे मरू शकत नाहीत कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत. 37मोशेनेदेखील झुडुपांच्या गोष्टीत प्रभूला अब्राहामचा परमेश्वर, इसहाकचा परमेश्वर याकोबचा परमेश्वर असे म्हणून मेलेले उठवले जातात, हे दर्शविले आहे. 38तो मृतांचा नव्हे, तर जिवंतांचा परमेश्वर आहे कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.”
39हे ऐकून शास्त्र्यांतील कित्येकांनी म्हटले, “गुरुजी, आपण ठीक बोललात.” 40त्यानंतर ते त्याला आणखी काहीही विचारायला धजले नाहीत.
ख्रिस्त दावीदचा पुत्र आहे काय?
41त्यानंतर येशूने त्यांना विचारले, “लोक ख्रिस्त दावीदचा पुत्र आहे, असे कसे म्हणतात? 42कारण दावीद स्वतः स्तोत्रांच्या पुस्तकात म्हणतो:
प्रभूने माझ्या प्रभूला सांगितले,
43‘मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायांसाठी आसन
करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.’
44दावीद अशा प्रकारे त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा?”
शास्त्री लोकांविषयी दिलेला इशारा
45सर्व लोक ऐकत असता त्याने त्याच्या शिष्यांना म्हटले, 46“शास्त्री लोकांविषयी सावध असा, त्यांना लांब लांब झगे घालून मिरवायची हौस असते. बाजारात नमस्कार, सभास्थानांत मुख्य आसने व मेजवानीत सन्मानाच्या जागा त्यांना आवडतात. 47ते विधवांची घरे गिळंकृत करतात. लोकांना दाखवण्याच्या उद्देशाने लांबलचक प्रार्थना करतात. त्यांना अधिक शिक्षा होईल.”

Selectat acum:

लूक 20: MACLBSI

Evidențiere

Partajează

Copiază

None

Dorești să ai evidențierile salvate pe toate dispozitivele? Înscrie-te sau conectează-te