योहान 2

2
येशू पाण्याचा द्राक्षारस करतात
1तिसर्‍या दिवशी गालीलातील काना येथे एक लग्न होते. येशूंची आई तेथे होती, 2येशू व त्यांचे शिष्य यांना देखील त्या लग्नाचे आमंत्रण होते. 3ज्यावेळी द्राक्षारस संपला, तेव्हा येशूंची आई त्यांना म्हणाली, “त्यांच्याजवळचा द्राक्षारस संपला आहे.”
4येशू म्हणाले, “बाई,#2:4 बाई मूळ भाषेत स्त्रीसाठी वापरलेला शब्द अनादर करावा म्हणून वापरला नाही. तू मला यामध्ये भाग घ्यावयास का लावते? माझी घटका अजून तरी आलेली नाही.”
5त्यांच्या आईने नोकरांस सांगितले, “हा जे काही तुम्हाला सांगेल ते करा.”
6त्याठिकाणी जवळच#2:6 75 ते 115 लिटर जवळपास एवढ्याची क्षमता पाण्याचे सहा दगडी रांजण होते, ते यहूदीयांच्या शुद्धीकरणासाठी वापरले जात असत आणि त्या प्रत्येकात सुमारे शंभर लिटर पाणी मावत असे.
7येशू त्या नोकरांना म्हणाले, “रांजण पाण्याने भरा” त्याप्रमाणे त्यांनी ते पुरेपुर भरले.
8नंतर येशू त्यांना म्हणाले, “आता यातले काही काढून भोजन प्रमुखाकडे न्या.”
त्यांनी तसे केले, 9त्या भोजन प्रमुखाने द्राक्षारसात परिवर्तित झालेल्या पाण्याची चव पाहिली. तो द्राक्षारस कोठून आणला हे त्याला माहीत नव्हते, पण ज्या नोकरांनी पाणी काढले होते त्यांना माहीत होते. म्हणून त्याने वराला बाजूला बोलावून म्हटले, 10“प्रत्येकजण उत्तम द्राक्षारस प्रथम वाढतो आणि पाहुणे पिऊन तृप्त झाले की, मग हलक्या प्रतीचा वाढतो; तुम्ही तर उत्तम द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहे.”
11येशूंनी गालीलातील काना येथे केलेले हे पहिले चिन्ह होते व त्याद्वारे आपले गौरव प्रकट केले आणि शिष्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.
12यानंतर येशू आपली आई, भाऊ आणि शिष्य यांच्याबरोबर काही दिवस खाली कफर्णहूम गावी गेले व तेथे राहिले.
येशू मंदिर शुद्ध करतात
13त्यानंतर यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला असताना येशू वर यरुशलेमास गेले. 14तेथे त्यांनी मंदिराच्या परिसरात गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि पैसे बदलून देणारे लोक यांना पाहिले, 15तेव्हा त्यांनी दोर्‍यांचा एक चाबूक तयार केला आणि त्या सर्वांना मेंढरे आणि गुरे यांच्यासहित मंदिराच्या परिसरातून बाहेर घालविले आणि नाणी बदलून देणार्‍यांचे मेज पालथे करून त्यांची नाणी उधळून टाकली. 16मग जे कबुतरे विकणारे होते त्यांना ते म्हणाले, “यांना येथून काढा! माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका” 17तेव्हा शिष्यांना हा शास्त्रलेख आठवला: “तुझ्या मंदिराविषयीच्या ईर्षेने मला ग्रासून टाकले आहे.”#2:17 स्तोत्र 69:9
18यहूदी पुढार्‍यांनी त्यांना म्हटले, “हे सर्व करण्याचा अधिकार आपणाला दिला आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण कोणते चिन्ह आम्हास दाखवाल?”
19येशू म्हणाले, “हे मंदिर तुम्ही नष्ट करा आणि मी ते तीन दिवसात पुन्हा बांधेन.”
20त्यांनी उत्तर दिले, “हे मंदिर बांधण्यासाठी शेहेचाळीस वर्षे लागली आणि आपण तीन दिवसात हे बांधू शकता का?” 21परंतु मंदिर म्हणजे स्वतःच्या शरीरा संदर्भात ते बोलत होते. 22पुढे ते मरणातून उठल्यानंतर, त्यांच्या शिष्यांना या शब्दाचे स्मरण झाले. नंतर त्यांनी शास्त्रलेख व येशूंनी उच्चारलेली वचने यावर विश्वास ठेवला.
23वल्हांडणाच्या उत्सवात येशू यरुशलेमात असताना, अनेक लोकांनी त्यांच्याद्वारे घडत असलेली चिन्हे पाहिली व त्यांच्या नावावर विश्वास ठेवला. 24परंतु येशूंनी स्वतःस त्यांच्या अधीन केले नाही, कारण ते सर्व लोकांस ओळखून होते. 25त्यांना मनुष्याविषयी कोणाच्याही साक्षीची गरज नव्हती, कारण प्रत्येक व्यक्तिमध्ये काय आहे हे त्यांना माहीत होते.

Àwon tá yàn lọ́wọ́lọ́wọ́ báyìí:

योहान 2: MRCV

Ìsàmì-sí

Pín

Daako

None

Ṣé o fẹ́ fi àwọn ohun pàtàkì pamọ́ sórí gbogbo àwọn ẹ̀rọ rẹ? Wọlé pẹ̀lú àkántì tuntun tàbí wọlé pẹ̀lú àkántì tí tẹ́lẹ̀