प्रेषित 3
3
पेत्र पांगळ्या भिकार्याला बरे करतो
1एके दिवशी दुपारी तीन वाजता, प्रार्थनेची वेळ असल्यामुळे पेत्र आणि योहान मंदिरात जात होते. 2त्यावेळी जन्मापासून लंगडा असलेल्या एका मनुष्याला सुंदर नावे मंदिराच्या दरवाजाजवळ आणले जात होते, जिथे त्याला दररोज मंदिराच्या अंगणात जात असणार्यांकडे भीक मागण्यासाठी ठेवले जात होते. 3जेव्हा त्याने पेत्र आणि योहानला तिथे प्रवेश करताना पाहिले, त्याने त्यांच्याकडे भीक मागितली. 4तेव्हा पेत्राने व योहानाने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र त्याला म्हणाला, “आमच्याकडे पाहा!” 5त्यांच्याकडून काही मिळेल या अपेक्षेने त्या मनुष्याने त्यांच्याकडे पाहिले.
6परंतु पेत्र त्याला म्हणाला, “माझ्याजवळ चांदी किंवा सोने नाही, परंतु जे आहे ते तुला देतो. नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग.” 7मग त्याने त्या मनुष्याचा उजवा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली आणि त्याच क्षणी त्याच्या पायात व घोट्यात बळ प्राप्त झाले. 8तो उडी मारून पायावर उभा राहिला व चालू लागला. मग चालत, उड्या मारीत आणि परमेश्वराची स्तुती करीत तो त्यांच्याबरोबर मंदिराच्या अंगणात गेला. 9सर्व लोकांनी त्याला चालताना आणि परमेश्वराची स्तुती करताना पाहिले, 10आणि जो मंदिराच्या सुंदर नावे दरवाजाजवळ भीक मागण्यासाठी बसत असे, तो हाच आहे अशी त्यांची ओळख पटली. त्याच्या बाबतीत जे काही घडले होते, त्यामुळे ते आश्चर्यचकित झाले.
पाहणार्या लोकांसमोर पेत्राचे भाषण
11मग तो पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता, सर्व लोक फार आश्चर्यचकित होऊन शलोमोनाच्या देवडीकडे धावत आले. 12हे पाहून पेत्र त्या जमावाला म्हणाला: “अहो इस्राएली लोकांनो, याबद्दल आश्चर्य वाटण्याचे काही कारण आहे का? आमच्याच शक्तीने किंवा सुभक्तीने या मनुष्याला चालावयास लावले आहे, अशा अर्थाने तुम्ही आम्हाकडे का पाहत आहात? 13अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचे परमेश्वर, जे आपल्या पूर्वजांचे परमेश्वर आहेत, त्यांनी त्यांचा सेवक येशूंना गौरविले आहे. त्याच येशूंना मारून टाकले जावे यासाठी तुम्ही त्यांना धरून दिले आणि पिलातासमोर तुम्ही त्यांना नाकारले. जरी पिलाताने त्यांना सोडून देण्याचा निश्चय केला होता, 14तरी तुम्ही पवित्र व नीतिमानाशी संबंध ठेवण्यास नकार दिला व त्याऐवजी एका खुनी माणसाच्या मुक्ततेची मागणी केली. 15तुम्ही प्रत्यक्ष जीवनाच्या निर्माणकर्त्यालाच जिवे मारले, परंतु परमेश्वराने त्यांना मरणातून पुन्हा उठविले, याचे आम्ही साक्षी आहोत. 16येशूंच्या नावावरील विश्वासामुळे हा मनुष्य ज्याला आपण पाहता व ओळखता तो आता बलवान झाला आहे. येशूंच्या नावावरील विश्वासाद्वारे तो पूर्ण बरा झालेला आहे, हे तुम्ही सर्वजण पाहतच आहात.
17“आता, इस्राएली बंधूंनो, मला माहीत आहे की तुम्ही जे केले, ते अज्ञानाने केले आणि तुमच्या पुढार्यांनीही तेच केले. 18परंतु ख्रिस्ताने दुःख सहन करावे म्हणून परमेश्वराने सर्व संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे जे भाकीत केले होते, ते पूर्ण केले. 19यास्तव पश्चात्ताप करा आणि परमेश्वराकडे वळा, म्हणजे तुमची पापे पुसून टाकली जावी व दिवसेंदिवस प्रभूकडून तुम्हाला नवीन शक्ती प्राप्त व्हावी, 20आणि त्यांनी तुमच्यासाठी ख्रिस्त म्हणून ज्यांची नेमणूक झाली आहे, त्या येशूंना पाठवावे. 21तरी ज्याविषयी फार पूर्वीपासून परमेश्वराने आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते की सर्व गोष्टींची पुनर्स्थापना होईपर्यंत, त्यांना स्वर्गामध्ये राहणे अगत्याचे आहे. 22कारण मोशे म्हणाला, ‘प्रभू तुमचे परमेश्वर, तुमच्या लोकांतून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील; तो सांगेल ते सर्वकाही तुम्ही ऐका. 23जो कोणी संदेष्ट्याचे ऐकणार नाही, त्याचा त्यांच्या लोकांतून समूळ नाश करण्यात येईल.’#3:23 अनु 18:15, 18, 19
24“खरोखरच, शमुवेल संदेष्ट्याने आणि त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक संदेष्ट्याने आजच्या या दिवसाबद्दल भविष्य सांगितलेले आहे. 25तुम्ही संदेष्ट्यांचे वारसदार आहात आणि परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी केलेल्या कराराचे भागीदार आहात. ते अब्राहामाला म्हणाले, ‘तुझ्या संततीद्वारे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील.’#3:25 उत्प 22:18; 26:4 26परमेश्वराने आपल्या सेवकाला उठविले, तेव्हा प्रथम तुमच्याकडे पाठविले, यासाठी की तुम्हा प्रत्येकाने तुमच्या दुष्ट मार्गापासून मागे वळून आशीर्वादित व्हावे.”
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.