लूक 5
5
प्रथम शिष्यांस पाचारण
1एके दिवशी येशू गनेसरेत#5:1 गनेसरेत गालील समुद्र सरोवराच्या किनार्यावर उभे होते, परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी लोकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. 2त्यांनी पाण्याच्या कडेला कोळ्यांनी ठेवलेल्या दोन होड्या पाहिल्या, कारण कोळी आपली जाळी धूत होते. 3त्यापैकी एका होडीत ते बसले जी शिमोनाची होती आणि ती काठापासून थोडीशी बाजूला करावी असे त्यांनी शिमोनाला सांगितले. मग त्या होडीत बसून त्यांनी लोकांना शिक्षण दिले.
4येशूंनी आपले बोलणे संपविल्यानंतर, ते शिमोनास म्हणाले, “होडी खोल पाण्यात ने आणि मासे पकडण्यासाठी जाळी टाक.”
5शिमोनाने उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही रात्रभर परिश्रम केले, पण काहीच हाती लागले नाही. पण तुम्ही सांगता, म्हणून जाळे टाकतो.”
6तसे केल्यानंतर त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने मासे पकडले की त्यांच्या जाळ्या फाटू लागल्या. 7जे सहकारी दुसर्या होडीत होते, त्यांनी येऊन आपल्याला मदत करावी म्हणून त्यांनी त्यांना इशारा केला आणि लवकरच त्या दोन होड्या माशांनी इतक्या गच्च भरल्या की बुडू लागल्या.
8शिमोन पेत्राने हे पाहिले, तेव्हा त्याने येशूंच्या पुढे गुडघे टेकले आणि म्हणाला, “प्रभू कृपा करून, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे!” 9कारण त्यांनी धरलेले पुष्कळ मासे पाहून, तो आणि त्याच्या बरोबरचे इतर जोडीदार आश्चर्यचकित झाले होते; 10आणि त्याचबरोबर शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब आणि योहान यांनाही आश्चर्य वाटले होते.
येशू शिमोनाला म्हणाले, “भिऊ नको, येथून पुढे मी तुला माणसे धरणारा करेन.”#5:10 माणसे धरणारा अर्थात् सुवार्ता सांगून येशूंचे शिष्य करणारे 11त्यांनी होडी काठाला लावल्यावर सर्वकाही तिथेच सोडले आणि ते त्यांच्यामागे गेले.
येशू कुष्ठरोग्याला बरे करतात
12येशू एका गावात असता एक कुष्ठरोगाने भरलेला मनुष्य तिथे आला. त्याने येशूंना पाहिले, तेव्हा त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “प्रभू, जर तुमची इच्छा असेल, तर मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात.”
13येशूंनी आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, “माझी इच्छा आहे. शुद्ध हो!” आणि तत्काळ त्याचा कुष्ठरोग निघून गेला.
14नंतर येशूंनी त्याला निक्षून सांगितले, “हे कोणाला सांगू नकोस, पण जा, मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे कुष्ठरोग बरे झाल्यानंतर जे अर्पण करावयाचे असते ते कर, म्हणजे तू शुद्ध झाला आहेस, याचे प्रमाण प्रत्येकाला पटेल.”
15तरीपण येशूंविषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले, त्यामुळे त्यांचे ऐकण्यासाठी व रोगमुक्त होण्यासाठी लोकसमुदाय येऊ लागले. 16परंतु बरेचदा येशू प्रार्थना करण्यासाठी एकांतात जात असत.
येशू एका पक्षघाती मनुष्याला बरे करतात
17एके दिवशी येशू शिक्षण देत असताना, परूशी#5:17 परूशी यहूदी धर्माचे कट्टरपंथी आणि नियमशास्त्राचे शिक्षक तिथे बसले होते. ते गालील आणि यहूदीया प्रांतातील प्रत्येक खेड्यातून, तसेच यरुशलेमातूनही आले होते. आजारी लोकांना निरोगी करण्याचे प्रभूचे सामर्थ्य येशूंच्या ठायी होते. 18काही लोकांनी एका पक्षघाती मनुष्याला खाटेवर घेऊन त्याला घरात येशूंच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. 19जेव्हा गर्दी असल्यामुळे ते मार्ग काढू शकले नाहीत, म्हणून ते छतावर चढले आणि घराच्या कौलातून त्यांनी त्याला अंथरुणासहित येशूंच्या पुढे गर्दीमध्ये खाली सोडले.
20जेव्हा येशूंनी त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा ते म्हणाले, “मित्रा, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
21यावेळी परूशी व नियमशास्त्र शिक्षक आपसात विचार करू लागले, “दुर्भाषण करणारा हा कोण आहे? परमेश्वराशिवाय पापांची क्षमा कोण करू शकतो?”
22ते काय विचार करीत होते हे येशूंनी ओळखले आणि त्यांना विचारले, “तुम्ही तुमच्या मनामध्ये या गोष्टींचा विचार का करता? 23यातून कोणते म्हणणे सोपे आहे ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपली बाज उचलून चालू लाग?’ 24तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला#5:24 साधारणतः येशू स्वतःला या नावाने संबोधित असत पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरूण उचल आणि घरी जा.” 25त्याचवेळी तो त्यांच्यासमोर उभा राहिला आणि ज्या बिछान्यावर तो झोपत असे, ते घेऊन परमेश्वराची स्तुती करीत घरी गेला. 26सर्व लोक चकित झाले आणि त्यांनी परमेश्वराची स्तुती केली. तेव्हा सर्वांना भय प्राप्त झाले व म्हणाले, “आज आम्ही अद्भुत गोष्टी पाहिल्या आहेत.”
लेवीला पाचारण
27नंतर येशू तिथून बाहेर गेले व जकातीच्या नाक्यावर एक जकातदार ज्याचे नाव लेवी होते तो त्यांच्या दृष्टीस पडला. येशू त्याला म्हणाले, “माझ्यामागे ये.” 28तेव्हा लेवी उठला व सर्वकाही टाकून त्यांना अनुसरला.
29नंतर लेवीने आपल्या घरी येशूंसाठी एक भव्य मेजवानी आयोजित केली. त्या ठिकाणी लेवीचे अनेक सहकारी जकातदार आणि इतर पाहुणे येशूंबरोबर भोजन करत होते. 30तरी त्या पंथाचे परूशी आणि नियमशास्त्र शिक्षक यांनी शिष्यांजवळ तक्रार केली, “तुम्ही जकातदार व पापी लोकांबरोबर खाणे व पिणे का करता?”
31येशूंनी त्यांना उत्तर दिले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते. 32मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनास पश्चात्तापासाठी बोलविण्यास आलो आहे.”
येशूंना उपासासंबंधी प्रश्न विचारतात
33ते येशूंना म्हणाले, “योहानाचे शिष्य वारंवार उपास व प्रार्थना करतात आणि परूश्यांचे शिष्य उपास करतात, परंतु तुमचे शिष्य मात्र खातात व पितात.”
34यावर येशूंनी त्यांना विचारले, “वराचे मित्र त्यांच्याबरोबर वर असताना उपवास कसे करतील? 35तरी अशी वेळ येत आहे, की त्यावेळी वर त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग ते उपास करतील.”
36नंतर येशूंनी त्यांना एक दाखला सांगितला: ते म्हणाले, “नवीन कापडाचा तुकडा घेऊन जुन्या कापडाला ठिगळ म्हणून कोणीही लावत नाही. कारण ते ठिगळ वस्त्राला फाडील आणि छिद्र अधिक मोठे होईल. 37कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जातील; द्राक्षारस वाहून जाईल आणि बुधल्यांचा नाश होईल. 38तसे होऊ नये, म्हणून नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात. 39जुना द्राक्षारस प्याल्यानंतर कोणालाही नवा द्राक्षारस घ्यावासा वाटत नाही. ते म्हणतात, ‘जुना द्राक्षारसच उत्तम आहे.’ ”
Selectat acum:
लूक 5: MRCV
Evidențiere
Partajează
Copiază
Dorești să ai evidențierile salvate pe toate dispozitivele? Înscrie-te sau conectează-te
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.