मत्तय 8
8
कुष्ठरोग्यास बरे करणे
1येशू डोंगरावरून खाली आले, तेव्हा मोठा लोकसमुदाय त्यांच्यामागे चालू लागला. 2तो, पाहा! एक कुष्ठरोगी#8:2 ग्रीक परंपरेप्रमाणे कुष्ठरोग याचे भाषांतर केले तर कुष्ठरोग हा वेगवेगळ्या चामड्यांचा आजार असून तो चामडीवर परिणाम करतो. येशूंकडे आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “प्रभू, जर तुमची इच्छा आहे, तर मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात.”
3येशूंनी आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, “माझी इच्छा आहे. शुद्ध हो!” आणि तत्काळ त्याच्या कुष्ठरोगापासून तो शुद्ध झाला. 4मग येशू त्याला म्हणाले, “हे कोणाला सांगू नकोस. परंतु जा, स्वतःस याजकाला दाखव व मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे, कुष्ठरोग बरे झाल्यानंतर शुद्धीकरणाचे प्रमाण म्हणून जे अर्पण करावयाचे असते, ते कर.”
शताधिपतीचा विश्वास
5येशूंनी कफर्णहूममध्ये प्रवेश केला. तेव्हा एका रोमी शताधिपतीने#8:5 शताधिपतीने अर्थात् शंभर सैनिकांचे नेतृत्व करणारा त्यांच्याकडे येऊन त्यांना विनंती केली, 6“प्रभू, माझा नोकर घरी पक्षघाताने आजारी असून वेदनांनी तळमळत आहे.”
7येशूने त्याला म्हटले, “मी त्याला येऊन बरे करू का?”
8तेव्हा तो शताधिपती म्हणाला, “महाराज, तुम्ही माझ्या छप्पराखाली यावे यास मी योग्य नाही, शब्द मात्र बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल. 9कारण मी स्वतः अधिकाराच्या अधीन असलेला मनुष्य असून, माझ्या अधिकाराखाली सैनिक आहेत. मी एकाला ‘जा,’ म्हटले की तो जातो आणि दुसर्याला ‘ये,’ म्हटले की तो येतो आणि माझ्या नोकराला ‘हे कर,’ अथवा ‘ते कर,’ असे म्हटले तर तो ते करतो.”
10येशूंनी हे ऐकले, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि समुदायाला म्हणाले, “मी तुम्हाला सत्य सांगतो की, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलातील कोणामध्येही आढळला नाही. 11मी तुम्हाला सांगतो की, अनेकजण पूर्व आणि पश्चिमेकडून येतील, आणि स्वर्गीय राज्यात चाललेल्या मेजवानीत, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याबरोबर आपल्या जागा घेतील. 12परंतु राज्याची प्रजा बाहेर अंधकारात टाकली जाईल, जेथे रडणे आणि दातखाणे असेल.”
13नंतर येशू त्या शताधिपतीला म्हणाले, “जा! जसा तू विश्वास धरलास तसे होवो.” आणि त्याच घटकेस त्याचा नोकर बरा झाला.
येशू अनेकांना बरे करतात
14येशू पेत्राच्या घरी आले, तेव्हा त्यांनी पेत्राची सासू तापाने फणफणली असून अंथरुणावर पडून होती असे पाहिले, 15तेव्हा येशूंनी हात धरून तिला उठविले आणि त्यांनी स्पर्श करताच तिचा ताप गेला; ती उठली आणि त्यांची सेवा केली.
16संध्याकाळ झाल्यावर अनेक भूतग्रस्त त्यांच्याकडे आणले गेले, आणि केवळ एका शब्दाने त्या दुष्ट आत्म्यांना येशूंनी हाकलून दिले आणि सर्व रोग्यांना बरे केले. 17यशया संदेष्ट्याद्वारे जे म्हटले गेले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले:
“त्याने आमचे विकार स्वतःवर घेतले
आणि आमचे रोग वाहिले.”#8:17 यश 53:4
येशूंचे अनुयायी होण्याची किंमत
18येशूंनी आपल्या भोवताली जमलेली गर्दी पाहिली तेव्हा शिष्यांना आज्ञा करून ते म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ.” 19तेवढ्यात एक नियमशास्त्र शिक्षक येशूंकडे येऊन म्हणाला, “आपण जेथे कोठे जाल, तेथे मी तुमच्यामागे येईन.”
20येशूंनी उत्तर दिले, “हे लक्षात ठेवा की कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, परंतु मानवपुत्राला, डोके टेकण्यासही जागा नाही.”
21त्यांच्या शिष्यांपैकी दुसर्या एकाने म्हटले, “प्रभू, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरावयास जाऊ द्या.”
22येशूंनी त्याला म्हटले, “मला अनुसर आणि जे मेलेले आहेत, त्यांना आपल्या मृतांना पुरू दे.”
येशू वादळ शांत करतात
23मग त्यांचे शिष्य होडीत बसून त्यांच्याबरोबर गेले. 24तोच, एकाएकी सरोवरात भयंकर वादळ सुटले, लाटा होडीवर आदळू लागल्या व त्यांची होडी बुडू लागली. पण येशू झोपी गेले होते. 25तेव्हा शिष्यांनी त्यांना उठविले आणि ते त्यांना म्हणाले, “प्रभुजी, आम्हाला वाचवा! आपण सर्वजण बुडत आहोत!”
26येशू त्यांना म्हणाले, “अहो, अल्पविश्वासीहो, तुम्ही इतके का घाबरला?” मग ते उठले आणि त्यांनी वार्याला व लाटांना धमकाविले. आणि सर्वकाही शांत झाले.
27ते पाहून शिष्य चकित झाले आणि एकमेकांस म्हणू लागले: “हे कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहेत? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात!”
दोन भूतग्रस्तांना बरे करणे
28सरोवराच्या पलीकडे गदरेकरांच्या देशात येशू आले, तेव्हा भूताने पछाडलेले दोन मनुष्य कबरस्तानातून धावत आले व त्यांना भेटले. ती माणसे इतकी हिंसक होती की त्या परिसरातून कोणालाही जाणे शक्य नव्हते. 29येशूंना पाहून ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “हे परमेश्वराच्या पुत्रा, तुम्हाला आमच्याशी काय काम? ठरलेल्या वेळेपूर्वीच तुम्ही आम्हाला छळण्यास आले आहे का?”
30दूर अंतरावर डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. 31भुतांनी येशूंना विनंती केली, “तुम्ही आम्हाला हाकलून देणार असाल तर आम्हाला डुकरांमध्ये जाण्याची परवानगी द्या.”
32येशू म्हणाले, “जा.” तत्काळ भुते बाहेर आली आणि डुकरांमध्ये शिरली व तो सर्व कळप डोंगराच्या कडेने धावत सुटला आणि सरोवराच्या पाण्यात बुडून मेला. 33डुकरांचे कळप राखणारे जवळच्या शहरात धावत गेले आणि त्यांनी ही बातमी सर्वांना सांगितली. भूतग्रस्तांच्या बाबतीत काय घडले हे त्यांनी लोकांना सांगितले. 34तेव्हा गावातील सर्व लोक येशूंना भेटण्यास आले. त्यांना भेटल्यावर, “आमच्या भागातून निघून जा,” अशी त्यांनी त्यांना विनवणी केली.
Nu markerat:
मत्तय 8: MRCV
Märk
Dela
Kopiera
Vill du ha dina höjdpunkter sparade på alla dina enheter? Registrera dig eller logga in
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.