मत्तय 5

5
डोंगरावरचे प्रवचन
1लोकांची गर्दी पाहून, येशू टेकडीवर गेले आणि तेथे बसले. त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले. 2मग ते त्यांना शिकवू लागले.
आशीर्वादाची वचने
ते म्हणाले:
3“धन्य ते, जे आत्म्याने नम्र आहेत,
कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
4धन्य ते, जे शोकग्रस्त आहेत,
कारण त्यांना सांत्वन मिळेल.
5धन्य ते, जे सौम्य आहेत,
कारण ते पृथ्वीचे वतनाधिकारी होतील.
6ज्यांना नीतिमत्वाची तहान व भूक लागली आहे ते धन्य
कारण ते तृप्त केले जातील.
7धन्य ते, जे दयाळू आहेत,
कारण त्यांना दयाळूपणाने वागविले जाईल.
8धन्य ते, जे शुद्ध हृदयाचे आहेत,
कारण त्यांना परमेश्वराचे दर्शन घडेल.
9धन्य ते, जे शांती प्रस्थापित करतात,
कारण ते परमेश्वराचे लोक म्हणून ओळखण्यात येतील.
10धन्य ते, ज्यांचा नीतिमत्वासाठी छळ करण्यात येतो,
कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
11“माझे अनुयायी असल्या कारणाने लोक तुमची निंदा, तुमचा अपमान व छळ करतील व तुमच्याविरुद्ध सर्वप्रकारच्या गोष्टी लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. 12त्यामुळे तुम्ही आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे, त्यांनी प्राचीन काळाच्या संदेष्ट्यांनाही असेच छळले होते.
मीठ आणि दिवे
13“तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याचा खारटपणा कशाने आणाल? ते बाहेर टाकून दिले पाहिजे व असे मीठ पायदळी तुडविण्याच्या लायकीचे आहे.
14“तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले शहर लपू शकत नाही. 15त्याचप्रमाणे लोक दिवा लावून तो मापाखाली ठेवण्याऐवजी दिवठणीवर ठेवतात म्हणजे घरातील प्रत्येकाला प्रकाश मिळावा. 16याचप्रकारे लोकांनी तुमची चांगली कामे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे म्हणून तुमचा प्रकाश उजळू द्या.
नियमशास्त्राची परिपूर्ती
17“मी मोशेचे नियमशास्त्र व संदेष्ट्यांची भविष्ये रद्द करण्यासाठी नाही, तर ती पूर्ण करण्यासाठी आलो आहे. 18मी तुम्हाला सत्य सांगतो की आकाश व पृथ्वी नाहीतशी होतील तोपर्यंत आणि सर्वगोष्टी पूर्ण होईपर्यंत नियमशास्त्रातील एकही शब्द अथवा कानामात्रा कशानेही नाहीसा होणार नाही. 19जो कोणी नियमशास्त्रातील लहान आज्ञा मोडील आणि दुसर्‍यांनाही त्यानुसार शिकविल, तो स्वर्गाच्या राज्यात कनिष्ठ गणला जाईल. परंतु जे परमेश्वराचे नियम शिकवितात आणि पाळतात ते परमेश्वराच्या राज्यात श्रेष्ठ ठरतील. 20कारण मी तुम्हाला सांगतो की, परूशी आणि इतर नियमशास्त्र शिक्षक यांच्या नीतिमत्वापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक असल्याशिवाय, तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात कधीही प्रवेश मिळणार नाही.
खून
21“ ‘तू खून करू नको,#5:21 निर्ग 20:13 आणि जो कोणी खून करील तो न्यायास पात्र ठरेल,’ असे प्राचीन काळाच्या लोकांना सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे. 22पण मी सांगतो की, तुम्ही बहीण किंवा भावावर रागवाल, तर तुम्ही न्यायदंडास पात्र व्हाल, जो कोणी त्यांना मूर्ख#5:22 मूर्ख अरेमिक मध्ये राग ‘राका,’ असे म्हणेल, तर त्याला न्यायालयासमोर उत्तर द्यावे लागेल. पण जो कोणी ‘तू मूर्ख’ असे म्हणेल तर त्याला नरकाच्या अग्नीत टाकले जाण्याची भीती आहे.
23“यास्तव, जर तुम्ही वेदीवर भेट अर्पण करीत आहात आणि तेथे तुम्हाला आठवले की, तुझ्या बंधू किंवा भगिनीच्या मनात तुमच्याविरुद्ध काही आहे, 24तर तुमची भेट तेथेच वेदीपुढे ठेवा. पहिले जाऊन त्यांच्याबरोबर समेट करा आणि मग येऊन आपली भेट अर्पण करा.
25“तुमच्या शत्रूने तुम्हाला न्यायालयात नेण्यापूर्वीच, तुम्ही त्याच्याबरोबर वाटेत असतानाच लवकर त्याच्याशी संबंध नीट करा. नाही तर तुमचा शत्रू तुम्हाला न्यायाधीशाच्या स्वाधीन करेल आणि न्यायाधीश तुम्हाला शिपायांच्या स्वाधीन करील आणि तुम्हाला तुरुंगात टाकेल. 26मी तुम्हाला निश्चित सांगतो की प्रत्येक दमडी चुकती केल्याशिवाय तुमची तुरुंगातून सुटका होणार नाही.
व्यभिचार
27“ ‘तू व्यभिचार करू नको,’#5:27 निर्ग 20:14 असे सांगितलेले होते ते तुम्ही ऐकले आहे. 28पण मी तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेच्या दृष्टीने पाहतो, त्याने तिच्याबरोबर आपल्या अंतःकरणात आधीच व्यभिचार केला आहे. 29जर तुमचा उजवा डोळा, तुम्हाला पापाला प्रवृत करीत असेल तर तो उपटून फेकून द्या. तुम्ही संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एक भाग नष्ट होणे अधिक उत्तम आहे; 30आणि जर तुमचा उजवा हात तुम्हाला पापाला प्रवृत्त करीत असेल, तर तो कापून टाक. संपूर्ण शरीर नरकात जाण्याऐवजी तुम्ही तुमच्या शरीराच्या एका भागाला मुकणे अधिक हिताचे आहे.”
घटस्फोटाविषयी
31नियमशास्त्र सांगते की, “जो कोणी आपल्या पत्नीपासून विभक्त होऊ इच्छितो, त्याने तिला सूटपत्र लिहून द्यावे.”#5:31 अनु 24:1 32मी तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय सूटपत्र देतो तो तिला व्यभिचाराचे भक्ष करतो आणि सोडलेल्या स्त्रीशी जो कोणी लग्न करतो तो व्यभिचार करतो.
शपथा
33“प्राचीन काळाच्या लोकांना सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे, ‘शपथ मोडू नका, तर प्रभुला वाहिलेली प्रत्येक शपथ खरी करा.’ 34परंतु मी तुम्हाला सांगतो, शपथ मुळीच वाहू नका. स्वर्गाची नव्हे कारण ते परमेश्वराचे सिंहासन आहे. 35किंवा पृथ्वीची कारण ते त्यांचे पायासन आहे; किंवा यरुशलेमची, कारण ती थोर राजाची नगरी आहे, 36आणि स्वतःच्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण तुम्हाला एक केसही पांढरा किंवा काळा करता येत नाही. 37जे काही तुम्हाला म्हणावयाचे ते साधे ‘होय’ किंवा ‘नाही’; असावे यापेक्षा अधिक त्या दुष्टापासून#5:37 दुष्टापासून म्हणजे सैतानापासून येते.
डोळ्याबद्दल डोळा
38“जे म्हटले होते ते तुम्ही ऐकले आहे, ‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात.’#5:38 निर्ग 21:24; लेवी 24:20; अनु 19:21 39पण मी तुम्हाला सांगतो, दुष्ट मनुष्याला प्रतिकार करू नका. तुमच्या एका गालावर कोणी चापट मारली तर दुसराही गाल पुढे करा. 40जो कोणी तुमच्यावर फिर्याद किंवा वाद करून तुमची बंडी घेऊ पाहतो, त्याला तुमच्या अंगरखाही देऊन टाका. 41जर कोणी तुम्हाला एक मैल जाण्याची सक्ती करेल, तर त्याच्याबरोबर दोन मैल जा. 42जे तुम्हाजवळ मागतात त्यांना द्या आणि ज्यांना उसने हवे असेल त्यांच्यापासून परत मागणी करू नका.
शत्रूंवर प्रीती करा
43“ ‘तुमच्या शेजार्‍यावर प्रीती#5:43 लेवी 19:18 करा आणि शत्रूंचा द्वेष करा,’ असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे. 44पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शत्रूवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. 45अशा वागण्याने तुम्ही स्वर्गीय पित्याचे पुत्र व्हाल. कारण ते आपला सूर्यप्रकाश चांगले आणि वाईट करण्यार्‍या अशा दोघांनाही देतात आणि नीतिमान व अनीतिमान या दोघांवरही पाऊस पाडतात. 46जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावरच तुम्ही प्रीती केली, तर त्यात तुम्हाला असे कोणते मोठे श्रेय मिळणार आहे? जकातदारही तसेच करतात की नाही? 47आणि तुम्ही आपल्या बंधुनाच अभिवादन करीत असाल तर इतरांहून चांगले ते काय करता? गैरयहूदी तसेच करतात की नाही? 48म्हणून जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे, तसे तुम्हीही परिपूर्ण असावे.”

Выделить

Поделиться

Копировать

None

Хотите, чтобы то, что вы выделили, сохранялось на всех ваших устройствах? Зарегистрируйтесь или авторизуйтесь