लूक 5

5
पहिल्या शिष्यांना पाचारण
1नंतर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या1 किनार्‍याशी उभा होता.
2तेव्हा त्याने सरोवराच्या किनार्‍याला लागलेले दोन मचवे पाहिले; त्यांवरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते.
3त्या मचव्यांपैकी एक शिमोनाचा होता; त्यावर चढून तो किनार्‍यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला.
4आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, “खोल पाण्यात हाकार; मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा.”
5शिमोनाने त्याला उत्तर दिले, “गुरूजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो.”
6मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यांत सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली.
7तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसर्‍या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला साहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले.
8हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे.”
9कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्व जण विस्मित झाले होते;
10तसेच शिमोनाचे भागीदार, जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, “भिऊ नकोस; येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.”
11मग मचवे किनार्‍याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले.
कुष्ठरोग्याला बरे करणे
12पुढे असे झाले की, तो एका गावात असता पाहा, तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता; त्याने येशूला पाहून पालथे पडून त्याला विनंती केली की, “प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.”
13तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” आणि लगेचच त्याचे कुष्ठ गेले.
14मग त्याने त्याला निक्षून सांगितले, “कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वत:स ‘याजकाला दाखव,’ आणि लोकांना प्रमाण पटावे म्हणून मोशेने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्धीकरणासाठी अर्पण कर.”
15तथापि त्याच्याविषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले आणि पुष्कळ लोकसमुदाय ऐकण्यास व आपले रोग बरे करून घेण्यास जमू लागले.
16पण तो अरण्यात अधूनमधून एकान्तात जाऊन प्रार्थना करत असे.
पक्षाघाती मनुष्य
17एके दिवशी असे झाले की, तो शिक्षण देत असताना गालीलातील प्रत्येक गावाहून आणि यहूदीया व यरुशलेम येथून आलेले परूशी व शास्त्राध्यापक तेथे बसले होते; आणि रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठायी होते.
18तेव्हा पाहा, कित्येक माणसांनी कोणाएका पक्षाघाती मनुष्याला बाजेवर आणले व त्याला आत नेऊन त्याच्यासमोर ठेवायचा त्यांनी प्रयत्न केला;
19परंतु दाटीमुळे त्याला आत नेण्यास वाव मिळेना, म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला बाजेसकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले.
20तेव्हा त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, “हे मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
21तेव्हा शास्त्री व परूशी असा वादविवाद करून म्हणाले की, “हा दुर्भाषण करणारा कोण आहे? केवळ देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो?”
22येशूने त्यांचे विचार ओळखून त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का करत आहात?
23‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘उठून चाल’ ह्यांतून कोणते म्हणणे सोपे?
24परंतु पृथ्वीवर पापांची क्षमा करण्यास मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून (तो पक्षाघाती मनुष्याला म्हणाला), मी तुला सांगतो, ऊठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा.”
25तेव्हा तो लगेचच त्यांच्यासमक्ष उठून ज्यावर तो पडून होता ते उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णीत आपल्या घरी गेला.
26तेव्हा ते सर्व अगदी थक्क झाले; ते देवाचा महिमा वर्णू लागले आणि फार भयभीत होऊन म्हणाले, “आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत.”
लेवीला पाचारण
27त्यानंतर तो बाहेर पडला, तेव्हा त्याने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.”
28तेव्हा तो सर्वकाही तेथेच सोडून देऊन उठला व त्याच्यामागे गेला.
29मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली; त्या वेळी त्यांच्याबरोबर जकातदार व दुसरे लोक ह्यांचा मोठा समुदाय जेवायला बसला होता.
30तेव्हा परूशी व त्यांच्यातील शास्त्री हे त्याच्या शिष्यांविरुद्ध कुरकुर करत त्यांना म्हणाले, “जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर तुम्ही का खातापिता?”
31येशूने त्यांना उत्तर दिले, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते.
32मी नीतिमानांना बोलवायला आलो नाही तर पापी लोकांना पश्‍चात्तापासाठी बोलवायला आलो आहे.”
उपासविषयक प्रश्‍न
33तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, “योहानाचे शिष्य वारंवार उपास व प्रार्थना करतात; तसे परूश्यांचेही शिष्य करतात; आपले शिष्य तर खातात पितात.”
34येशूने त्यांना म्हटले, “वर्‍हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हांला त्यांना उपास करायला लावता येईल काय?
35तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल; त्या दिवसांत ते उपास करतील.”
36आणखी त्याने त्यांना एक दाखलाही सांगितला : “कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही, तसे केले तर त्याने नवे फाडले व नव्याचे ठिगळ जुन्याशी जमले नाही असे होईल;
37आणि नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत कोणी घालत नाही; घातला तर नवा द्राक्षारस बुधले फाडून गळून जाईल व बुधल्यांचा नाश होईल.
38म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत घालावा, [म्हणजे दोन्हीही टिकतात.]
39जुना द्राक्षारस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो.”

Àwon tá yàn lọ́wọ́lọ́wọ́ báyìí:

लूक 5: MARVBSI

Ìsàmì-sí

Pín

Daako

None

Ṣé o fẹ́ fi àwọn ohun pàtàkì pamọ́ sórí gbogbo àwọn ẹ̀rọ rẹ? Wọlé pẹ̀lú àkántì tuntun tàbí wọlé pẹ̀lú àkántì tí tẹ́lẹ̀