मत्तय 7

7
इतरांचा न्याय करणे
1“इतरांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. 2कारण ज्या पद्धतीने तुम्ही इतरांचा न्याय कराल त्याच पद्धतीने तुमचाही न्याय करण्यात येईल, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल.
3“आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न आणता तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? 4स्वतःच्या डोळ्यामध्ये मुसळ असताना, ‘तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे’ असे तुला आपल्या भावाला कसे म्हणता येईल? 5अरे ढोंगी माणसा! पहिल्याने तू आपल्या डोळ्यातील मुसळ काढ म्हणजे मग तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्ट दिसेल.
6“जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका. जर टाकले तर ते कदाचित आपल्या पायाखाली तुडवतील आणि फाडून तुमचे तुकडे करतील.
मागा, शोधा, ठोका
7“मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल. 8कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल.
9“तुम्हामध्ये असा कोण आहे जर तुमच्या मुलाने भाकर मागितली, तर त्याला दगड देईल? 10किंवा मासा मागितला, तर साप देईल? 11जर तुम्ही वाईट असूनही तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, त्यांना ते चांगल्या देणग्या किती विशेषकरून देतील? 12तर मग सर्व ज्या इतरांनी तुमच्यासाठी कराव्‍यात तसेच तुम्हीही त्यांच्यासाठी करा, नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे सार हेच आहे.
अरुंद आणि रुंद दरवाजे
13“अरुंद दाराने प्रवेश करा कारण नाशाकडे नेणारा दरवाजा रुंद व पसरट आहे. पुष्कळ लोक त्याच दरवाजातून प्रवेश करतात. 14तरी जीवनाकडे नेणारा दरवाजा लहान असून मार्गही अरुंद आहे आणि अगदी थोडक्यांना तो सापडतो.
खरे आणि खोटे संदेष्टे
15“खोट्या संदेष्ट्यांच्या विषयी अतिशय सावधगिरी बाळगा. ते मेंढरांची वस्त्रे धारण करून तुमच्याकडे येतात पण आतून क्रूर लांडगे असतात. 16त्यांच्या फळांवरून तुम्हाला त्यांना ओळखता येते. लोक कधी काटेरी झुडूपांवरून अंजीर किंवा रानगुलाबाच्या झुडूपांवरून द्राक्षे काढतात काय? 17प्रत्येक चांगले झाड चांगले फळ देते आणि वाईट झाड वाईट फळ देते. 18चांगली झाडे, वाईट फळे देणार नाहीत आणि वाईट झाड, चांगले फळे देणार नाही. 19या कारणामुळे चांगली फळे न देणारी झाडे तोडून टाकण्यात येतील व जाळून टाकली जातील. 20अशाप्रकारे त्यांच्या फळांवरून तुम्हाला त्यांना ओळखता येते.
खरे शिष्य आणि खोटे शिष्य
21“जो कोणी मला, ‘प्रभुजी, प्रभुजी’ म्हणत राहतो, तो प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करील असे नाही, तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करील. 22त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभुजी, प्रभुजी आम्ही तुमच्या नावाने भविष्यवाणी केली नाही काय, तुमच्या नावाने भुते घालविली नाहीत काय, तुमच्या नावाने मोठे चमत्कार केले नाहीत काय?’ 23तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगेन, ‘मी तुम्हाला कधीच ओळखले नाही. अहो दुष्टांनो, माझ्यापासून दूर निघून जा.’
बांधकाम करणारे, एक शहाणा एक मूर्ख
24“यास्तव माझी शिकवण ऐकणारे व त्याप्रमाणे वागणारे सर्वजण एका शहाण्या मनुष्यासारखे आहेत. त्याने आपले घर खडकावर बांधले. 25मग पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. 26जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती आपल्या आचरणात आणत नाही, तो पाया न घालता आपले घर वाळूवर बांधण्यार्‍या मूर्ख माणसासारखा आहे. 27मग पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले आणि ते घर कोसळून पडले.”
28येशूंनी या गोष्टी सांगण्याचे संपविले, तेव्हा समुदाय त्यांच्या शिकवणकीवरून थक्क झाले. 29कारण ते नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे नव्हे तर ज्याला अधिकार आहे असे त्यांना शिकवीत होते.

தற்சமயம் தேர்ந்தெடுக்கப்பட்டது:

मत्तय 7: MRCV

சிறப்புக்கூறு

பகிர்

நகல்

None

உங்கள் எல்லா சாதனங்களிலும் உங்கள் சிறப்பம்சங்கள் சேமிக்கப்பட வேண்டுமா? பதிவு செய்யவும் அல்லது உள்நுழையவும்